
बालासोर : ओडिशातील बालासोर जिल्ह्यात बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या तीन गाड्यांच्या भीषण अपघातात आतापर्यंत २८८ जण मरण पावले असून, ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा त्यांची रेल्वेमत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी भेट झाली. या दरम्यान माध्यमांशी बोलताना दोघांमध्ये मृतांच्या आकडेवारीवरून मतभेद झाले.
ममता बॅनर्जींनी या अपघातानंतर तीन डब्यांमध्ये अजूनही प्रवासी अडकलेले आहेत असा दावा केला. मात्र ही चुकीची माहिती असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. राज्य सरकारच्या डेटानुसार, सर्व डब्यांतील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे व आतापर्यंत २३८ जण मृत झाले आहेत, असे रेल्वेमंत्री म्हणाले. मात्र ही तुम्ही कालची आकडेवारी सांगत आहात, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. हीच अधिकृत माहिती आहे असं रेल्वेमंत्र्यांनी पुन्हा पुन्हा सांगितल्यावरदेखील ममता मला मिळालेल्या माहितीनुसार तीन डब्यांतील प्रवाशांपर्यंत अजून पोहोचता आलेले नाही या आपल्या म्हणण्यावर ठाम राहिल्या.