Monday, March 17, 2025
Homeताज्या घडामोडी'मणिपूरची शांतता आणि समृद्धी हे आमचे सर्वोच्च प्राधान्य'

‘मणिपूरची शांतता आणि समृद्धी हे आमचे सर्वोच्च प्राधान्य’

उच्चस्तरीय बैठकीत अमित शाहांचे कठोर कारवाईचे आदेश

मणिपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मणिपूर मंत्रिमंडळासोबत काल रात्री उशिरा झालेल्या बैठकीत पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, जे शांतता प्रक्रियेचा भाग म्हणून संपूर्ण राज्यात त्वरित लागू केले जातील. या निर्णयांमुळे राज्यातील सामान्य स्थिती पूर्ववत होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. मणिपूरची शांतता आणि समृद्धी हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे अमित शाह म्हणाले. कुकी आदिवासी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी हिंसाचाराचा तपास सीबीआयमार्फत करण्याबाबतही चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान मणिपूरमध्ये सध्या कर्फ्यू लागू आहे आणि ३ मे पासून इंटरनेट सेवा बंद आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवसीय हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते मणिपूरमधील जातीय हिंसाचारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. राज्यातील सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी ते अनेक बैठकाही घेत आहेत.

अमित शाह काल संध्याकाळी उशिरा इम्फाळला पोहोचले. त्यानंतर त्यांनी अनेक बैठका घेतल्या. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या मंत्रिमंडळाव्यतिरिक्त त्यांनी राज्यपाल, सुरक्षा दल आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. सोबतच इम्फाळमध्ये सर्वपक्षीय बैठकीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. राज्यात सामान्य स्थिती आणि जातीय सलोखा आणण्यासाठी मदत करण्याचं आवाहन त्यांनी राजकीय नेत्यांना केलं. तसंच शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचेही अमित शाह म्हणाले.

अमित शाह यांनी ट्वीट केले आहे की, “इम्फाळमध्ये मणिपूर पोलीस, सीआरपीएफ आणि भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. मणिपूरची शांतता आणि समृद्धी हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, शांतता बिघडवणाऱ्या कोणत्याही कृतीला कठोरपणे सामोरे जाण्याचे निर्देश दिले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत कायदा व सुव्यवस्था सुधारणे, मदतकार्याला गती देणे, जातीय संघर्षात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची भरपाई देणे आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देणे, तसेच अफवा रोखण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. बीएसएनएल टेलिफोन लाईन पुन्हा सुरु करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील शांतता बिघडवणाऱ्या कारवायांना कठोरपणे सामोरे जाण्याच्या सूचनाही अमित शाहांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समाजामध्ये ३ मे रोजी हिंसाचार झाला होता. मैतेई समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश केल्यानंतर कुकी समाजाने काढलेल्या मोर्चाने हिंसक वळण घेतलं. या हिंसाचारात ७५ हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -