जळगाव (प्रतिनिधी) : नेतृत्व, लोकशाही, प्रशासन आणि शांतताप्रिय समाज निर्माण करण्यासाठी भारताच्या इतिहासामध्ये प्रथमच देशातील ४३०० आमदार मुंबईत १५ ते १७ जूनला होत असलेल्या राष्ट्रीय विधायक संमेलनामध्ये एकत्रित येऊन एकाच व्यासपीठावर विचारविनिमय करणार आहेत.
याबाबत रावेरचे आमदार शिरीषदादा चौधरी, जळगावचे आमदार सुरेश भोळे व भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी शुक्रवारी संयुक्त पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना सांगितले की, पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे आयोजित ‘राष्ट्रीय विधायक संमेलन, भारत’ हे मुंबईतील बीकेसी जीओ सेंटर मध्ये १५ जून ते १७ जून २०२३ या दरम्यान होत आहे. भारतातील सर्व विधानसभा व विधान परिषदेचे अध्यक्ष व सभापती यांच्या सहकार्याने हे संमेलन होत आहेत.
भारताच्या लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, डॉ. मीरा कुमार, शिवराज पाटील चाकुरकर, तसेच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे या संमेलनाचे मार्गदर्शक व संयोजक आहेत. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या विचार-चिंतनामधून ‘राष्ट्रीय संमेलन, भारत’ ही संकल्पना साकारली आहे. या संमेलनात सार्वजनिक जीवनातील तणाव व्यवस्थापन, शाश्वत विकासाची साधने आणि प्रभाव, कल्याणकारी योजनाः शेवटच्या व्यक्तीचे उत्थान, आर्थिक कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि कौतुकास्पद विधानपद्धती या विषयांवर चर्चा होणार आहे.
देशामध्ये प्रथमच घडून येणारे हे संमेलन देशाला सतत पुरोगामी विचार आणि नेतृत्व देणार्या महाराष्ट्राच्या भूमित म्हणजेच मुंबईत होत आहे. महाराष्ट्र शासन या संमेलनाच्या आयोजनात यजमानाच्या भूमिकेतून सहभागी झाले आहे. या वेळी एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील , एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेचे सह समन्वयक प्रकाश महाले उपस्थित होते. देशातील विविध राज्यांनी त्यांचे राज्य म्हणून असणारे स्वातंत्र्य व वैविध्य जपणे. प्रामुख्याने हे विचारसुत्र समोर ठेवून देशातील सर्व आमदारांना एकाच व्यासपीठावर एकत्रित आणणारे हे संमेलन म्हणूनच फार पायाभूत कार्य साधणारे ठरणार आहे.
राष्ट्रनिर्माण, राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीय सर्वांगीण शाश्वत विकास या मध्यवर्ती विचार त्रिसूत्रीचा प्रमुख उद्देश ठेऊन आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाचा उद्घाटन सोहळा १६ जून रोजी होणार आहे. १७ जून रोजी या संमेलनाचा समारोप होईल. या व्यतिरिक्त ४० समांतर सत्र आणि गोलमेज परिषद होणार आहे. प्रत्येक सत्रांमध्ये ५० आमदार चर्चा करणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक सत्राचे अध्यक्षपद विधानसभेचे सभापती, विधान परिषदेचे अध्यक्ष, संसदीय कार्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता हे भूषविणार आहेत. राष्ट्रीय विधायक संमेलनात आतापर्यंत भारतातील सर्व राज्यांतील एकूण १८०० आमदारांनी आपली उपस्थिती दर्शविली आहे.