वावी: सिन्नर -शिर्डी महामार्गावर नाशिक आगारच्या शिवशाही बस चालकाने बसमध्येच आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजू हिरामण ठुबे राहणार दोनवाडे, पोस्ट विंचुरदळवी असे आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे. सिन्नर -शिर्डी महामार्गावर नाशिक आगाराची शिवशाही बस क्रमांक (एमएच ०९ ई.एम.१२८०) ही बस शिर्डीकडून सिन्नरकडे जात असताना वावी पांगरी येथील शिंदे वस्तीजवळ बसमध्ये बिघाड झाल्याने दुपारी एक वाजल्यापासून उभी होती. दरम्यान, यावेळी रात्रीच्या सुमारास बसला दुरुस्त करण्यासाठी आलेल्या सिन्नर आगाराच्या पथकास सदर बसमध्ये चालकाने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर त्यांनी नॅशनल हायवे पेट्रोलिंग पथकाचे इनचार्ज श्रेयस हुबळीकर, सुपरवायझर प्रशांत शिंदे, रुग्णवाहिका चालक दुर्गेश शिंदे यांच्या पथकाच्या मदतीने पोलिसांना पाचारण केले. पोलिस अधिक तपास करत आहेत.