-
गजानन महाराज: प्रवीण पांडे, अकोला
भास्कर महाराजांचा समाधी सोहळा फार मोठ्या प्रमाणात अडगावी संपन्न झाला. तेव्हापासून दहा दिवस तेथे अन्नदान सुरू होते. या अन्नदानाला संत भंडारा असे म्हटले गेले आहे. त्यावेळी भोजनाच्या पंगती चिंच वृक्षाखाली सावलीत बसत असत. त्या ठिकाणी कावळे अतोनात त्रास देऊ लागले. ‘काव काव’ असा आवाज करणे, पात्रावरील द्रोण उचलून नेणे, जेवणाऱ्यांच्या अंगावर मलोत्सर्ग करणे. त्यामुळे लोक त्रासून गेले. कावळ्यांना हाकलू लागले. भिल्लांनी कावळ्यांना मारण्याकरिता तिरकमटे तयार केले. हे सर्व पाहून श्री गजानन महाराज लोकांना म्हणाले, ‘त्या कावळ्यांना मारू नका. त्यांचा काही अपराध नाही.’ हे सांगत असतानाच आत्म्याला गती कष्या प्रकारे आणि केव्हा मिळते, हे देखील महाराजांनी सांगितले. ओवी क्रमांक ३४ पासून ते ओवी क्रमांक ४८ या रचनेतून हा प्रसंग दासगणुंनी वर्णन केला आहे. :
त्या योगे लोक त्रासले।
कावळ्यास हाकू लागले।
भिल्लांनी ते तयार केले।
तिरकमटे त्या मारावया ॥३४॥
तई बोलले गजानन।
अवघ्या लोकांलागून
नका मारू त्यकारण।
अपराध त्यांचा काही नसे ॥३५॥
या भंडाऱ्यात येण्याचा।
हेतू इतकाच आहे त्यांचा।
प्रसाद आपणा भास्कराचा।
इतरांपरीच मिळावा ॥३६॥
कां की हा भास्कर।
वैकुंठी गेला साचार।
हा पितृ लोकावर।
नाही मुळींच राहिला ॥३७॥
दहा दिवसपर्यंत।
प्राण अंतरिक्षात ।
राहे परिभ्रमण करीत।
सापिंडी होता जात पुढे ॥३८॥
त्या अकराव्या दिवशी।
बळी देती कावळ्याशी।
काक जेव्हा स्पर्शेल त्यासी।
तेव्हाच प्राण जातो पुढे ॥ ३९॥
त्या बलीदानाचे।
कारण भास्करा नुरले साचे।
म्हणून त्या कावळ्यांचे।
पित्त गेले खवळून ॥१४०॥
आत्मा या भास्कराचा।
मुळीच मुक्त झाला साचा।
तो पाहुणा वैकुंठीचा।
झाला आहे येधवा ॥४१॥
या सोम सूर्य लोकांचे।
कारण त्यासी नुरले साचे।
म्हणून पिंडदानाचे।
नुरले पहा प्रयोजन॥४२॥
जयाला न ऐसी गती।
त्याच्यासाठी पिंड देती।
कावळ्यांची वाट पाहाती।
पिंड ठेवून कलेशावर ॥४३॥
म्हणून कावळे रागावले।
त्यांनी हे जाणीतले।
भास्कराने गमन केले।
एकदम वैकुंठ लोकाला ॥४४॥
म्हणून आम्हा प्रसाद त्यांचा।
मिळू द्या भंडाऱ्याचा।
ऐसा विचार कावळ्यांचा।
दिसतो या कृतीने ॥४५॥
तुम्ही त्यांस मारू नका।
मीच तया सांगतो देखा।
अहो जीवांनो माझे ऐका।
गोष्ट आता सांगतो जी ॥४६॥
तुम्ही उद्यापासोन।
वर्ज्य करा हे ठिकाण।
ना तरी भास्करालागून।
येईल माझ्या कमीपणा ॥४७॥
आज प्रसाद घेवून।
तुम्ही तृप्त व्हा अवघे जण।
मात्र उद्यापासोन ।
या स्थळासी येऊ नका ॥४८॥
असे महाराजांनी कावळ्यांना सांगितले, ते काही लोकांना पटले. पण त्यात काही कुत्सित होते त्यांना हे पटले नाही. ते म्हणाले, ‘महाराजांनी अस्थानी ही निरर्थक वाणी केली.’ दुसरे दिवशी ते कुत्सित पुन्हा पाहावयास आले तो त्यांना तेथे एकही कावळा दृष्टीस पडला नाही. हे पाहून ते चकित झाले व समर्थांना शरण आले. पुढे १२ वर्षे त्या स्थळास कावळे आले नाहीत. भास्कराचे १४ दिवस पूर्ण करून महाराज आपल्या शिष्य मंडळींना घेऊन शेगावी परत आले.
एकदा शेगावात एके ठिकाणी विहीर खोदण्याचे काम सुरू होते. थोडे खोदकाम झाल्यावर खडक लगला म्हणून सुरुंग लावून फोडणे सुरू झाले. पाहारीने चारी बाजूंनी भोके पाडून त्यात सुरुंगाची दारू ठासून व दोऱ्या घालून भरली व ते पेटविण्याकरिता एरंड पुंगळ्या पेटवून चारी दोऱ्यांतून सोडल्या. पण त्या मध्येच गाठीवर अडकून राहिल्या. त्यामुळे सुरुंगापर्यंत विस्तव जात नव्हता. झऱ्यांमधून पाणी दारूजवळ येऊ लागले. त्यावेळी कमावरच्या मिस्त्रिने विचार केला की जर पाणी सुरुंगास लागले तर सुरुंग वाया जातील. त्या एरंड पुंगळ्याखाली सरकविणे भाग होते. कोणी खाली जाईना. तेव्हा मिस्त्रीने गणू जवऱ्यास दटाविले व खाली जाऊन एरंड पुंगळ्या सरकविण्यास सांगितले. हा गणू जवऱ्या अत्यंत गरीब होता. त्यामुळे त्याला हे करणे भाग पडले. दासगणू महाराज म्हणतात,
काय करतो बिचारा।
दारिद्र्य होते ज्याच्या पदरा।
त्याच्यावरी चाले जोरा।
यज्ञास बळी बोकडाचा ॥६८॥
यावर एक सुभाषित देखील आहे.
अश्वं नैव। गजम नैव।
व्याघ्रम नैवच नैवच।
अजा पुत्रो बलिरदद्यात।
देवो दुर्बल घातका: ॥
या गणू जवऱ्याची गजानन महाराजांवर अत्यंत निष्ठा होती. मिस्त्रीची आज्ञा होताच हा गणू जवऱ्या विहिरीत पुंगळ्या सरकविण्याकरिता उतरला. एक पुंगळी सरकविली. ती तत्काळ तळाशी गेली. दुसऱ्या पुंगळीला सरकविण्याकरिता हात लावणार तोच पहिला सुरुंग उडाला. असे घडताच विहिरीत अनेक दगड उडाले व विहिरीत धूर दाटला. गणू जवऱ्याने महाराजांची प्रार्थना केली आणि म्हणाला,
गणू म्हणे विहिरींतून।
समर्था ये धावून ।
माझे आता रक्षण।
तुझ्याविण कोण करी? ॥७२॥
दुसरा सुरुंग उडण्यास अत्यल्प अवधी राहिला. तेवढ्यात गणू जवऱ्याच्या हाताला एक कपार लागली आणि गणू त्या कपारीत जाऊन बसला. एकामागून एक असे तिन्ही सुरुंग उडाले. प्रचंड प्रमाणात दगड, माती इत्यादीचे ढीग विहिरीत जमा झाले, धुराचा डोंब उसळला.
हा सर्व प्रकार अवलोकुन लोक म्हणू लागले, ‘बहुतेक गणूला विहिरीत मुक्ती मिळाली असेल. त्याचे शरीर छिन्नभिन्न झाले असेल.’ लोक विहिरीत डोकावून पाहू लागले. पण त्यांना गणू कोठे दिसेना. त्यांचे नाना तर्क-वितर्क सुरू झाले. मिस्त्री बोलला, ‘गणू एखाद्या दगडाप्रमाणे उडाला असेल. त्याचे प्रेत शोधण्यास माणूस पाठवा.’ मिस्त्रीचे असे शब्द ऐकून आतून गणू बोलला
‘अहो मिस्त्री, मी मेलो नाही. विहिरीत बसलेला आहे. श्रीगजानन महाराजांच्या कृपेने मी वाचलो. या पाहा इथे कापरीत दडून बसलो आहे. एक मोठा धोंडा या कपारीच्या तोंडावर येऊन बसला. त्यामुळे मला बाहेर येता येत नाही.’ गणूचे हे शब्द ऐकून व तो जिवंत असल्याचे पाहून सर्व लोक आनंदले. विहिरीत उतरून तो धोंडा बाजूला करीत त्यांनी गणूला कपारीतून काढून विहिरीच्या बाहेर आणले. गणू विहिरीतून वरती येताच पळतच गावात महाराजांच्या मठात दर्शन घेण्यास आला. त्याला पाहताक्षणीच महाराज गणू जवऱ्यास म्हणाले,
गणू दर्शना येताक्षणी।
बोलले त्या कैवल्यदानी।
गण्या कपारीत बैसोनी।
किती धोंडे उडविलेस?॥ ८६॥
त्यात मोठा धोंडा तुला ।
रक्षण्यास येऊन बैसला।
कपारीच्या तोंडाला।
म्हणून तू वाचलास ॥८७॥
पुन्हा न ऐसे साहस करी।
पुंगळीवरून सुटल्यापरी।
मधेच तिला जाऊन करी।
कशाही प्रसंगी धरू नये ॥८८॥
हा तुझे गंडांतर।
आज निमाले साचार।
गणुप्रती पाहाया इत।
लोक आले गावींचे॥८९॥
गणू म्हणे सद्गुरू नाथा।
सुरुंग चारी पेटता।
तूच मला देऊन हाता।
कपारींत बैसाविले ॥९०॥
म्हणून मी वाचलो।
तुझे पाय पाहाया आलो।
ना तरी असतो मेलो।
विहिरीमाजी गुरुराया ॥९१॥
असे अनेक प्रसंग जीवनात येतात, ज्यामध्ये महाराज स्वतः येऊन संरक्षण करतात, गंडांतर टाळून प्रचिती देत असतात. केवळ श्रद्धा व दृढ निष्ठा असावी लागते.