Tuesday, April 22, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणसमुद्रकिनारे ठरताहेत रोजगाराच्या दृष्टीने वरदान

समुद्रकिनारे ठरताहेत रोजगाराच्या दृष्टीने वरदान

स्थानिकांना मिळाला रोजगार; मूलभूत सोयी-सुविधांचा मात्र अभाव

अलिबाग : रायगड जिल्ह्याला ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक, औद्योगिकदृष्ट्या महत्त्व आहे. तसेच हा जिल्हा पर्यटनदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. या जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात अलिबाग, सारळ, सासवणे, आवास, किहीम, वरसोली, आक्षी, नागाव, चौल आणि रेवदंडा तसेच मुरुड तालुक्यातील काशिद, मुरुड, आगरदांडा, राजपुरी तर श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन, श्रीहरिहरेश्वर, दिवेआगर, शेखाडी, बागमांडला, दिघी येथे असलेले समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करणारे आहेत. या समुद्रकिनाऱ्यांवर पाऊस वगळता पर्यटकांची वर्दळ कायम असते. त्यामुळे हे रायगडचे किनारे स्थानिकांना रोजगाराच्या दृष्टीने वरदानच ठरत आहेत.

काही वर्षांपूर्वी हे किनारे फारसे गजबजलेले नसायचे; परंतु प्राचीन लेणी, गडकिल्ले, समुद्रकिनारे, वॉटर स्पोर्ट्स, धरणे, बंदरे, धबधबे, गिरीस्थाने, अभयारण्य, ऐतिहासिक धार्मिक स्थळे आदी पर्यटन स्थळांवर गर्दी वाढू लागल्याने स्थानिकांनी लॉजिंग-बोर्डिंगसह व्हेज-नॉनव्हेज उपाहारगृहे, बोटिंग, विविध प्रकारची कटलरी सामान, लाँचसेवा, रो-रो सेवा, कोकण फूड बाजार, भेलपुरी, पाणीपुरी, कुल्फी, गोला व सरबत, नारळ पाणी, ताडगोळे, चना मसालावाला, फोटो काढणारा, सुकी मासळी, विविध प्रकारच्या टोप्या विकणारा, चहानाश्ता, वडापाव, विविध प्रकारची भजी, लहान मुलांची खेळणी, दोन सीटवाल्या सायकली, टांगा, वॉटर्स स्पोर्टस, सीझनमधील आवळे, कैऱ्या, जांभ, बोर, काजू आदी व्यवसाय किनाऱ्यांवर सुरू झाल्याने पर्यटकांची सोय होण्याबरोबरच स्थानिकांना बऱ्यापैकी रोजगार उपलब्ध होऊ लागल्याने जिल्ह्यात वर्षभरात कोट्यवधींच्या उलाढाल होत आहे.

त्यातून व्यवसाय प्रमुखांबरोबरच त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांच्या कुटुंबांच्याही पोटाचा प्रश्न सुटतो आहे. करोना काळात दोन वर्षे शासनाने पर्यटकांना बंदी जिल्ह्यात येण्यास बंदी घातल्याने जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांसह सर्वच व्यवसाय ठप्प झाल्याने व्यावसायिक कर्जबाजारी झाले होते. व्यवसायासाठी विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा हप्त भरणेही कठीण होऊन बसले होते. कामगारांना पगारही देता येत नसल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबावरही उपासमारीची वेळ आली होती. कोरोनाची बंदी उठनल्यानंतर पर्यटन वाढीला चालना मिळाली आहे. त्यामुळे व्यवसायाने परत एकदा उभारी घेतली. आज फक्त अलिबाग समुद्रकिनाऱ्यांचा विचारकरता, या किनाऱ्यावर ५५ घोडागाडी, ४० स्पीडबोटी, २ पॅरॉसिलींग, लहान मुलांसाठी १० चारचाकी लहान गाड्या, रिक्षावाले, ३५ चारचाकी स्कुटर, १० उंट, २० ते २५ भेलपुरी व पाणीपुरीच्या गाड्या, चनामसाला, कुल्फी, वडापाव आदी वस्तू विकणारे व्यावसायिक दीड हजारांवर असल्याचे अलिबाग समुद्रकिनाऱ्यावरिल व्यावसायिक विश्वास (बबन) भगत याने ‘दैनिक प्रहार’शी बोलताना सांगितले.

पर्यटनस्थळांच्या विकासाबरोबरच पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या रुंदीकरणाबरोबरच समुद्रकिनारा, धार्मिक पर्यटनस्थळे, ऐतिहासिक पर्यटनस्थळे येथील मूलभूत सोयी-सुविधांचा प्रश्न सोडविल्यास पर्यटकांची संख्या अधिक वाढू शकेल.
– भारती आल्हाद पौडवाल, पर्यटक, मीरा रोड

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -