नवीन पनवेल (प्रतिनिधी) : पनवेल तालुक्यात तब्बल २२ लाख ९४ हजार निधीचा वापर करून बांधलेल्या जलयुक्त शिवारात पाण्याचा एक थेंब देखील शिल्लक नाही. यातील पाणी फेब्रुवारी-मार्च महिन्यातच आटल्यामुळे आदिवासी बांधवाना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. परिणामी आजूबाजूच्या आदिवासी वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई उद्भवली आहे.
तालुक्यातील धोदाणी येथे २६ जानेवारी २०१५ रोजी पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते जलशिवार योजनेचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर काम पूर्ण करण्यात आले. मालडुंगे, धोदाणी, धामणी, देहरंग, आदी गाव परिसरात उन्हाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. माथेरानच्या डोंगरावरून वाहून येणारे पाणी गाढी नदीतून खाडीला जाऊन मिळते.
पाणी जिरत नसल्याने बहुतांशी गावात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण होते. यावर मात करण्यासाठी जवळपास २३ लाख रुपये खर्च करून जलयुक्त शिवार बांधण्यात आले. या जलयुक्त शिवारात पावसाळा संपल्यावर पाणीच शिल्लक राहत नसल्याचे येथील आदिवासी बांधवांनी सांगितले. जलयुक्त अभियानांतर्गत पनवेल तालुक्यातील धोदाणी परिसरात पाणी जिरवण्यासाठी बंधारे बांधण्याच्या कामाला २०१५ मध्ये सुरुवात करण्यात आली होती. मात्र यातील पाणी फेब्रुवारी-मार्च महिन्यातच आटल्यामुळे आदिवासी बांधवांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबलेली नाही.
पाण्यासाठी वणवण; फार्म हाऊसना मात्र मिळते पाणी!
महिलांना दोन ते तीन किलोमीटर पायी चालत जाऊन पाणी आणावे लागते. पुरुष व महिला दोघांनाही मोलमजुरीवर पाणी सोडून पाण्यासाठी वणवण करावी लागते. पनवेल शहर, नवीन पनवेलला पाण्याचा पुरवठा करणारे देहरंग धरण ज्या हद्दीत आहे, त्या हद्दीतील वाड्यांना या धरणाचे पाणी चाखायला देखील मिळत नाही.