रत्नागिरी (प्रतिनिधी): संपूर्ण राज्यात दि. १७ मार्चपासून सरकारने एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के तिकीट सवलत ‘महिला सन्मान योजना’ म्हणून जाहीर केली. या योजनेमुळे आता महाराष्ट्रात सगळीकडेच एस.टी.ने प्रवास करणाऱ्यांची संख्या १० ते २० पटीत वाढली आहे. परिणामी रत्नागिरी एसटी विभागाचे उत्पन्न भरघोस वाढले आहे. तीन महिन्यात ४६ लाख ३६९३ महिला प्रवाशांनी एसटी ने प्रवास केला असून यातून तब्बल ९ कोटी ३२ लाख ४६ हजार २५२ इतके उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
राज्य शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात ‘महिला सन्मान योजना’ घोषित करून राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीमधील प्रवासात महिला व मुलींना तिकिटात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी १७ मार्चपासून सुरू झाली आहे. त्याच दिवसापासून महिला प्रवाशांची ‘एसटी’त गर्दी वाढली आहे. अर्थात आता बसमध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांचीच गर्दी अधिक पाहावयास मिळत आहे. एसटीत चढण्यासाठी महिलांची सगळीकडे चढाओढ दिसून येत आहे, एकीकडे कोरोना काळानंतर एसटी बॅकफूट वर आली होती, कर्जाच्या बोज्याखाली एसटी महामंडळ मार्गक्रमण करत होती, मात्र मार्च २०२३ मध्ये ही योजना लागू केल्या नंतर आता बस मध्ये जागा मिळवण्यासाठी महिलांची बाचाबाची सुद्दा होत असल्याच्या घटना सध्या घडत आहेत. त्यातच आता थेट खिडकीतून जागा पकडण्यासाठी कसरती महिला प्रवाशी करू लागल्या आहेत. रत्नागिरी एसटी विभागाला महिला प्रवाशांमुळे तब्बल ९ कोटी ३२ लाख ४६ हजार इतके उत्पन्न १६ मेपर्यंत प्राप्त झाले आहे.