Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीलम्पी आजाराने ग्रस्त जनावरांच्या संख्येत वाढ

लम्पी आजाराने ग्रस्त जनावरांच्या संख्येत वाढ

प्रशासनाचा पुन्हा एकदा लसीकरण करण्याचा निर्णय

लातूर : बदललेल्या वातावरणामुळे मानवासोबत आता प्राण्यांवरदेखील भयंकर दुष्परिणाम होत आहेत. राज्यात लम्पीच्या प्रादुर्भावामुळे अनेक जनावरे दगावल्याची घटना गेल्यावर्षी समोर आली होती. त्यानंतर राज्य सरकारने लसीकरण केल्यामुळे काही प्रमाणात या आजारावर नियंत्रण मिळवता आले होते. मात्र यावर्षी पुन्हा राज्यात लम्पी आजाराने ग्रस्त जनावरांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

लातूर जिल्ह्यातील साकोळ आणि राणी अंकुलगा भागात आतापर्यंत लम्पीमुळे १३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील पशुधनाला लम्पीच्या आजाराचा विळखा पडला आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय विभागाची चिंता वाढली आहे. आतापर्यंत ७०२ जनावरांना लम्पीच्या आजाराची बाधा झाली आहे. पैकी, ६४ जनावरे दगावली तर ५६७ जनावरे लम्पीच्या आजारापासून बरी झाली आहेत. ब-या होणा-या जनावरांची संख्या जास्त असली तरी पशुपालकांसाठी ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.

आठ महिन्यापूर्वी लम्पी आजारामुळे जनावरांना अक्षरशः मृत्यूचा सामना करावा लागत होता. त्यामुळे सरकराने देखील गंभीर दखल घेत उपाययोजना केल्या. गावागावात लसीकरण करण्यात आले. यानंतर साथ आटोक्यात आली होती. मात्र मार्च महिन्यानंतर काही ठिकाणी पुन्हा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे. नवजात वासरांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. ज्या पशूंचं लसीकरण झालं आहे त्यांच्या मृत्यूचं प्रमाण दिसून येत नाही. मात्र ज्या पशूंचं लसीकरण झालं नाही अशी नवजात वासरं मृत्यमुखी पडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने या गावात भेटी देखील दिल्या आहेत. पण परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत नाही. विशेष म्हणजे या भागातील पशू हे औषध उपचाराला प्रतिसाद देत नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

जनावरांचं तात्काळ लसीकरण करून घेण्याची पशुसंवर्धन विभागाची सूचना
दरम्यान पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांना घाबरून न जाता योग्य वेळी औषध उपचार करून घेऊन आपल्या पशुंचे रक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. नवीन आणलेले पशू असतील किंवा नवजात वासरे असतील तर त्यांचं तात्काळ लसीकरण करून घ्यावं, अशी सूचना विभागाने दिली आहे. आजाराची लक्षणे दिसल्यास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क करावा, ते सहकार्यासाठी कायम उपलब्ध असतील असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -