उद्धव ठाकरे-संजय राऊत खंडणीच्या पैशांवर जगत असल्याचा आमदार नितेश राणे यांचा आरोप
मुंबई : दादागिरी करत पैसे मागणा-या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना त्यांच्याच गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी मारहाण केल्याचा संदर्भ देत यात कार्यकर्त्यांची काहीच चूक नाही, जसे पक्षप्रमुख तसे कार्यकर्ते असल्याचा खोचक टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी लदावला आहे.
मातोश्रीचा खर्च उद्धव ठाकरेंच्या खिशातून होत नाही. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे खंडणीच्या पैशांवर जगणारे लोक आहेत. कोरोनाच्या संपूर्ण कार्यकाळात तुमचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, आमच्याकडे याचे पुरावे आहेत, असे म्हणत आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.
नितेश राणे म्हणाले, सुषमा अंधारेंना मारहाण झाली. या गोष्टीचे आम्ही समर्थन करत नाही. आमच्यावर तसे संस्कार नाहीत. मुद्दा हा आहे की, सुषमा अंधारेंनी आमच्यावर कितीही खालच्या पातळीवर टीका केली तरी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर आहे. मात्र बीडच्या जिल्हाप्रमुखाने त्यांच्यावर जे आरोप केलेत ते गंभीर आहेत.
नितेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी काय वेगळे केले. एक रुपयाचेही उत्पन्न नसताना आलिशान आयुष्य जगतात. मातोश्रीवर एसी कोणी लावले. ते व्हिडिओकॉन कंपनीचे आहेत. मातोश्रीचा खर्च एक रुपया उद्धव ठाकरेंच्या खिशातून होत नाही. बाहेरच्या दौऱ्यांचा खर्च उद्योजक करतात. संजय राऊत फ्लाईटमध्ये फर्स्ट क्लासशिवाय फिरत नाही. दरोडखोरी आणि खंडणींवर तुमचे संपूर्ण आयुष्य गेले. काल एका जिल्हाप्रमुखानेच वैतागून खंडणी मागणा-यांना चापट लगावल्या, यात दोष कुणाचा? असा सवालही नितेश राणे यांनी केला आहे.
नितेश राणे म्हणाले, रोज पदे विकण्याची आणि त्याबदल्यात खोके घेण्याची सवय त्यांना आहे. नारायण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा हेच आरोप त्यांनी केले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे पदे विकत होते. एकनाथ शिंदेसोबतच्या आमदारांवरही तेच आरोप केले. यात तथ्य आहे. सुषमा अंधारे यांच्यावर जे आरोप झाले त्यात त्यांची चूकी नाही. जसे पक्षप्रमुख तसे त्यांचे कार्यकर्ते. पक्षप्रमुखांचे सगळे गुण ठाकरे गटाच्या नेत्यांनी आत्मसात केलेले आहेत.
नितेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी सचिन वाझेला टार्गेट दिले होते. स्वतःच्या कुटुंबाच्या खर्चासाठी वाझेकडून वसुली करवली जात होती. आणि यांचा पेंग्विन मुलगा आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतो. तुम्ही भ्रष्टाचाराने बरबटलेले आहात. कोरोनात केलेल्या भ्रष्टाचाराचे आमच्याकडे पुरावे आहेत. त्यामुळे उगाच आमच्या हिंदू समाजाला खंडणीखोर म्हणू नका. संजय राऊतला तर हज यात्रेला पाठवण्याचे बाकी आहे. राऊत जिहादी मुसलमानाप्रमाणे वागत आहेत.
नितेश राणे म्हणाले, त्र्यंबकेश्वरमध्ये चादर घेऊन आतमध्ये येण्याचा हट्ट का करण्यात आला. संजय राऊतने अंगरक्षक बाजूला करुन त्र्यंबकेश्वरला जाऊन परत यावे. ठाकरेंनी कोरोनाच्या काळात कोविडच्या नावाने मंदिरे बंद केली, सण साजरे करु दिले नाही. उद्धव ठाकरेंना विचारायचे आहे, तुमचा मुलगा कोरोनात हॉटेलमध्ये दारु कसा पित बसला. त्याने मजा मारल्यावर कोरोना पसरत नाही का? तुम्हाला गोमुत्राबद्दल द्वेष आहे. गोमातेला हिंदू धर्मात पुजातात. ठाकरे आणि राऊत यांचे धर्मांतर झाल्याचा टोलाही नितेश राणे यांनी लगावला.