-
कथा: प्रा. देवबा पाटील
यक्षाचे यान आतून खूपच सुंदर होते. सर्व सुखसुविधांनी युक्त असे होते. विज्ञानाची अनेक छोटी-छोटी अत्याधुनिक उपकरणे त्यात दिसत होती.
दीपा व संदीप हे दोघे बहीण-भाऊ होते. ते अभ्यासात खूप हुशार होते. एकदा संध्याकाळी ते असेच आपल्या घराच्या अंगणातील बगिचात आरामात गप्पागोष्टी करीत सिमेंटच्या दोन बाकांवर बसले होते. त्यांच्या मजेत हसत-खेळत गप्पा सुरू होत्या. त्यांच्या गप्पा रंगात आल्या असताना दीपाला आकाशात एक पांढराशुभ्र लहानसा ठिपका वेगाने खाली येताना दिसला. ते एक सुंदरसे छोटेसे अवकाशयान होते. क्षणभरात ते यान त्यांच्या बगिचात त्यांच्याजवळ एका रिकाम्या जागी उतरले. ते यान तेथे येताक्षणी त्याला खालून आपोआप पाय फुटले व ते क्षणार्धात त्या जागी त्या पायांवर उभे राहिले. ते त्याकडे बघत असतानाच झटकन त्याचा दरवाजा आपोआप उघडला गेला. त्यातून एक गोरापान, सुंदर कपडे घातलेला, डोक्यावर जरीचा सुरेख टोप असलेला बुटका माणूस बाहेर पडला व त्यांच्याजवळ आला.
“कोण तुम्ही?” दोन्ही बहीण-भावांनी त्याला विचारले.
“मी यक्ष. हे माझे यान आहे.” तो बुटका म्हणाला.
“काय? यक्ष!” दोन्ही बहीण-भावांनी विस्मयाने त्याच्याकडे
बघत विचारले.
“हो, यक्ष.” आपल्याच मंदाकिनी या आकाशगंगेतील तुमच्या सूर्यासारख्याच असणाऱ्या दुसऱ्या आदित्य नावाच्या सूर्याच्या ग्रहमालेतील तुमच्या पृथ्वीसमान असलेल्या वसुधा ग्रहावरील मी यक्ष आहे. यक्ष म्हणाला.
“काय! सांगता काय तुम्ही?” संदीप
नवलाने म्हणाला.
“मी खरं तेच सांगतोय.” तो यक्ष म्हणाला, “तुम्हाला खोटे वाटत असेल, तर चला माझ्या यानात, तुमच्या सूर्यमालेची व माझ्या आदित्यमालेची सफर करायला.
आणि ते दोघेही बहीण-भाऊ भारावल्यासारखे यक्षाच्या यानापर्यंत पोहोचलेही व नकळत त्यात बसलेसुद्धा. यक्ष आत बसताच दरवाजा आपोआप बंद झाला. यक्षाने एका संगणकाची कळ दाबून यान सुरू केले नि यानाने आकाशात भरारी घेतली. दीपा व संदीप हे दोघेही बहीण-भाऊ यक्षाच्या यानात बसल्यानंतर यानाचे बारकाईने निरीक्षण करू लागले. यक्षाचे यान आतून खूपच सुंदर होते. सर्व सुखसुविधांनी युक्त असे होते. विज्ञानाची अनेक छोटी-छोटी अत्याधुनिक उपकरणे त्यात दिसत होती.
त्यातील दुसऱ्या एका संगणकाच्या पडद्यावर बाहेरचे सर्व दृश्य दिसत होते. यक्ष त्यांना ते कोठून जात आहेत, कसे जात आहेत, संगणकावर काय काय दिसत आहे, हे सर्व समजावून सांगू लागला.
अचानक संगणकावर त्यांना एका बाजूला ढगांसारखी काहीतरी घनदाट वलये दिसलीत. ती बघून अग्निबाण उडतांना आकाशात ढग निर्माण होतांना दिसतात, असे आम्ही टीव्हीवर बघितले आहे. ते कसे निर्माण होतात? दीपाने माहिती विचारली.
अग्निबाण जमिनीवरून सुटतांना जमिनीला खूप जोराचा धक्का बसतो. खूप मोठे जाळे निर्माण होते. त्यापासून प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते. त्यामुळे आजूबाजूची जमीन व इमारती यांना धोका पोहोचण्याची शक्यता असते. म्हणून अग्निबाण प्रक्षेपण तळाच्या बाजूस आधीच एक मोठे पाण्याचे भरलेले तळे तयार करून ठेवतात. त्यात भरपूर पाणी असते. अग्निबाण उडताना जी प्रचंड उष्णता निर्माण होते, तिने या पाण्याची क्षणात वाफ होते. त्या वाफेचे क्षणात ढग तयार होतात. त्यामुळे जमीनही तापत नाही व इमारतीही सुरक्षित राहतात. यक्षाने सांगितले.
अवकाशयान आकाशात सोडतांना जर आकाशात ढग असले, तर मग काय करतात? संदीपने शंका काढली. यक्ष म्हणाला, यानाच्या उड्डाणाचे वेळी आकाश हे निरभ्र असावे लागते. उड्डाणाचे वेळी जर आकाशात ढग असले वा विजा चमकत असल्या तर उड्डाण काही कालावधीसाठी पुढे लांबवतात. आकाश स्वच्छ झाल्यावरच यानाचे उड्डाण करतात. आपले अंतराळयान खूप प्रचंड वेगाने भ्रमण करत आहे तरीही आपणास त्यात आपण स्थिर आहोत असेच का वाटते?दीपाने विचारले.
यक्ष म्हणाला, जेव्हा दोन वस्तू समान वेगाने, एकाच दिशेने जात असतात, तेव्हा स्थिर वस्तूच्या सापेक्षतेने जरी त्या गतिमान असल्या तरी एकमेकांच्या सापेक्षतेने त्या स्थिर असतात. हा सापेक्ष वेगाचा म्हणजे गतीसापेक्षतेचा नियम आहे. हाच नियम येथेही लागू होतो. आपण बसमधून प्रवास करत असताना जर आपण बसच्या बाजूच्या रस्त्यावरची झाडे, इमारती बघितल्या तर आपल्याला बसच्या गतीची जाणीव होते. तेच आपण बसमध्ये बसलेलो असताना जर बसच्या अंतर्भागातलेच निरीक्षण करत राहलो, तर आपणास बसच्या गतीची मुळीच जाणीव होत नाही. हेही तसेच आहे. अशी त्यांची यानात रम-गमत ज्ञानविज्ञान चर्चा सुरू होती.