-
दी लेडी बॉस: अर्चना सोंडे
आज मदर्स डे. आपल्या आईविषयी कृतज्ञता, प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. खरं तर ज्या आईमुळे आपण जग पाहतो, त्यामुळे प्रत्येक दिवस हा तिचा आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये मात्र मे महिन्याचा दुसरा रविवार मदर्स डे साजरा होतो. आई म्हणजे सृजन. नव्या जीवाला जन्म देणारी आणि घडवणारी. या प्रक्रियेची बीजे रोवली जातात ती पौगंडावस्थेत मासिक पाळीच्या रूपाने. मानवी जीवनातील सर्वात सुंदर आणि सृजनशीलतेचा हा काळ. मात्र अनेक भ्रामक समजुती आणि सामाजिक-पारंपरिक नियमांनी जखडल्याने असह्य वाटणारा काळ. एका तरुणीने मात्र या विषयावर प्रबोधन करायचे ठरवले. हसत-खेळत तिने कॉमिकच्या माध्यमातून प्रबोधन करायला सुरुवात केली. आज तिच्या प्रबोधनाचे भारतातील शाळेत धडे शिकवले जातात. ही तरुणी म्हणजे मेनस्ट्रुपीडियाची संस्थापिका आदिती गुप्ता.
आदितीचा जन्म झारखंडमधल्या मध्यमवर्गीय अशा पारंपरिक विचारसरणीच्या कुटुंबात झाला. लोकांना कळेल की, या घरातील मुलीला मासिक पाळी आली आहे म्हणून लोकलज्जेस्तव पॅड्स न वापरणे, पाहुण्यांच्या घरी सोफ्यावर किंवा पलंगावर न बसणे, लोणच्याला स्पर्श न करणे अशा अनेक परंपरागत भ्रामक कल्पना आदिती लहानपणापासून पाहत आली. तिला वयाच्या १२व्या वर्षी मासिक पाळी येण्यास सुरुवात झाली आणि इतर अनेक भारतीय कुटुंबांप्रमाणेच तिला हे गुप्त ठेवण्यास सांगितले गेले. तिला मंदिरात जाण्यास मनाई तर होतीच, पण तिला गंभीर पुरळ उठवणाऱ्या चिंध्या वापराव्या लागल्या. या काळातच तिला मासिक पाळी सुरू असताना मुलींना जाणवणारी अशुद्धता आणि लज्जा यांची जाणीव झाली. तिने पहिल्यांदा पॅड्स वयाच्या १५व्या वर्षी वापरले, जेव्हा ती शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात वसतिगृहात राहायला गेली तेव्हा.
९वी अथवा दहावीमध्ये असताना मुलांना शरीरशास्त्राचे धडे दिले जातात. मात्र हा खूपच उशीर असल्याचे आदितीचे म्हणणे होते. कारण त्या अगोदर कितीतरी आधी लहान वयात मुला-मुलींच्या शरीररचनेत बदल होण्यास सुरुवात झालेली असते. मात्र याच लाजेस्तव मुलांना, मुलींना कोणी माहिती देत नाही. मग मुले त्यांना मिळेल त्या मार्गाने ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करताना आणि बहुतांश वेळेस अज्ञानाला बळी पडतात. पुढे आयुष्यभर पश्चाताप करण्यापलीकडे काहीच उरत नाही. आदितीला हे सगळं उमगलं. या लहान कळ्यांना त्यांच्या आयुष्यातील या सुंदर घडामोडींची माहिती व्हावी म्हणून काहीतरी केले पाहिजे, हा विचार तिच्या मनात होता. या वयातील मुलींना त्यांना कळेल अशा माध्यमातून ज्ञान दिले पाहिजे, हे तिने निश्चित केले आणि तिला ते माध्यम गवसले ते म्हणजे कॉमिक्स. कॉमिक्सच्या माध्यमातून तिने तीन लहान मुलींचे कॅरेक्टर्स निर्माण केले आणि या कॅरेक्टर्सना चितारून कॉमिक्सच्या माध्यमातून तिने मासिक पाळीविषयी प्रबोधन करायला सुरुवात केली. यातूनच जन्मास आले मेनस्ट्रुपीडिया ही कॉमिक सीरिज. या कामी तिला तिचे पती तुहीन पॉल यांचा मोलाचा सक्रिय पाठिंबा मिळाला.
या कॉमिक सीरिजमधल्या या तीन मुली ज्यांना मासिक पाळीची नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यांनी काय स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे, मासिक पाळी म्हणजे काय, त्याविषयी समाजात असणाऱ्या चुकीच्या समजुती या सगळ्या गोष्टी या कॉमिक सीरिजमध्ये मांडण्यात आल्या आहेत. आज भारतातील अनेक पाठ्यपुस्तकात या कॉमिक सीरिजचा समावेश करण्यात आलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे ११ भारतीय भाषांमध्ये त्याचे भाषांतर करण्यात आलेले आहे. आदितीने भारतभर या विषयावर कार्यशाळा घेतली आहे. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या टेड टॉकमध्ये तिला तिचे अनुभव शेअर करण्यासाठी निमंत्रित केले गेले. व्हिस्पर या नामांकित पॅडच्या ब्रँडने ‘टच दी पिकल’ ही प्रबोधनात्मक मोहीम आदितीसोबत राबवली. फोर्ब्सच्या तिशीच्या आतील तीस उद्योजिकांच्या यादीत आदितीचा समावेश करण्यात आला होता. आदिती गुप्ताने ‘आदिनारी’ हा ज्वेलरीचा ब्रॅंड निर्माण केला आहे. हा ब्रँड सध्या आकार घेत असला तरी तो लोकप्रिय होत आहे.
आदितीला एका पोस्टर संदर्भात मोठ्या वादाला सामोरे जावे लागले होते. पांढऱ्या शुभ्र साडीतील सरस्वती देवी मागे वळून पाहते, तर तिच्या साडीवर लाल ठिपका दिसतो. “देवी ही एक स्त्री आहे आणि तिला सुद्धा मासिक पाळी येऊ शकते, त्या देखील रक्तस्त्राव करतात” असा साधा सरळ संदेश तिला द्यावयाचा होता. मात्र यावरून गदारोळ माजला आणि अदितीविरुद्ध पोलीस तक्रारदेखील दाखल झाली. आज मासिक पाळीविषयी चर्चा होत आहे. काही सकारात्मक चळवळीदेखील उभ्या राहिलेल्या आहेत. तरुण मुलींना मासिक पाळी आणि संबंधित विषयांबद्दल शिक्षित करणे तिच्यासाठी नेहमीच महत्त्वाचे आहे, कारण अशा अनेक वृद्ध महिला आहेत ज्यांना त्यांच्या शरीरशास्त्राबद्दल अजूनही माहिती नाही.
“बहुतेक स्त्रियांना हे माहीत नसते की, आपल्या पायांमध्ये तीन छिद्रे आहेत. आम्ही ते अशा प्रकारे दाखवून दिले आहे की, पुस्तकातील एक पात्र तिची शरीररचना रेखाटत आहे. स्वतःची शरीररचना रेखाटणारी स्त्री ही एक अतिशय शक्तिशाली प्रतिमा आहे; आमच्या संशोधनादरम्यान आम्हाला ही गोष्ट शिकायला मिळाली,” आदिती सांगते. “आम्ही मुलींना लाजेने वाढवतो आणि मुलांना अज्ञानाने वाढवतो. दुर्दैवाने, आम्ही या संभाषणांमधून वडील आणि भावांना वगळतो. जेव्हा आपण मोठे होतो, तेव्हा आपल्याला असे वाटते की, पुरुष आपल्या गरजांबद्दल असंवेदनशील आहेत, हे देखील लक्षात न घेता की तो तसा वाढला आहे. हे प्रत्येक घरात घडते. मला असे वाटते की, आपण या विषयांबद्दल न बोलून स्त्री-पुरुष या दोन्ही लिंगांचे अपमान करत आहोत. जरी मासिक पाळीचा पुरुषांवर थेट परिणाम होत नसला तरी, ज्या पुरुषांना त्यांच्या जीवनात स्त्रियांची खरोखर काळजी असते त्यांच्यावर परिणाम होतो. म्हणूनच, या प्रवासात त्यांना आपले सहयोगी बनवणे नेहमीच चांगली कल्पना असते,” असे आदिती स्पष्ट करते.
‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ मोहिमेबद्दल सरकारचे कौतुक करताना, अदितीला वाटते की, केवळ केंद्रीय स्तरावरच नाही, तर राज्य आणि जिल्हा स्तरावरही बरेच काम केले जात आहे. पण तिच्यासाठी चिंतेची बाब म्हणजे महिला सक्षमीकरण आणि इतर संबंधित विषयांवर चर्चा होत असतानाही महिलांचा श्रमशक्तीतील सहभाग कमी होत आहे. “देशाला कामगारांमध्ये अधिक महिलांची गरज आहे. मी वैयक्तिकरीत्या जास्तीत जास्त महिलांना नोकरी देण्याचा प्रयत्न करते. शेवटी, प्रत्येक लहान थेंब एक महासागर बनवतो,” ती सांगते. सावित्रीबाई फुल्यांपासून ते सिंधुताई सपकाळांपर्यंत सामाजिक बदल घडविणाऱ्या अनेक ‘लेडी बॉस’ची देशाला परंपरा आहे. आदिती गुप्ता ही परंपरा पुढे सार्थपणे नेत आहे.