-
दृष्टिक्षेप : अनघा निकम-मगदूम
आजूबाजूच्या बदलत्या जगाकडे पाहताना या ओळी आपसूकच समोर येतात. सोशल मीडिया नावाचा एक चक्रव्यूह तुम्हाला स्वतःकडे ओढायला तयार आहे. स्टेटस, रील्स, मेसेज अशी भुलभूलय्याची मोठी आकर्षणे इथे आहेत. पण त्यासोबतच मोकळं झालेलं, कुठलाही मोठा निर्बंध नसलेले जगाचं मोकळं अंगणसुद्धा याचं मायाजालात आहे. इथं जशा चांगल्या गोष्टी आहेत, तशाच मन भरकटवणाऱ्या सुद्धा गोष्टी आहेत. या सगळ्याच गोष्टी मनाचा ताबा घेतात आणि आपल्या आयुष्याचा मार्गच बदलून टाकतात.
जगाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतेय. जगात गर्दी वाढतेय. विज्ञान सातत्याने दीर्घायुष्याचे उपाय शोधत आहे. सुखाचे संदर्भ बदलले आहेत. मोठा बंगला, पॉश फ्लॅट, भरभक्कम बँक बॅलन्स, वीकएंड होम, महागड्या गाड्या, ज्वेलरी, कपडे, म्हणजेच सुखं ही व्याख्या लोकप्रिय झाली आहे. पण इतक्या गर्दीत, इतक्या सुखासीन आयुष्यात माणूस खरंच ‘सुखी’ आहे का? तो आनंदी आहे का हा खरा प्रश्न आहे. तर अनेकदा त्याचं उत्तर ‘नाही’ असं येतं. गर्दीतसुद्धा मनुष्य हरवलेलाच वाटतो. चौकोनी किंवा अगदी आताच्या भाषेत न्यूक्लिअर कुटुंबात त्याची बायको, मुलं सुद्धा त्याच्यासोबत आहेत का? या प्रश्नाचे उत्तर कठीण आहे. एकाच खोलीत एकत्र बसलेली दोन, तीन किंवा त्याहीपेक्षा जास्त माणसं हल्ली एकमेकांशी बोलत नाहीत, तर आपल्या स्पेसमध्ये जाऊन खूप लांब असलेल्या आपली मैत्रीण, मित्र किंवा अन्य कुणाशी चॅट करत राहतात. शेजारी बसलेल्या आई किंवा बाबांशी बोलायला मुलांना वेळ नाही. पण यूएसला असलेल्या मित्राशी तासनतास ते बोलू शकतात.
याचं सोशल मीडियाच्या जमान्यात या कृत्रिम स्पेसमध्ये माणूस स्वतःला ‘जागा’ शोधतो आहे. आपलं मन जाणणारा किंवा समजून घेणारा सुहृद शोधत आहे. पण हे सगळं आभासी जग काही क्षणांचे आहे, हे जेव्हा एखाद्याला समजते, तेव्हा त्याचा एकटेपणा अधिक वाढलेला दिसतो. यात सर्वाधिक तरुण वर्ग अडकलेला दिसतो. शिक्षण पूर्ण झालेलं असतं, काही मागावं असं काहीच पालकांनी शिल्लक ठेवलेलं नसतं. पालक सगळं देऊ शकतात. पण बोलण्यासाठी वेळ तेवढा देऊ शकतं नाहीत, अशा वेळी ही तरुण मुलं या आभासी जगात अधिक गुरफटतात, त्यात रमण्याचा प्रयत्न करतात, स्वतःला शोधतात. पण जेव्हा तिथेही निराशा येते, तेव्हा स्वतःलाच संपवतात. सगळंच भयानक! त्यामुळेच अशा गर्दीतल्या एकट्या माणसांना सोबत करण्याची गरज आहे. त्यांना आपलेसे करण्याची खरी गरज आहे.