-
कोकणी बाणा: सतीश पाटणकर
श्रीकनकादित्य मंदिर ९०० वर्षे प्राचीन आहे. पूर्णतः अस्सल कोकणी कौलारू स्थापत्यशैली पाहायला मिळते. ही देवता मनोकामना पूर्ण करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. देवालयाचे आवार प्रशस्त असून सभोवती चिरेबंदी तटबंदी आहे.
देवभोळ्या कोकणात देवस्थानांची कमी नाही. गाव तेथे देऊळ हे सूत्र कोकणाला परफेक्ट लागू पडतं. राजापूर तालुक्यातील कशेळी हे वायव्यकडे रत्नागिरी तालुक्याला लागून असलेले गाव. भारतातील मोजक्या सूर्यमंदिरापैकी एक मंदिर कशेळी गावात आहे, त्याचे नाव श्रीकनकादित्य मंदिर. आडिवरेपासून रत्नागिरीकडे २ कि.मी. अंतरावर डाव्या बाजूला रस्ता जातो, तेथून ३ कि.मी. अंतरावर कनकादित्य मंदिर आहे. मंदिरातील भगवान श्री सूर्यनारायणाची मूर्ती खूप सुंदर आहे, मूर्ती अतिशय रेखीव गंडशिळेची असून ती जगप्रसिद्ध कोणार्कच्या सूर्यमंदिरातील मूर्तिवैशिष्ट्यांप्रमाणे आहे.
हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती यांमध्ये उच्च देवतांची उपासना आणि त्यांचे विविध सण अन् उत्सव आहेत. त्याचप्रमाणे त्यांत कनिष्ठ
देवतांचीही उपासना आहे. सूर्य, चंद्र, अग्नी, पवन, वरुण आणि इंद्र या प्रमुख कनिष्ठ देवता आहेत. मानवाच्या जीवनात तसेच सर्वच प्राणिमात्रांच्या जीवनात या कनिष्ठ देवतांना महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय संस्कृती सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवते. त्या अानुषंगाने सूर्यदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘रथसप्तमी’ हा सण साजरा केला जातो. माघ मासातील (महिन्यातील) शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला सात घोडे असतात, म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. ज्या सूर्यामुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचराला नवे तेज, नवे जीवन लाभते, त्या भास्कराची ही पूजा आहे. ही प्रकाशाची, सूर्यदेवतेची पूजा आहे. रथसप्तमी हा स्त्रिया संक्रांतीनिमित्त करत असलेल्या हळदी-कुंकवाचा शेवटचा दिवस मानला जातो.
सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे यांचा संदर्भ या रथसप्तमीला आहे. भारतात प्रभासपट्टणम, कोणार्क अशी मोजकीच सूर्यमंदिरे आहेत. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात कशेळी गावातील कनकादित्य या सूर्यमंदिराचा त्यात समावेश आहे.या मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. मंदिरातील आदित्याची मूर्ती हजार वर्षांपूर्वी सोमनाथनजीकच्या प्रभासपट्टणम क्षेत्रात असलेल्या सूर्यमंदिरातून आणली गेली असावी, असे मानले जाते. या मंदिराबद्दलच्या अनेक दंतकथा प्रचलित आहेत. काठेवाडीतील वेरावळ बंदरातून एक व्यापारी दक्षिणेकडे निघाला होता. त्याच्या जहाजात आदित्याची ही मूर्ती होती. कशेळी गावासमोरून जात असताना ते जहाज एकदम थांबले. अनेक प्रयत्नांनंतरही जहाज पुढे जात नाही, हे पाहिल्यावर आदित्याच्या मूर्तीला येथेच स्थायिक होण्याची इच्छा असावी, असा विचार व्यापाऱ्याच्या मनात आला आणि त्याने ती मूर्ती किनाऱ्यावरील काळ्या दगडाच्या खडकातील गुहेत नेऊन ठेवली. ही गुहा आज देवीची गुहा म्हणून ओळखली जाते. कशेळी गावात कनकाबाई नावाची एक सूर्योपासक गणिका राहत होती. तिच्या स्वप्नात याच वेळी ही सूर्य मूर्ती आली आणि भगवान सूर्य नारायण कनकेला म्हणाले की, तू मला येथून ने आणि तुझ्या गावात मंदिर बांध. त्यात माझी स्थापना कर. कनकाबाईने ही हकीकत ग्रामस्थांना सांगितली. मग ग्रामस्थानाच्या मदतीने ती सूर्य मूर्ती गावात आणली गेली व स्थापना केली. त्या कनकाबाईमुळे घडले त्यामुळे कनकेचा आदित्य म्हणून कनकादित्य असे या मंदिराला नाव पडले.
इ. स. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने सौराष्ट्रावर हल्ला केला. प्रभासपट्टण या श्रीकृष्णाच्या राहण्याच्या ठिकाणी सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या. हल्ला होणार अशी कुणकुण लागल्याने पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर मूर्ती चढवल्या. काही मूर्ती घेऊन तो दक्षिणेकडे निघाला. ते गलबत कशेळी समुद्रकिनाऱ्याजवळ अडकले. त्याने त्यातील एक मूर्ती गुहेत आणून ठेवली. नंतर जहाज पुढे गेले. गुहेतील ही मूर्ती लोकांनी किनाऱ्यावरून गावात आणली. तेथे हे मंदिर उभे केले. तेच येथील कनकादित्य मंदिर होय. किनाऱ्यावर ज्या गुहेत कनकादित्याची मूर्ती सापडली त्यास ‘देवाची खोली’ म्हणतात. गावातील कोणी माहीतगार बरोबर असेल, तर येथे न चुकता पोहोचता येते. समुद्रापासून साधारण १५ फूट उंचीवर काळ्या पाषाणात ही नैसर्गिक गुहा आहे. जवळजवळ ३०० माणसांपेक्षा जास्त माणसे यात बसू शकतील, एवढी मोठी गुहा आहे.
कशेळीतील गोविंदभट्ट भागवतांचे कुलोत्पन्न वंजश हे मंदिराचे विश्वस्त आहेत. पन्हाळगडच्या शिलाहार राजाने १११३ साली गोविंदभट्ट भागवतांना हा गाव इनाम दिला होता. त्याची माहिती देणारा ताम्रपटही या मंदिरात आहे. कनकादित्य हे जागृत देवस्थान असल्याची ख्याती सर्वदूर असल्याने मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, बेळगांव, हुबळी, धारवाड, उज्जन, ग्वाल्हेर, इंदूर येथून अनेक भक्तगण दरवर्षी दर्शनासाठी येत असतात. मुंबईचे शिल्पकार कै. नाना शंकरशेठ यांच्याबद्दलची एक आठवणही या मंदिराशी जोडली गेली आहे. शंकरशेठ यांना मूल होत नव्हते. तेव्हा भा. रा. भागवतांच्या आजोबांनी कशेळीला येऊन कनकादित्याला नवस करण्याविषयी सांगितले. त्याप्रमाणे नानांनी नवस केला आणि त्यानंतर त्यांना पुत्राचा लाभ झाला. त्याची आठवण म्हणून नानांनी मंदिरासाठी भव्य, आकर्षक असा सभामंडप बांधून दिला.
माघ शु. सप्तमी ते माघ शु. एकादशी असे पाच दिवस मंदिरात रथसप्तमीचा उत्सव असतो. त्यावेळी मंदिराचे विश्वस्त कालिकावाडीतील देवीला आमंत्रण देतात. माघ शुद्ध षष्ठीला कालिकावाडीतून कालिकादेवी रात्री नऊच्या सुमारास निघते आणि रात्री बाराच्या सुमाराला कनकादित्य मंदिरात पोहोचते. मग देवीचा मुखवटा कनकादित्याच्या शेजारी ठेवला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी रथसप्तमीला विधीपूर्वक पूजा करून उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली जाते.
ही देवता मनोकामना पूर्ण करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. देवालयाचे आवार प्रशस्त असून सभोवती चिरेबंदी तटबंदी आहे. मंदिराची रचना सभागृह, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. सभागृह लाकडी खांबावर तोललेले असून चौपाखी कौलारू छप्पर आहे. गर्भगृहसुद्धा चौपाखी छप्पराचे असून त्यावर संपूर्ण तांब्याचा पत्रा बसविलेला आहे. ह्या मंदिराच्या आवारात दुरुस्ती, जीर्णोद्धार करताना वास्तूच्या मूळ रूपाला बाधा येणार नाही, याची दक्षता घेतली जाते. त्याच गावचे स्थानिक कलाकार संजय मेस्त्री यांनी जाणीवपूर्वक जांभ्या दगडातील कोरीव काम आत्मसात करून नवीन बांधकाम जुन्या शैलीत करून वास्तूचे मूळ सौंदर्यात वाढ केलेली आहे.
मुख्य मंदिरासमोरील श्रीशांतादुर्गा मंदिर, तलावाकडे जाणारी कमान या गोष्टी त्याची साक्ष देतात. कशेळी गावात कनकादित्य मंदिरापासून साधारण १.५० कि.मी. अंतरावर श्रीलक्ष्मी नारायण मंदिर हे माड, पोफळीतल्या आगारात वसलेले आहे. जुन्या बांधकाम शैलीतील मंदिर सुंदर आहे. श्रीकनकादित्य मंदिराच्या पश्चिमेला १ कि.मी.वर सुंदर समुद्रकिनारा आहे. जांभ्या दगडाचं विस्तीर्ण पठार व खोलवर असलेला समुद्र हे दृश्य फारच रोमांचकारी आहे. मंदिरात सुबक कोरीव काम आहे. लाकडी प्रतिमा आहेत. कनकादित्याची काळ्या पाषाणाची मूर्ती आहे, चांदीचा रथ उत्सवाच्या वेळी पाहायला मिळतो. किनाऱ्यावरील कड्यावर सुमारे १५ फूट उंचीवर, ४०० चौ. फुटांची नैसर्गिक गुहा आहे, तिथेच कनकादित्याची मूर्ती सापडली. या मंदिरात ८५० वर्षांपूर्वीचा एक ताम्रपट आहे. त्यावर संस्कृतमध्ये एक लेख कोरलेला आहे.
मंदिर साधारण ९०० वर्षे प्राचीन आहे. पूर्णतः अस्सल कोकणी कौलारू स्थापत्य शैली पाहायला मिळते. मंदिराचे अंतरंग खूपच सुंदर असून लाकडी खांबावर नक्षी व वेलबुट्टी केलेली आहे. मंदिराच्या भिंतीवर आणि छतावर विविध देव-देवता लाकडावर कोरलेल्या आढळतात. कालिकादेवी ही कशेळी गावापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या काळीकावाडीची. कालिकादेवीला धरून सहा बहिणी. कालिकादेवी, महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती, भगवतीदेवी आणि जाखादेवी. या सर्व देवी कशेळी गावाच्या आसपासच्याच आहेत. यात सर्वात प्रसिद्ध महाकाली मंदिर (अडिवरे) अगदी आवर्जून पाहण्यासारखे मंदिर आहे. कालिकादेवी ही या सर्व बहिणीत धाकटी महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती आणि भगवतीदेवी ह्या कालिकादेवीला जाखादेवीसाठी वर संशोधन करायला पाठवतात. पण कनकादित्यला पाहताच क्षणी कालिकादेवी कनकादित्याच्या प्रेमात पडते आणि कनकादित्यही कालिकादेवीच्या प्रेमात पडतो. मग पुढे त्यांचं लग्न ठरतं. जाखादेवीला आपल्या धाकट्या बहिणीचा खूप राग येतो आणि ती तिचं तोंड न बघण्याची प्रतिज्ञा करते आणि लग्नालाही उपस्थित राहत नाही. रथसप्तमी उत्सवात लग्न सोहळावेळी मोठी बहीण महाकालीला मानाचे सरंजाम पाठवले जाते.भगवतीदेवी पाठराखन म्हणून येते. कालिकादेवीची पालखी ज्यावेळी कशेळीकडे कनकादित्य मंदिराकडे जात असते त्यावेळी वाटेत जाखादेवीचे मंदिर लागते. मंदिरासमोरून पालखी जात असताना जाखादेवी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. (कारण जाखादेवीने आयुष्यभर कालिकादेवीचे तोंड न बघण्याची प्रतिज्ञा केली होती ना म्हणून.) यामुळे ही प्रथा आजही पाळली जाते.
ह्या लग्न सोहळ्याचं अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे, हुंडा पद्धत. सर्वसाधारणपणे सगळीकडे मुलीकडील मंडळींनी मुलाकडच्या मंडळींना हुंडा देतात. पण येथे उलटे आहे. मुलाकडच्या म्हणजे कनकादित्याकडच्या मंडळींना वधूकडच्या म्हणजे कालिकादेवीच्या मंडळींना हुंडा म्हणून शिधा द्यावा लागतो.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)