-
ओंजळ: पल्लवी अष्टेकर
अनेकवेळा प्रवासात आपल्याला अशा व्यक्ती भेटतात की, ज्या मनावर आयुष्यभरासाठी एक छाप सोडून जातात. एकदा अशाच साध्या पण मोठ्या माणसांचा अनुभव आम्हाला दापोली येथे आला.
आम्ही कुटुंबीय एकदा अंदमानच्या सफरीला गेलो. नितळ समुद्रकिनारे, हिरवीगार वनराई असलेले अंदमान आजकाल पर्यटकांना खुणावत आहे. येथील सेल्युलर जेल हे अनेक क्रांतिकारकांनी सोसलेल्या त्यागाचे प्रतीक आहे. आपल्या मातृभूमीच्या प्रेमापोटी त्यांनी फासावर जात आपले प्राण गमावले. तेथील छोट्या कोठड्या ब्रिटिशांच्या आपल्यावरील गुलामगिरीची साक्ष दाखवत होत्या.
अंदमानातच रॉस आयलँडवर आमची भेट झाली, अनुराधा राव यांच्याशी. त्या तिकडच्या नावाजलेल्या टुरिस्ट गाईड आहेत. रॉस आयलँड हे पोर्ट ब्लेअरपासून बोटीने दहा-बारा मिनिटांच्या अंतरावर आहे. अनुराधाताई सांगू लागल्या, “त्सुनामीच्या वेळेस आजूबाजूची हरणे सैरावरा इकडून-तिकडे धावताना दिसली. असे म्हणतात की, निसर्गातील बदल, धोके सर्वात आधी प्राण्यांना कळतात. कारण, ते सतत निसर्गाच्या जवळ असतात.” हा बदल अनुराधाताईंनी अधिकाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. मात्र, संभाव्य धोका जाणून त्या उंच जागेवर जाऊन बसल्या. त्यामुळे त्या त्सुनामीमधून वाचल्या, परंतु त्या त्सुनामीच्या वेळी आपल्या कुटुंबीयांपासून दूर असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना वाचवू शकल्या नाहीत. मिळालेले आयुष्य व्यर्थ घालवायचे नाही, असा त्यांनी निश्चय केला. अनुराधाताईंचे राहणीमान अतिशय साधे. साधासुधा पंजाबी ड्रेस, वेणी अशा वेशभूषेत त्या सदैव असतात. तिथल्या प्राणिमात्रांवर लहानपणापासून जीव लावण्याचे काम त्यांनी केले. मोर, बुलबुल अशा पक्ष्यांशी त्यांची दोस्ती आहे. रॉस आयलँडवर येणाऱ्या पर्यटकांना त्या तिथला इतिहास सांगतात, या कार्यासाठी मैलोन्-मैल चालून त्या पर्यटकांना तिथली माहिती देत असतात. त्यांच्या या गोष्टी आम्हा सर्वांना अचंबित करून टाकणाऱ्या होत्या. त्यांनी आजूबाजूच्या पक्ष्यांची विविध नावे ठेवली आहेत, त्यानुसार त्या पक्ष्यांना हाका मारतात. त्या आमच्याशी बोलताना काही पक्षी त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत होते.
बुलबुल संदर्भातील हेलावणारा अनुभव त्यांनी आम्हाला कथन केला. स्वातंत्र्यवीर सावरकर काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी सेल्युलर जेलमध्ये असताना त्यांना जेवणासाठी थोडा भात मिळत असे. आपल्या भातातील थोडासा भात त्या बुलबुलसाठी राखून ठेवत. त्यांच्या शिक्षेच्या काळात बुलबुल हा त्यांच्यासाठी एक विरंगुळा झाला होता. ते कैदेच्या आपल्या खोलीत खिडकीपाशी विशिष्ट ठिकाणी भिंतीवर हा भात चिकटवून ठेवत व बुलबुलची वाट पाहत. वाळलेल्या भाताची पापडी हे बुलबुल पक्षी घेऊन जात. सावरकरांचा बुलबुल सोबतचा हा मैत्रीचा ठेवा अनुराधाताई पुढे चालवत आहेत.
तिथल्या हरिणांना त्या दररोज आपल्या झोळीतून विशिष्ट पद्धतीने बनवून घेतलेला यिस्टरहित पाव खाण्यास देतात. कारण, यिस्टवाल्या पावाने प्राण्यांची पोटं खराब होतात. अनुराधाताईंचे हिंदी, बंगाली भाषांवर प्रभुत्व आहे. त्या म्हणाल्या, “सुमारे दीडशे वर्षांपूर्वी डॅनियल रॉस या ब्रिटिश मरीन व्यक्तीने अंदमानच्या अनेक बेटांचे सर्वेक्षण केले व पोर्ट ब्लेअरच्या उत्तरेला असलेल्या या छोट्याशा दोनशे एकराच्या बेटाचे नाव त्यांनी रॉस आयलँड असे ठेवले. एकेकाळी तिथल्या एका भागात गुन्हेगार कैद्यांना ठेवले जाई. ब्रिटिश शासनकर्त्यांच्या अनेक देखण्या इमारतींचे भग्नावशेष इथे पाहायला मिळतात.”
जंगलातून फिरताना अनुराधा ताईंच्या भोवती सोनेरी ठिपक्यांची हरणे बागडत होती. तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते २०१३ मध्ये त्यांना त्यांच्या कार्यासाठी निसर्गाविषयी ‘वैशिष्ट्यपूर्ण योगदान’ हा पुरस्कार मिळाला. अंदमान निकोबार टूर ऑपरेटर्स असोसिएशनतर्फे अनुराधा राव यांना ‘बेस्ट टुरिस्ट गाईड अॅवॉर्ड’ प्राप्त झाले आहे. आम्ही भावपूर्ण वातावरणात, अनुराधाताईंना नमस्कार केला व त्या स्मृती उराशी बाळगून आम्ही अंदमानचा निरोप घेतला.
अनेक वेळा प्रवासात आपल्याला अशा व्यक्ती भेटतात की, ज्या मनावर आयुष्यभरासाठी एक छाप सोडून जातात. एकदा अशाच साध्या पण मोठ्या माणसांचा अनुभव आम्हाला दापोली येथे आला. आम्ही नातलगांनी दापोली येथे कौटुंबिक सहल काढली होती. वाटेत आम्ही आमच्या ओळखीच्या कुलकर्णी कुटुंबीयांना भेटून पुढे जायचे ठरवले. दापोलीचा परिसर सुंदर, निसर्गरम्य! कोकणातील शेती-भाती! आमची मिनी बस कुलकर्णी यांच्या घराबाहेर थांबली. त्यांचे फाटक उघडल्यावर कैऱ्यांनी डवरलेले आम्रवृक्ष व इतर फुलझाडे दिसत होती. काका-काकूंनी माठातले थंडगार पाणी व गूळ देऊन आमचे स्वागत केले. काका शहरातील एका शाळेत शिक्षक म्हणून अनेक वर्षे कामास होते; परंतु शहरातील सततची धावपळ, गर्दी या वातावरणाला ते कंटाळले. त्यांनी आपल्या शिक्षकी नोकरीचा राजीनामा दिला व आपल्या मुलासहित दापोली येथे स्थायिक व्हायचे ठरविले. काकूदेखील बँकेत नोकरीस होत्या. त्यांना आपली स्थिरस्थावर नोकरी सोडून दुसरीकडे यायचे नव्हते; परंतु नवरा व मुलगा दापोलीत आल्यावर त्यांनीही आपल्या नोकरीचा राजीनामा दिला व त्या सुद्धा दापोलीत आल्या. कुलकर्णींचे घर म्हणजे जुन्या काळातील जांभा दगडाने बनविलेल्या घराचा एक उत्तम नमुना. काकूंनी घरामागे असलेल्या जागेत एका मोठ्या पिंपात रातांबे, साखर व मीठ घालून ठेवले होते. त्याचे सरबत तयार करून त्या शहर भागात विक्रीस पाठवत होत्या. आम्हालाही सुंदरशा रातांब्याच्या सरबताचा आस्वाद घ्यायला मिळाला. त्यांच्या घरात पंखे नाहीत, कारण आजूबाजूच्या शेतातून येणारे गार वारे. घरात स्वच्छ सूर्यप्रकाश येत होता. घरात कमीत कमी विजेचा वापर व्हावा, असे त्यांचे धोरण होते.
तेवढ्यात आमच्या समोर काकांनी आम्रवृक्षांवरील आंबे उतरविण्यासाठी पाठविलेले सहा-सात लोक आले व ते झाडांवरील आंबे पोत्यात भरू लागले. त्यामुळे गावातील कामगार लोकांना अधेमधे रोजगार मिळत होता. काका गावातील शेतकरी मंडळींशी मैत्रीपूर्ण नाते राखून होते. गावकऱ्यांना-शेतकऱ्यांना सरकारच्या विविध योजना समजावून सांगणे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या पद्धतीने शेती कशी करावी, याचे मार्गदर्शन ते नेहमी करतात. शेतकरी वर्गाच्या बचतीसाठी त्यांनी गावात पतसंस्था देखील सुरू केली आहे. त्यांच्या मुलाने शेतकी महाविद्यालयाची द्विपदवी प्राप्त केली आहे, तो देखील वडिलांना या कामात मदत करतो, अशी ही साधी-मोठी माणसे. जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन असणारी!