-
मायभाषा: डॉ. वीणा सानेकर
मराठी अभ्यासकेंद्राच्या २०१७ सालच्या पालक संमेलनात मॅक्सिनमावशींना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. तोवर सातासमुद्रापलीकडून महाराष्ट्रात आलेल्या मॅक्सिन मावशींबद्दल नि त्यांच्या मराठीप्रेमाबद्दल मी ऐकून होते.
मावशी अमेरिकेत जन्माला आल्या. त्यांचे एमएपर्यंतचे शिक्षण विदेशात इंग्रजीतून झाले. १९६१ साली त्या भारतात आल्या. भारताशी त्यांचे घट्ट नाते जुळले. पीएचडीच्या संशोधनाकरिता फुल ब्राईट स्काॅलरशिप मिळवून त्या फलटण येथे मराठीच्या बोलींच्या संशोधनाकरिता आल्या आणि इथेच वसल्या. मराठीतील बोलींमधली सामाजिक विविधता हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.
फलटण येथील कमला निंबकर शाळेच्या उभारणीसाठी मॅक्सिन मावशी यांनी अवघे आयुष्य दिले. मराठीतील एक अशी प्रयोगशील शाळा उभी केली, जिचा आदर्श जागतिक दर्जाच्या शाळांनी ठेवावा. मूल ज्या सहज नैसर्गिक भाषेत बोलते त्या भाषेस स्वीकारणे, त्यांचे विचारस्वातंत्र्य व अभिव्यक्तिस्वातंत्र्य जपणे हे मुलांच्या वाढीसाठी महत्त्वाचे असते. अनेक शाळांमधून मुलांच्या भाषेवर शिक्षकांचे कृत्रिम संस्कार केले जातात. अनेक मुलांना व्यक्त होता येत नाही नि त्यामुळे वर्गशिक्षण प्रक्रियेत ही मुले नीट प्रतिसाद देऊ शकत नाहीत. अशा मुलांवर अतिशय सहज गतिमंद असा शिक्का मारला जातो.
खरे तर लहानपणापासून अशा मुलांकडे लक्ष देणे गरजेचे असते. शिक्षणाचे ओझे वाटणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते. मातृभाषा याकरता सहाय्यक भूमिका बजावते. मावशींनी शिक्षणाचे माध्यम मातृभाषाच असायला हवे, हे लेखनातून सतत मांडले. जगाला आदर्श वाटावी अशी बालशिक्षणाची प्रयोगशाळा म्हणजे कमला निंबकर भवन ही शाळा उभी करण्याकरता धडपड केली. मुख्य म्हणजे मुलांना मराठीची गोडी लावली. वंचित वर्गातील मुलांना शिक्षणाची सावली मिळावी म्हणून विकास कार्यक्रमाची आखणी केली. मुख्यत: तळागाळातील मुलांना शिक्षणातून येणारा आत्मविश्वास दिला.
मॅक्सिन मावशींचा महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचे भाषातज्ज्ञ असणे. मराठीची वाक्यरचना, तिच्या मागची तत्त्वसरणी व व्याकरणाचा अभ्यास केला, त्या आनुषंगाने या अभ्यासाची मांडणी केली. दलित वस्त्या, झोपड्यांतून शिक्षणाचा प्रसार केला. घरातील प्रतिकूल परिस्थितीचा मुलांच्या शिक्षणावर कोणता परिणाम होतो? याची कारणे शोधून त्यावरची उपाययोजना हाती घेतली. भाषेच्या व शिक्षणाच्या चळवळीतल्या या कर्त्या कार्यकर्तीचे काम महाराष्ट्रातील मराठी भाषकांनी माहीत करून घेतलेच पाहिजे.
आज महाराष्ट्रातली तरुण पिढी विदेशाचे नागरिकत्व घेण्याकरिता धडपडते. पण सत्तरच्या दशकात मॅक्सिन मावशींनी भारताचे नागरिकत्व स्वीकारले, ते कशासाठी तर महाराष्ट्रातील मराठी भाषकांना मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व समजावण्यासाठी! तो काही सोशल मीडियाचा काळ नव्हता. मावशी आपल्या कामाचा गाजावाजा न करता सातारा जिल्ह्यात फलटण येथे वर्षानुवर्ष मराठीतील शिक्षणाचे काम करीत राहिल्या. मराठी कसे शिकवावे? याचे नवनवीन प्रयोग करीत राहिल्या.
आपली भाषा एकदा का मूल नीट शिकले की, ते अन्य कुठलीही भाषा शिकू शकते, हे पालकांना सांगत राहिल्या. मुलांच्या कविता, त्यांच्याकरता गाणी, त्यांची चित्रे या सर्वांसकट मराठीचे बाळकडू मायेने देत राहिल्या. अशी परदेशी मावशी लाभली, तर माय जगणारच. फक्त मॅक्सिन मावशींनी ज्याकरिता आपले आयुष्य वेचले, त्या महाराष्ट्रातील मराठी माणसांना मायभाषेचे मोल मात्र कळायला हवे!