-
प्रतिभारंग: प्रा. प्रतिभा सराफ
जाहिरातींचा एवढा परिणाम आपल्यावर होतो की, आपण त्याच्या सहज आहारी जातो. तेच खरं आहे, असे आपल्याला वाटू लागते.
एखादी गोष्ट सातत्याने आपल्या कानावर आदळली, तर ती आपल्याला खरी वाटायला लागते. अनेक जाहिराती गंमत म्हणून आठवून बघा. ‘शंभर लिंबाची शक्ती असणारा विम बार’ ही जाहिरात सातत्याने टीव्हीवर, सिनेमागृहात दाखवल्या गेली. या जाहिरातीनंतर भांडी घासण्यासाठी वापरत असलेल्या सगळ्या गोष्टी लोकांनी सहज बाजूला टाकल्या. घरात ‘विम बार’ आणला.
आजकाल घरोघरी टीव्ही आणि हातात मोबाइल असल्यामुळे काहीही महत्त्वाचेसुद्धा पाहताना जाहिराती आपोआपच समोर येत राहतात. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. गंमत म्हणून सांगते एक जाहिरात सातत्याने दिसायला लागली. मग आमची कामवाली मला येऊन म्हणाली, “आजकाल कोणी विम बार वापरत नाही. त्यांनी फार वेळही जातो. ते विम लिक्विड घेऊन या. आम्ही पण आमच्या घरी तेच वापरायला लागलो आहोत.”
हे सगळं सांगण्याची उद्देशच हा आहे की, जाहिरातींचा एवढा परिणाम आपल्यावर होतो की, आपण त्याच्या सहज आहारी जातो. तेच खरं आहे, असे आपल्याला वाटू लागते. साधं आपण घरात एकमेकांशी जेव्हा बोलतो, तेव्हा कसे बोलतो, आठवून बघा.
काही उदाहरणे – नवरा बायकोला म्हणतो, ‘तुला अगदीच काही करता नाही. रोजच तुझ्या हातची भाजी बेचव होते. बेचव खाण्याचा कंटाळा आला आहे.’ याचा परिणाम असा होतो की, ती बाई भाजी बनवताना खूप जास्त प्रमाणामध्ये कुठचेतरी मसाले किंवा मीठ घालून ती लज्जतदार बनवायचा प्रयत्न करते आणि मग ती जास्तच बिघडते. बायको नवऱ्याला म्हणते, ‘तुम्ही बावळट आहात. तुम्हाला कोणीही फसवते. दहा रुपयांची कोथिंबिरीची जुडीसुद्धा तुम्ही वीस रुपयांना तुम्ही घेऊन येता.’ आणि मग दुसऱ्या दिवशी तो माणूस भाजीवालीशी दहा रुपयांसाठी दहा मिनिटं वादावादी करत राहतो. आपण मुलांना नेहमीच दोष देतो. कितीही मार्क मिळाले तरी, ‘थोडासा मोबाइल कमी वेळ पाहिला असता, तर अजून जास्त मार्क मिळाले असते.’ मग त्याला वाटते की आपण इतका वेळ अभ्यासाला देऊनसुद्धा आई आपल्याला दोष देते. मग आपण अभ्यासच करायला नको!
आता ही काही बालिश उदाहरणे मी तुमच्यासमोर ठेवली आहेत; परंतु आपण एखाद्याला एखाद्या गोष्टीवरून सातत्याने दोष देत राहिलो, तर त्याला ती गोष्ट खरी वाटू लागते आणि तो आपण तसेच आहोत म्हणजे मूर्ख, बावळट, कामचोर इ. आहोत असेच त्या व्यक्तीला वाटायला लागते. अशा गोष्टींमुळे त्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. याऐवजी आपण जर सातत्याने सकारात्मक बोललो, तर समोरच्या व्यक्तींवर खूप चांगला परिणाम होऊ शकतो. आता वरचीच उदाहरणे घेऊया.
भाजी चांगली झाली नसतानाही जर नवरा बायकोला म्हणाला – ‘तू आज किती छान भाजी केली आहेस.’ किंवा ‘वा…! आज भाजी माझ्या आईकडून शिकलीस की यूट्यूबवरून शिकून घेतलीस? मस्त झाली आहे.’ तर तिचे भाजी करताना हात थरथरणार नाही. कधी कधी एखादा पदार्थ चांगला होत नाही याची अनेक कारणे असतात त्याच्या आपण खोलात जायला नको. पण काही असो थोडेसे आपल्याच माणसाला समजून घेऊन, त्या माणसाचा आत्मविश्वास कमी करू नये. आता बायको नवऱ्याला जर म्हणाली, ‘वाह! कुठून आणलीत ही कोथिंबीर, किती ताजी आहे’, किंवा ‘बरोबर निवडून आणलीत कोथिंबीर, छान गावठी आहे.’ आणि मुलांच्या बाबतीत कितीही कमी मार्क मिळाले तरी त्याला न ओरडता चांगल्या शब्दात तुम्ही सांगू शकता – ‘मागच्या वेळेसपेक्षा तुझी प्रगती चांगली आहे. पुढच्या वेळेस आणखी चांगली नक्की असेल.’ किंवा ‘तुला हा विषय समजत नाही, तर आपण त्याविषयीची काही समर्पक/ जोड पुस्तके आणूया का?’
प्रयत्न तर करून पाहा. आता या वयापर्यंत आयुष्यात अनेक सकारात्मक विचार करणारी आणि नकारात्मक विचार करणारी माणसे भेटली. जेव्हा विचार करू लागले, तेव्हा हळूहळू लक्षात आले की, आपल्याला नेमकी कोणती माणसे आवडतात आणि का आवडतात, तर कोणती अजिबात आवडत नाहीत? तेव्हा लक्षात आले की, जी सतत हसतमुख असतात, शारीरिक-मानसिक-आर्थिक कटकटी आपल्यासमोर उलगडत नाहीत, काहीतरी सकारात्मक, आनंददायी सांगतात किंवा आपल्याला खळखळून हसवतात. तुमच्या बाबतीतही असेच काहीसे असेल, बरोबर ना? आपणही कोणाला तरी आवडावे म्हणून या गोष्टी लक्षात ठेवून त्यानुसार वर्तन करायला काय हरकत आहे? प्रयत्न तर करून बघा. नक्की जमेल!