एका रिक्षावाल्याने आपल्या रिक्षातच एक हिरवीगार छोटीशी बाग बनवली आहे. गार्डन ऑन व्हील्स, असे नाव त्याने आपल्या रिक्षाला दिले आहे. त्याचा आयुष्याबद्दलचा उत्साह पाहून मी आश्चर्यचकित झाले.
‘ओ रिक्षा, जरा अंधेरी छोडोगे क्या?’ ऑफिसला जाताना कुणीतरी घाईघाईत रिक्षावाल्याला हाक देतो. लगेच मीटर पडतो व रिक्षा धावू लागते. मुंबईत उपनगरांमध्ये अशा धावणाऱ्या रिक्षा आजूबाजूला सतत पाहायला मिळतात. मुंबईचा कणा असलेल्या या रिक्षा इथल्या आयुष्याचा एक भाग आहेत. जय मातादी, जय श्रीकृष्ण ‘जय श्रीराम ‘आई-वडिलांचा आशीर्वाद, अशी नावे तर कधी आपल्या कुटुंबीयांची नावे देखील रिक्षावर असतात. अबाल-वृद्धांसाठी उपयुक्त अशी ही रिक्षा सतत धावत असते. पावसाळा असो, हिवाळा व उन्हाळा.
काही रिक्षावाल्यांना आपल्या रिक्षा सजवायला खूप आवडतात. सुंदर हार, पेंटिंग केलेली चित्रं यांनी ते रिक्षा सुशोभित करतात. रिक्षाच्या सतत फिरत्या चाकाप्रमाणे रिक्षावाल्यांचे जीवन असते. जवळ पाण्याची बाटली, एखादा छोटासा टॉवेल बाळगणे त्यांना आवश्यक वाटते. एखाद्या उपनगरात विशिष्ट ठिकाणी राहिल्यामुळे तेच ते रिक्षावाले आपल्याला नेहमी दिसतात. जर तुम्ही स्वतःहून त्यांच्याशी बोललात तर ते तुमच्याशी आनंदाने गप्पा मारतात. मुलांना शाळेत सोडायला-न्यायला येणाऱ्या रिक्षा मामांशी मुलांशी विशेष गट्टी असते. कारण, काही मुलांना बालवाडीपासून ते दहावीपर्यंत शाळेत सोडणारे रिक्षावाले असतात. साधारण बारा वर्षे एकमेकांच्या सहवासात राहून मुलांची रिक्षावाल्यांशी गट्टी जमते.’ वेळापत्रकाप्रमाणे वह्या-पुस्तके, वॉटरबॅग, डबा हे सर्वसामान घेतले का?’ अशी नियमित विचारणा करणारे सोनटक्के मामा आमच्या पाहण्यात आहेत. अहो, दुसऱ्याच्या लेकरांना आम्हाला आमची मुले म्हणूनच न्यावे लागते. गेली पंचवीस वर्षे मी रिक्षा चालवतोय, पण मी एकही अपघात केला नाही. असे आनंदाने सांगणारे मोरे मामा आहेत.
आम्हाला पैशांसाठी मुलांना रिक्षात कोंबून न्यायला आवडत नाही. नियम सतर्कतेने पाळणे आम्हाला योग्य वाटते. असे सांगणारे बाबू मामा आहेत. एका रिक्षावाल्याने आपल्या रिक्षातच एक हिरवीगार छोटीशी बाग बनवली आहे. गार्डन ऑन व्हील्स, असे नाव त्याने आपल्या रिक्षाला दिले आहे. त्याचा आयुष्याबद्दलचा उत्साह पाहून मी आश्चर्यचकित झाले. तुम्ही वेळात वेळ काढून बाग कशी सांभाळता?’ मी विचारले. ‘त्यात काय एवढे? कधीतरी रात्री एखादी बकरी येऊन रिक्षातल्या बागेची पाने खाऊन जाते’ ते आपला अनुभव सांगत होते.
एकदा तर गंमतच झाली. मी एका रिक्षाने नेहमीच्या रस्त्यावरून प्रवास करत असताना एक रिक्षावाला वाटेतच थांबला. ‘काय झाले हो? मला अजून पाच-सात मिनिटे पुढे सरळ जायचेय. वाटेतच का रिक्षा थांबवली?’ मी त्यांना विचारले. ‘थांबा दोन मिनिटं, आमचा दोस्त यायचायं!’ असे म्हणत त्याने पटकन उतरून ‘ये रे’ अशी हाक दिली. पाहते तर काय? एक भटके, सुंदर पाणीदार डोळ्यांचे, तपकिरी रंगाचे कुत्रे रिक्षावाल्याच्या शेजारी पायाशी जाऊन बसलेसुद्धा! रिक्षा सुरू झाली. तो सांगू लागला, ‘या आमच्या दोस्ताला मी अधे-मधे असाच फिरवून आणतो, नाहीतर त्याला बिचाऱ्याला कोण फिरवून आणणार? आमचा हा दोस्त कधी कधी रिक्षाच्या मागेही प्रवाशांसोबत बसायला जातो; परंतु प्रवाशांना आवडेल की नाही किंवा कुणी त्याला घाबरेल, या विचाराने मी त्याला मागे बसू देत नाही. तो डोकं बाहेर काढून हवा खातो. तो मला ओळखायचा व मी त्याला रिक्षात घ्यावे म्हणून भुंकत माझ्यामागे लागत असे. रिक्षात बसलेला तो दोन-तीन सिग्नल झाले की स्वेच्छेने उतरून जातो.’ मला खरेच त्या रिक्षावाल्याचे कौतुक वाटले.
एकदा मी परीक्षेच्या काळात माझ्या मुलाला रिक्षाने सोडायला गेले होते. माझ्या व मुलाच्या एकमेकांशी गप्पा सुरू होत्या. मध्येच रिक्षावाल्याने विचारले, ‘आप किधर जा रहे हो?’ मी त्यांना माझ्या मुलाला परीक्षेला सोडण्यास जात असल्याचे सांगितले. ‘अरे, तुमचा मुलगा तर बराच मोठा आहे, बारावीत तर असेल ना. मग तुम्ही त्याला स्वावलंबी बनवायला पाहिजे, नाहीतर एवढ्या मोठ्या जगात तो एकटा प्रवास कसा करणार?’
मी म्हटले, ‘त्याची परीक्षा आहे म्हणून सोबत आले.’
‘ठीक आहे. तरीपण आमची मुले तर गावात शिकतात, ती परीक्षेच्या वेळी कशी जातात याचा आम्ही कधी विचारही केला नाही.’
‘खरं आहे. मध्यंतरी मी वर्तमानपत्रात वाचले की, बिहारमधील एका गावात दहावीच्या परीक्षेच्या वेळी काही मुलींना ट्रॅफिकमुळे रिक्षा सोडून द्यावी लागली व दोन किलोमीटर धावत परीक्षा केंद्राकडे पळावे लागले.’ मी म्हटले.
‘अच्छा, खरेच का? मी ही बातमी ऐकली नव्हती.’ तो म्हणाला.
आपण शहरातले पालक अनेकदा मुलांची अतिकाळजी घेतो. पण, गावातील मुले त्यांचे पालक जवळ नसताना कठीण परिस्थितीचा सामना कसा करत असतील? बरेचदा स्वतःच्या बुद्धीला योग्य वाटेल असा निर्णय त्यांना घ्यावा लागत असेल.
एकदा तर मी ज्या रिक्षातून प्रवास करत होते, तो रिक्षावाला नुकताच बी.ए. पास होऊन रिक्षा चालवत होता. पुढे द्विपदवीधर होण्याची त्याची इच्छा होती; परंतु त्याची परिस्थिती गरिबीची असल्याने फी भरण्याचे पैसे मिळवण्यासाठी त्याने रिक्षा चालवायचे ठरविले. तो आपणहून स्वतःची माहिती सांगत होता. मॅडम, काम कुठलेही असो, ते सचोटीने, प्रामाणिकपणे करावे. कोणतेही काम हलके मानू नये. त्याचे बोलणे मला अगदी पटले. बेरोजगारी, बेकारी यामुळे असंख्य सुशिक्षित तरुण रिक्षा चालविण्याचे काम करतात.
मध्यंतरी कांदिवली ते गोरेगाव असा प्रवास रिक्षातून करताना मला एक अंदाजे साठ – पासष्ट वयातील रिक्षावाला भेटला. त्यांची मान अखंड थरथरत होती. ‘मामा, एवढ्या उतारवयात कशाला रिक्षा चालवायची? आता घरात विश्रांती घ्यायचे तुमचे वय आहे.’ मी म्हटले. ‘ते खरं. पण घरात बसवत नाही. एका मुलीचे लग्न करून दिले. दोन मुले शिकताहेत व धाकटी मुलगी लग्नाची आहे. मी आयुष्यभर रिक्षा चालवायचे काम केले, त्यामुळे आताही कुटुंबाचे पोट भरण्यासाठी मला हे काम करावे लागते.’ ते म्हणाले. असे हे विविध स्वभावाचे, परिस्थितीशी दोन हात करणारे रिक्षावाले मामा. कष्ट, परिश्रमांची तयारी हे गुण आपल्याला शिकवून जाणारे.