Saturday, July 6, 2024
Homeमहत्वाची बातमी'माझा महाकट्टा' कार्यक्रमात नारायण राणे, निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या दिलखुलास...

‘माझा महाकट्टा’ कार्यक्रमात नारायण राणे, निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या दिलखुलास गप्पा

मुंबई: एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या ‘माझा महाकट्टा’ या विशेष कार्यक्रमात केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, भाजपचे माजी खासदार डॉ. निलेश राणे, भाजप आमदार नितेश राणे यांनी एबीपी नेटवर्कचे समुह संपादक राजीव खांडेकर यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी नारायण राणे यांनी आपल्या वैयक्तिक आणि राजकीय कारकीर्दीतील संघर्ष सर्वांसमोर मांडला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ‘माझा महाकट्टा’ मध्ये दिलखुलास गप्पा मारताना म्हटले की, निलेश आणि नितेश ही दोन्ही मुलं शिक्षण घेत असताना त्यांनी राजकारणात प्रवेश करू नये असे वाटत होते. राजकारणात मी बरेच काही सहन केलंय आणि पचवलं आहे. मात्र, मुलांच्या वाटेला हे येऊ नये यासाठी त्यांनी राजकारणापेक्षा व्यवसायाकडे लक्ष दिले पाहिजे असे वाटत होते. त्यांनी शिक्षण पूर्ण करून आपला व्यवसाय सांभाळावा असं वाटतं होतं. दोन्ही मुलं कर्तृत्वान व्हावी अशी अपेक्षा होती. त्यांनी ती पूर्ण करत, त्यांनी व्यवसाय, राजकारणात यश मिळवलं असे कौतुकोद्गार नारायण राणे यांनी काढले. राजकारणात निष्ठा, काम पाहून पदे- जबाबदारी दिली जात नाही. राजकारण बदलत चाललं आहे. असंही नारायण राणे यावेळी म्हणाले.

अनेक व्यवसाय…लहानपणापासून संघर्ष

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या तरुणवयातील संघर्षाच्या दिवसांना उजाळा दिला. त्यांनी म्हटले की, मुंबईत असताना छोटे-मोठे व्यवसाय केले. त्यातून पैसे मिळवत होतो. अगदी फटाके विक्री सारखेही व्यवसाय केले. आपल्या आत्मचरित्रात ही लहानपणीच्या संघर्षाबाबत काहीच लिहीले नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, पाचवीत असताना वडील मफतलाल मिलमध्ये होते. आजारी पडले. काम करणं अशक्य झालं. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली आणि भावंडांना घेऊन गावी गेले. आईने मला चेंबूरमध्ये मामाकडे ठेवले. त्यामुळे जसे अपेक्षित लहानपण असते तसे माझे लहानपण गेले नाही. सातवीनंतर आठवीत गेलो. दिवसा नोकरी आणि नाईट स्कूलमध्ये अभ्यास केला. आठवी ते अकरावी या काळात सात नोकऱ्या केल्या.

अकरावीनंतर इन्कम टॅक्समध्ये संधी मिळाली. तेथे नोकरी केली. मला क्रिकेट खेळायला आवडायचं. जशी राजकारणामध्ये मी बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही करतो तसेच मी त्या क्रिकेटमध्येही करत होतो. व्यवसाय करायला मला फार आवडायचे. आजही आवडते. त्यावेळेलाही मी छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले. गॅरेज होते, फटाक्यांचा धंदा होता. पेपर होते… हॉटेल व्यवसायामध्ये मी आहे. वडिलांना काहीतरी मदत व्हावी म्हणून मी इथून पैसे पाठवायचो. पण वडील व्यवसायातले पैसे घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे मग नोकरीतून मिळणारा पूर्ण पगार मी त्यांना पाठवत होतो. कधीही एका व्यवसायात मी कायम राहिलो नाही. वेगवेगळे व्यवसाय करणं याला मी प्राधान्य दिलं. १९८४ साली नोकरी सोडली आणि महापालिकेची निवडणूक लढवली आणि निवडूनही आलो, असे ते म्हणाले.. असे सांगत नारायण राणे यांनी त्यांच्या संघर्षकाळातील आठवणींना उजाळा दिला.

संजय राऊत आयत्या बिळावर नागोबा

नारायण राणे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जळजळीत निशाणा साधला. संजय राऊत कोणाची इज्जत ठेवत नाही. मग, आम्हीदेखील त्यांची इज्जत का ठेवावी असा सवाल राणे यांनी केला. आम्ही इतर कोणाला काही बोलत नाही. फक्त राऊतांविरोधात आक्रमक का बोलतो, याचा विचार करा असे त्यांनी म्हटले. संजय राऊत म्हणजे आयत्या बिळावर नागोबा असल्याची टीका राणेंनी यांनी केली. पगारदार असलेल्या संपादकाने एवढी मालमत्ता कशी जमवली हे त्यांनी सांगाव असाही टोला यावेळी नारायण राणे यांनी लगावला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -