-
कोकणी बाणा: सतीश पाटणकर
मंदिराशेजारून वाहणारी मृडानी नदी आणि या नदीवरील धबधबे पाहता पावसाळ्यात त्याचे सौंदर्य अधिकच खुलते. संपूर्ण मंदिर परिसरावर निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण केली आहे.
रामायण, महाभारत या काळापासून ओळखला जाणारा अपरांत भूप्रदेश म्हणजे आजचे कोकण होय. भगवान परशुरामांनी समुद्र आटवून या कोकणची निर्मिती केली आहे; परंतु हा प्रदेश देवांची भूमी देवभूमी म्हणून जास्त प्रसिद्ध आहे. देव या संकल्पनेशी असलेले नाते हे भक्तीच्या संबंधातील असते; परंतु कोकणात मात्र गावातील ग्रामदैवतांचे स्थानिक लोकजीवनाशी असलेले नाते भक्तीत सुरू होऊन भक्तीमध्येच संपत नाही, तर हे नाते आबालवृद्धांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आणि लोकरीती व लोकनीतीचे केंद्रस्थान असते. निसर्गरम्य प्राचीन कोकण आणि प्राचीन संस्कृतीशी नातं सांगणारी विविध काळात बांधली गेलेली सुरेख मंदिरे प्रत्येक मंदिरांची स्थापत्यशैली वेगळी, निसर्गाची नवलाई वेगळी आणि त्याच्या आख्यायिकाही वेगवेगळ्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका आणि या तालुक्यामधील धोपेश्वर गाव या गावात हजार ते बाराशे वर्षांचा इतिहास अभिमानाने मिरवीत धूतपापेश्वर हे मंदिर प्राचीनतेची साक्ष देत उभे आहे. डोंगराच्या कुशीत दडलेले, निसर्गसौंदर्य ओतप्रत भरलेले, अजरामर शिल्पकलेची कलाकुसर असलेले हे मंदिर देव धूतपापेश्वर आणि इथला रमणीय परिसर पर्यटकांना भुरळ पाडत आहे. बघाताक्षणीच मन प्रसन्न व्हावे, असे स्वर्गीय अनुभूती देणारे शांत व रमणीय ठिकाण आहे.
हे शिवमंदिर प्राचीन आहे. सुरुवातीला नगारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ लाकडी द्वारपाल, त्यानंतर दिंडी दरवाजा, आत गेल्यावर देवडी, देवडीच्या भिंतीवर पेशवेकालीन चित्रकला प्रकारातील धार्मिक आशयाची चित्रे आहेत व खांब आहेत. मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्यावेळी मंदिराचं शिखर हे राजस्थानमधून ढोलपूर दगड आणून नागर शैलीत करण्यात आले. प्रशस्त सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी पारंपरिक रचना आहे. सभामंडप हे लाकडी नक्षीदार खांबावर तोललेले असून पारंपरिक चौपाखी कौलारू छप्पर आहे. देवाचा गाभारा मात्र काळ्या दगडात असून त्याची रचना व कला उच्च दर्जाची आहे. गाभाऱ्यातील स्वयंभू शिवलिंगाचा आकार वैशिष्ट्यपूर्ण असून त्यामागे धार्मिक संदर्भ आहे. समस्त राजापूरकरांचं आराध्य दैवत, ग्रामदैवत असलेले धूतपापेश्वर हे जागृत देवस्थान आहे. देश-विदेशातील भाविक व अभ्यासक या ठिकाणी भेट देत असतात. मंदिराच्या बाजूला एक छोटेखानी; परंतु तितकाच सुंदर धबधबा आहे. मृडानी नदीच्या काठावर असलेले हे मंदिर नदीच्या दोन्ही बाजूंच्या मोठ्या डोंगरांमध्ये आहे. मृडानी नदी डोंगरावरून खाली येताना मंदिराजवळच एक धबधबा तयार झाला आहे. जुलै ते नोव्हेंबर या काळात या धबधब्याला भरपूर पाणी असते. पावसाळ्यात येथे भाविक आणि पर्यटक यांची गर्दी असते.
राजापूरच्या परिसरात निळोबा भट नावाचा एक गरीब माणूस राहत होता. काशीविश्वेवर दर्शन आणि गंगास्नान करण्यास हे शिवभक्त दरवर्षी काशीला जात असत; परंतु वृद्धापकाळामुळे पुढे इतक्या दूर जाववेना. त्यांच्याकडे एक गाय होती. तिने अचानक दूध देणे बंद केल्यामुळे त्यांनी तिच्यावर पाळत ठेवली. रानात जाऊन एके ठिकाणी ती गाय झाडाखाली पान्हा सोडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे रागातच त्या खडकावर कुऱ्हाडीचा घाव घातला. त्या खडकाचा एक खडपा उडून विशालगडाजवळच्या कासर्डे गावी जाऊन पडला आणि त्याचे ‘कपालेश्वर’ लिंग झाले. मूळ खडक त्याच स्थानी राहिला. निळो भटांना त्या खडकात तुटलेले शिवलिंग आढळले. त्यांना खूप वाईट वाटले कारण शिवलिग भंग झाले त्याला आपणच कारणीभूत आहोत, असे त्यांना वाटले. आजही ते स्वयंभू शिवलिगं तुटलेलेच आहे. खडक फोडल्यावर ती गाय पळू लागली. तिने मंदिराच्या शेजारील डोहात उडी घेतली (कोटीतीर्थात).
निसीम्म शिव भक्त असलेले निळोबा भटांना खूप वाईट वाटले. शिवलिगं भंग आणि पवित्र गाईचा मृत्यू यास आपणच जबाबदार आहोत, असे म्हणून पापाचे प्रायश्चित म्हणून निळोबाही धावले आणि त्यांनीही कोटीतीर्थात देहविसर्जन केल. थोरल्या माधवराव पेशव्यांनी या मंदिराला भेट दिली होती. त्यांनी मंदिरासाठी शाळिग्राम भेट दिला होता. तो आजही धोपेश्वर गावातील ग्रामस्थं धोंडूमामा करंबळकर यांच्या घरात पाहायला मिळतो. तसेच पेशवेकाळातील सरदार बिनीवाले यांनी भगवान शंकराच्या पिंडीवर सोन्याचा मुकुट भेट दिला होता. जो आजही पूजेत वापरतात. मंदिराशेजारून वाहणारी मृडानी नदी आणि या नदीवरील आकर्षक छोटे छोटे धबधबे पाहता पावसाळ्यात त्याचे सौंदर्य अधिकच खुलते. संपूर्ण मंदिर परिसरावर निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण केली आहे. गर्द झाडीत हे मंदिर वसलेले आहे. मंदिराच्या सभामंडप आणि गर्भगृहावरील छतावर, खाबांवर, तुळ्यांवर ज्या प्राण्यांची, वनस्पतींची, फुलांची चित्रे काढून शिल्पकला केली आहे, ते प्राणी वगैरे त्या मंदिर परिसरात आढळणारेच आहेत. उदाहरणार्थ – शंकराला वाहायला जाणाऱ्या कैलासचाफा या आकर्षक फुलांचे झाड हे या एकमेव ठिकाणी पाहायला मिळते. मंदिर परिसरातील खांबांवर आणि भिंतीवर चित्रांसाठी व शिल्पकलेवर वापरलेले रंग पूर्णत: नैसर्गिक म्हणजे पाने, फुले झाडाची साल यांपासून तयार केलेले रंग आहेत. त्यामुळे हे मंदिर किती प्राचीन असणार आहे, याची कल्पना येते. दररोज रात्री शेवटची महापूजा होते आणि शंकर-पार्वती यांच्यासाठी सारीपाटाचा (सोंगट्यांचा) खेळ मांडला जातो आणि गर्भगृहाचा दरवाजा बंद केला जातो. दुसऱ्या दिवशी पहाटे आरतीसाठी दरवाजे उघडतात तेव्हा ह्या सोंगट्या विखुरलेल्या आढळतात. असे दररोज होत नाही आणि होईलच असे नाही. शक्यतो (सोमवार, गुरुवार, अमावास्या, महाशिवरात्र, श्रावण सोमवार) यावेळी जास्त होते. येथील भाविकांची श्रद्धा आहे की, भगवान शंकर-पार्वती येथे येऊन सारीपाट खेळून जातात. राजापूरची गंगा ज्यावेळी प्रकट होते त्यावेळी लोक प्रथम उन्हाळे येथे जाऊन गरम पाण्याच्या प्रवाहात आंघोळ करतात, नंतर राजापूरच्या गंगेत स्नान करतात आणि राजापूरच्या अर्जुना नदीपात्रातील पुंडलिकाचे दर्शन घेऊन धूतपापेश्वरला अभिषेक करतात. असे केल्यावर कशीविश्वेश्वराचे दर्शन पूर्ण होते, अशी भावना राजापूर आणि आसपासच्या गावातील भाविकांची श्रद्धा आहे. धूतपापेश्वर मंदिराच्या बरोबर मागे कामेश्वराचे मंदिर आहे. राजापूर व आसपासच्या गावातील एखादे जनावर आजारी पडले किंवा दूध देत नसेल, तर या मंदिरात नवस केला जातो. त्यांचे जनावर ठणठणीत बरे होते, असा अनुभव ग्रामस्थांना आहे.
धबधब्यांनी व हिरव्यागार वनश्रीने नटून गेलेला परिसर पाहायचा असेल, तर वर्षा ऋतू योग्य राहील किंवा अन्य कोणत्याही ऋतूमध्ये मंदिराला भेट देणे योग्य राहील. महाशिवरात्री दिवशी या ठिकाणी मोठी जत्रा असते. भाविकांसाठी ही एक विशेष पर्वणी असते किंवा श्रावण सोमवारी सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात भाविक भेट देतात. विजयादशमी (दसरा) या दिवशी सुद्धा इथे उत्सव असतो.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)