- नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे
मलाल बाबू राय अर्थात ‘इंदीवर’ यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या सिद्धहस्त लेखणीतून असंख्य मोती दिले. अनेकदा वाटते की, त्या काळच्या गीतकारांना एक उपजत ज्ञान होते की काय, देव जाणे? चित्रपटातील एखादा प्रसंग काय आहे, त्यातील पात्राची त्या क्षणाची मन:स्थिती काय असणार, ते पात्र एखाद्या परिस्थितीत काय विचार करेल, कसे वागेल, हे सगळे जणू त्या गीतकारांना कथा वाचताच आपोआप कळायचे!
त्या काळचे दिग्दर्शकही गीतकारांना मनापासून सन्मान देत असत. त्यामुळे हल्लीच्या गीतकारांना सहसा उपलब्ध नसणारे स्वातंत्र्य घेऊन जुने गीतकार उत्तम काव्यनिर्मिती करू शकत. जुनी गाणी वर्षानुवर्षे लोकांच्या ओठावर असण्याचे हे सुद्धा एक कारण असू शकेल! संगीतकाराचे योगदान तर अतिशय महत्त्वाचे असे! हल्लीसारखे नायक-नायिका आणि त्यांच्या त्या गाण्यापुरत्या साथीदारांना, ड्रीलवर नाचायला उपयोगी पडेल, असा ठेका संगीतकाराने रेकॉर्ड करून द्यायचा आणि त्यावर ‘साँग रॉयटर’ हेच नाव शोभणाऱ्या व्यक्तीने जमेल ते शब्द बसवायचे अशी रित
त्याकाळी नव्हती!
जे पात्र गाते आहे त्याच्या मनातला भाव हा त्या त्या गाण्याचा आत्मा असतो. पण तो अदृश्य असतो त्याला कवी शब्दांचे शरीर देतो. मग संगीतकार त्या शरीरावर सूर-तालाची सुंदर वस्त्रे घालतो, आशयाला अधिक स्पष्ट सुलभ करणाऱ्या रागाचा अलंकार चढवतो. त्यामुळे एखादे सुंदर गाणे आपल्यासमोर नववधू इतके सजूनधजून येते, तेव्हा त्यामागे गीतकाराइतकेच योगदान संगीतकाराचे असते.
एल. बी. लक्ष्मण आणि एल. बी. ठाकूर यांनी निर्मिलेला, १९६८ साली आलेला, ‘अनोखी रात’ अशा अनेक सुंदर गाण्यांनी भरलेला होता. ‘मिले ना फुल तो कांटोसे दोस्ती कर ली’ (रफी), ‘महलो का राजा मिला, तुम्हारी बेटी राज करेगी (लतादीदी),’ ‘मेरे बेरी के बेर मत तोडो, कांटा चुभ जायेगा’ (आशा भोसले), ‘ओह रे ताल मिले नदी के जल में’ (मुकेश), ही सर्व गाणी अनोखी रात मधलीच.
‘अनोखी रात’ने चार फिल्मफेयर पारितोषिके मिळवली – सर्वोत्कृष्ट पटकथा(हृषीकेश मुखर्जी), सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन (अमित बॅनर्जी), सर्वोत्कृष्ट संवादलेखन (आनंदकुमार), सर्वोत्कृष्ट छायाचित्रण (कमल बोस).
बिना का गीतमालात १९६९ साली गाजलेल्या पहिल्या ३७ लोकप्रिय गाण्यात ‘ओह रे ताल मिले नदी के जल में’चा क्रमांक दुसरा होता. पहिले गाणे होते, राजेंद्र कृष्णन यांनी ‘इन्तकाम’साठी लिहिलेले. “कैसे रहू चूपके मैने पीही क्या हैं? होश अभी तक हैं बाकी, और जरासी दे दे साकी और जरासी और..!’
‘अनोखी रात’चा नायक होता, संजीवकुमार, तर नायिका मोजकेच सिनेमे केलेली जाहिदा हुसैन. सोबत होते परीक्षित सहानी, अरुणा इराणी, अन्वर हुसैन आणि तरुण बोस. यात आधी एक साधाभोळा वॉचमन असलेला संजीवकुमार नंतर कुख्यात डाकू बनतो. आपण डाकू का बनलो, त्यामागच्या वेदनादायी पार्श्वभूमी सांगत असताना त्याच्या ‘फ्लॅश-बॅक’मध्ये जे गाणे येते, ते म्हणजे मुकेशच्या नितळ सात्त्विक आवाजातले, “ओह रे ताल मिले नदी के जल में…” संगीतकार रोशनलाल नागरथ यांनी पिलू रागात बसवून गाण्यात एक गूढ शांत असे वातावरण
निर्माण केले.
बलदेवा (संजीवकुमार) एक साधाभोळा माणूस आहे. त्याचे लग्न त्याच्या आवडत्या ‘गोपा’शी (जाहिदा हुसैन) पार पडले आहे. त्याच्या मनात तिच्याबद्दलची अपार ओढ आणि इतके दिवस दाबून ठेवलेले उत्कट प्रेम दाटून आलेले आहे. त्यामुळे त्याला सगळीकडे मीलन, दोन जीवांचे एकत्र येणे, एकरूपता दिसते आहे. या अनावर ओढीच्या शेवट काय होणार याबद्दल त्याला कुतुहूल आहे. म्हणून तो म्हणतो –
ओह रे ताल मिले नदी के जल में,
नदी मिले सागरमें,
सागर मिले कौनसे जल में,
कोई जाने ना…
ओह रे ताल मिले…
प्रेमविव्हळ, मीलनातूर प्रेमिकाला खरे तर अशा वेळी आपल्या आजूबाजूचे सगळेच आपल्यासारखे भासू लागते. त्याला जशी त्याच्या सुंदर मुग्ध गोपाला भेटायची, तिच्याशी एकरूप व्हायची, उत्कंठा लागून राहिली आहे, तशीच ती त्याला अवघ्या अस्तित्वात दाटून आली आहे, असे जाणवू लागते.
सूरज को धरती तरसे, धरती को चंद्रमा
पानी में सीप जैसे, प्यासी हर आत्मा,
प्यासी हर आत्मा, ओ मितवा रे
बुंद छुपी किस बादल में,
कोई जाने ना…
ओह रे ताल मिले…
तेजाचे विलोभानीय रूप असलेल्या सूर्याशी मीलनाची ओढ पृथ्वीला युगानुयुगे लागलेली आहे म्हणून ती त्याच्याभोवती अहोरात्र फिरते आहे. त्याच ओढीने शीतलतेचा प्रतीक बनलेला चंद्रही तिच्याभोवती अविरत फेऱ्या मारतो आहे.
जसा समुद्रातील शिंपला स्वाती नक्षत्रातील सरीचा एक थेंब आपल्या मुखात पडावा म्हणून आसुसलेला असतो, तसा प्रत्येक आत्मा अस्वस्थ आहे. मीलनासाठी आतुर आहे, असे बलदेवाला वाटते. मात्र, प्रेमपूर्तीचा, अंतिम मीलनाचा तो अनमोल मोती बनू शकणारा प्रेमाचा थेंब कोणत्या मेघात, कोणत्या आर्त अंत:करणात दडला आहे, हे कुणालाच कळत नाही!
बलदेवला त्याच्या स्वप्नातले हवे ते मिळाले आहे. आता गोपा त्याची सखी आहे, पत्नी आहे. तिलाच आपल्या बैलगाडीत घेऊन तो घरी निघाला आहे. तरीही त्याला आपले स्वप्न इतक्या सहज सत्यात उतरले हे खरेच वाटत नाही. जी काल आपल्याला अप्राप्य होती, स्वप्नवत भासत होती, ती आज आपली जन्मोजन्मीची जोडीदार झालेली आहे, हे पाहून त्याचा आनंद गगनात मावत नाही. तो स्वत:लाच विचारतो, ‘हे कसे शक्य आहे?’ देवा, जे कालपर्यंत अशक्य होते, ते आज सत्यात उतरले आहे! तुझ्या राज्यात कधी काय होईल, ते काही सांगता येत नाही रे बाबा!
अनजाने होठोंपर क्यों,
पहचाने गीत है, पहचाने गीत है.
कलतक जो बेगाने थे, जनमोके मीत है.
जन्मों के मीत है, ओ मितवा रे…
क्या होगा कौन से पल में, कोई जाने ना…
ओह रे ताल मिले नदी के जल में…
जुने कवी दिग्दर्शक प्रेमाचा उत्सव करून टाकत असत. अनेकदा तर ते एखाद्या गाण्यातून एक वेगळेच भावविश्व मनात उभे करत. तो काहीसा गूढ, संदिग्ध, अनाकलनीय पण तितकाच मधुर अनुभव घ्यायचा असेल, तर मागे जायला पर्याय नाही. म्हणून सहज मागे पाहता यावे म्हणून मनाचा ‘रियर मीरर’ सतत स्वच्छ पुसलेला हवा.