Saturday, July 13, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनयूट्यूबर आपली आजी

यूट्यूबर आपली आजी

  • दी लेडी बॉस : अर्चना सोंडे

लेडी बॉस म्हटलं की, आधुनिक पेहरावातील स्त्री दिसते. मात्र आपली आजी, सुमन आजी ही खऱ्या अर्थाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पारंपरिक पद्धतीने साडी नेसत डोक्यावर पदर घेणारी ‘लेडी बॉस’ आहे.

काय ही आजकालची पिढी. सतत त्या मोबाइलला चिकटलेली असतात. मोबाइलनं वाया घालवलंय, या पिढीला. आमच्या काळी असलं काही नव्हतं बाबा! असा संवाद अनेक वेळा आपण आपल्या वडीलधाऱ्या मंडळीकडून ऐकला असेल. नव्या पिढीचं तंत्रज्ञान हे टाकाऊच, असं प्रत्येक पिढीला वाटत आलंय. मोबाइलला नावं ठेवणाऱ्या पिढीत जेव्हा टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आला, तेव्हा त्या अगोदरच्या पिढीनेही या टीव्हीवाल्या पिढीला नावे ठेवली होती. खरं तर बदल ही काळाची गरज असते. नव्या तंत्रज्ञानाला नावे न ठेवता ती आत्मसात करून आपलं जीवन सुसह्य कसं करता येईल? याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. एका आजीने हा बदल आपलासा केला. नातवाने दाखवलेल्या यूट्यूब या नवमाध्यमाला आपलंसं केलं. विशेष म्हणजे शाळेची पायरीदेखील न चढलेल्या आजीच्या ‘आपली आजी’ या यूट्यूब चॅनेलचे जगभरात १० लाख सबस्क्राइबर्स आहेत आणि ही आजी घरबसल्या लाखो रुपये कमावते. ही आपली आजी म्हणजे सुमन गोरक्षनाथ धामणे.

सुमन आजीचं वय ६५ वर्षे असून त्या अहमदनगरमधील कासारसारोळा या गावच्या. नगरमधील सुपं हे त्यांचं माहेर. सुमन आजींना ४ भाऊ आणि ६ बहिणी. घरातील मोठ्या बहिणी आणि ४ वहिनी यांच्याकडून लहानपणापासूनच त्यांना स्वयंपाक करायची आवड निर्माण झाली. सुमन आजींनी कधी शाळेचं तोंडदेखील पाहिलं नव्हतं. पुढे सुमन बाईंचं लग्न झालं. त्यांचे पती पोलीस खात्यात होते. आता निवृत्त आहेत. पती पोलीस असल्यामुळे घरात त्यांना खूप वेळ मिळायचा. त्या वेळेचा सदुपयोग करत सुमनआजी आणि त्यांच्या आजूबाजूच्या महिला घरात नवनवीन खाद्यपदार्थ बनवायच्या. एकदा त्यांचा नातू यश पाठक त्यांच्या घरी आला असताना त्याने सुमन आजींना पावभाजी बनवायला सांगितली. पण मला पावभाजी बनवता येत नाही, असं त्या म्हणाल्या. त्यावर यशने आजींना पावभाजीची रेसिपी मोबाइलमधल्या यूट्यूबवर दाखवून तशी बनवायला सांगितली. आजीबाईंनी ती बनवली देखील आणि बनलेल्या पावभाजीचं सर्वांनीच कौतुक केलं.

नंतर यशने आजीला असे वेगवेगळे पदार्थ बनवून यूट्यूबवर दाखविण्याची आयडिया सांगितली. नातवाचं म्हणणं कोणतीही आजी नाकारत नाही. यशच्या सांगण्यावरून आजींनी यूट्यूबसाठी रेसिपी बनवायला सुरुवात केली. सुमन आजीला बरेच पदार्थ बनवता येत नव्हते, पण त्या खूप जिद्दीच्या आहेत, आपल्याला पदार्थ बनवता येत नाही म्हणून त्यांनी हार न मानता तो पदार्थ शिकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्या मोबाइलवर रेसिपीचे व्हीडिओ पाहत आणि नंतर तो पदार्थ बनवून दाखवायला लागल्या. पाहता पाहता अनेक लोकांनी आजीबाईंच्या रेसिपीला पसंती दाखवली. रेसिपी आपल्या नगरच्या ग्रामीण भाषेतच सांगायच्या. त्यांच्या बोलण्याची स्टाईल लोकांच्या मनात घर करून गेली. तो लहेजा लोकांना खूपच आवडला. अल्पावधीतच सुमन आजींचं ‘आपली आजी’ हे यूट्यूब चॅनेल प्रसिद्ध झालं. हे वाटतं तितकं सोप्पं मुळीच नव्हतं. सुमन आजी कॅमेऱ्यासमोर बोलायला बिचकायच्या. सॉस, केचअप, मिक्सर सारखे इंग्रजी शब्द बोलताना अडखळायच्या. मात्र नातू यशने त्यांना आत्मविश्वास दिला. त्यांना नीट समजावून त्यांच्याकडून सराव करून घेतला. आज “आपली आजी’ यूट्यूब चॅनेलला सिल्व्हर प्ले बटन मिळालं, तर बेस्ट यूट्यूब क्रिएटरचा पुरस्कारदेखील मिळाला आहे.

सुरुवातीला त्यांच्या यूट्यूब चॅनलने चांगलच यश मिळवलं होतं. पण त्यातदेखील खूप मोठा अडथळा आला. त्यांनी बनवलेलं चॅनेल हॅक झालं. त्यामुळे आजी घाबरून गेल्या. पण नातू यशने अथक प्रयत्न करून ते चॅनल परत मिळवले आणि पुन्हा आजीबाई जोरात कामाला लागल्या. वर्षभरातच आजीबाईंनी खूपच प्रसिद्धी मिळवली. आज ‘आपली आजी’ या यूट्यूब चॅनेलचे १५ लाख सबस्क्राइबर्स आहेत. एकूण ५९३ व्हीडिओ या चॅनेलवर असून २१ कोटी लोकांनी हे व्हीडिओज पाहिले आहेत. त्यांच्या कारल्याच्या रेसिपीला, तर ८४ लाख व्ह्यूव्ज आहेत. “तुम्ही कोणते मसाले वापरता” असे अनेक वेळा रसिक खवय्ये त्यांना विचारत. ‘गरज ही शोधाची जननी’ हे वाक्य सार्थ ठरवत सुमन आजींनी स्वत:च मसाले तयार करण्यास सुरुवात केली. या मसाल्यांना देखील प्रचंड प्रतिसाद मिळाला. वर्षभरात त्यांनी तब्बल ३० ते ४० लाख रुपयांचा मसाल्यांचा व्यवसाय देखील केला. आज त्यांनी बनवलेले हे मसाले भारताच्या कानाकोपऱ्यांत जातातच. पण बाहेरसुद्धा अनेक देशात जातात. लेडी बॉस म्हटलं की, आधुनिक पेहरावातील स्त्री दिसते. मात्र आपली आजी, सुमन आजी ही खऱ्या अर्थाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पारंपरिक पद्धतीने साडी नेसत डोक्यावर पदर घेणारी ‘लेडी बॉस’ आहे. “नमस्कार बाळांनो, कसे आहात सगळे, आज आपण ही रेसिपी पाहणार आहोत” सुमन आजीचे शब्द कानावर पडताच, आपल्या आजीची आठवण होते. शिक्षण, भांडवल, वय, संधी, परिस्थिती, भौगोलिक ठिकाण अशी अनेक कारणे देत प्रयत्न न करणाऱ्या प्रत्येकाला सुमनआजीचे हे चोख उत्तर आहे, तर नवीन काही शिकू पाहणाऱ्या, प्रयत्न करणाऱ्या, जिद्द बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी सुमनआजी प्रेरणा आहेत.

theladybosspower@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -