Monday, July 22, 2024
Homeसाप्ताहिककोलाजभावविश्व मुलांचे

भावविश्व मुलांचे

मुलांमध्ये भीती निर्माण होण्याची कारणे - पालकांची सतत भांडणे, व्यसनी पालक, शाळेतील शिक्षकांकडून शिक्षा अशी अनेक आहेत. या गोष्टी टाळणे आवश्यक आहे.

  • ओंजळ : पल्लवी अष्टेकर

छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल, कोल्हापूर येथे समुपदेशक म्हणून कामाला असताना आलेला हा अनुभव. एक पंधरा-सोळा वर्षांचा मुलगा पोलिसांमार्फत या सरकारी दवाखान्यात आला होता. पोलिसांनी अतिशय कृश अवस्थेत त्याला इथे आणला होता. त्याचे नाव सुनील होते. त्याचे पालक शोधून काढण्याचे काम तिथले मेडिकल सोशल वर्कर यांनी आमच्यावर सोपविले होते.

सुनील कित्येक दिवस आमच्याशी बोलण्यास तयार नव्हता. नंतर तो हळूहळू आमच्याशी बोलू लागल्यावर तो आपल्या वडिलांशी भांडून घरातून पळून आला होता, असे समजले. भावनेच्या आवेगात घरातून काही पैसे घेऊन तो बाहेर पडला. रेल्वे व बसने प्रवास करत तो कोल्हापूरला पोहोचला. हे शहर त्याला पूर्ण अनोळखी होते. कुणीतरी दिलेल्या भाकर-तुकड्यावर, कधीतरी मिळालेल्या एखाद्या फळावर तो गुजराण करीत असे. त्यातून त्याची प्रकृती कृश होत चालली होती. एकदा कोपऱ्यात शुन्यात डोळे लावून बसलेला सुनील पोलिसांच्या पाहण्यात आला. त्यांनी सुनीलला या सरकारी इस्पितळात दाखल केले. दररोज दोनवेळचे व्यवस्थित जेवण मिळू लागल्यावर तो थोडा ताजातवाना दिसू लागला. तो बिहारमधील त्याच्या गावातील शालेय शिक्षण सोडून इथे आला होता. आम्ही त्याला त्याचे कुटुंबीय, शाळा सोडून आल्याचे दुष्परिणाम समजावत होतो. सुनीलला हे पटले व त्याने एके दिवशी आम्हाला त्याच्या घरचा पत्ता सांगितला. मग आम्ही त्या पत्त्यावर पत्र पाठवून तुमचा मुलगा प्रवास करत, पोलिसांमार्फत या इस्पितळात आल्याचे कळविले. साधारण ऑगस्टपासून आम्ही त्याच्या कुटुंबीयांना पत्रं पाठवित होतो. पण, त्याच्या पालकांचे उत्तर येत नव्हते. त्यामुळे त्याने सांगितलेला पत्ता अपुरा आहे की काय, असा प्रश्न आम्हाला पडला; परंतु आमच्या प्रयत्नांना यश आले आणि सुनीलचे पालक त्याला न्यायला येतो म्हणाले. ते हॉस्पिटलच्या पत्त्यावर सुनीलला नेण्यास आले. तो त्यांच्यासहित आमच्याही आयुष्यातील आनंदाचा क्षण होता. “पुन्हा अशी चूक होणार नाही”, असे सांगून सुनील त्याच्या पालकांसमवेत बिहारला निघून गेला. मुलांमध्ये ‘भीतीचा विळखा’ हा देखील पालकांनी लक्ष घालण्यासारखा महत्त्वाचा विषय आहे.

रेवती व श्रेयस ही सख्खी भावंडे. श्रेयस दहावीत तर रेवती चौथीत. एकदा रेवती आपल्या मैत्रिणीकडे गेली असताना मैत्रिणीच्या घरच्यांनी भीतीदायक चित्रपट लावला होता. तो रेवतीनेसुद्धा त्यांच्यासोबत बसून पाहिला. पण घरी आल्यापासून ती सतत घाबरल्याप्रमाणे करू लागली. ती अचानक दचकायची. कुटुंबीयांनी तिची ही परिस्थिती दोन-तीन आठवडे तशीच पाहून मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेतली. त्यांनी रेवतीशी व तिच्या पालकांशी मनसोक्त गप्पा मारून, सौम्य औषधांनी तिच्या मनातील भीती काढून टाकली. पण, त्यासाठी तीन-चार महिन्यांचा कालावधी जाऊ द्यावा लागला. आता रेवतीचे दैनंदिन रुटीन मार्गी लागले. मुलांमध्ये भीती निर्माण होण्याची कारणे – पालकांची सतत भांडणे, व्यसनी पालक, शाळेतील शिक्षकांकडून शिक्षा अशी अनेक आहेत. या गोष्टी टाळणे आवश्यक आहे. परिणाम स्वरूप मुले अति विचार करणे, एकलकोंडेपणा यात गुरफटतात. वेळीच सावधानतेने मुलांना भीतीच्या विळख्यातून बाहेर काढणे आवश्यक आहे. अन्यथा जगात वावरण्यासाठी लागणारा आत्मविश्वास त्यांच्याजवळ येत नाही.

बाल मार्गदर्शन केंद्रात मी समुपदेशक म्हणून काम करत असताना एक पालक त्यांच्या एकुलत्या एका मुलीसोबत आले होते. ते काहीसे वैतागलेले व चिडलेले होते. त्यांच्या मुलीचे नाव केतकी होते. केतकीला बाहेर वेटिंग रूम मध्ये बसवून त्यांना आधी माझ्यासोबत बोलायचे होते. वडील म्हणाले, “आमच्या केतकीला शाळेत जायला अजिबात आवडत नाही. आमच्यासाठी ही अतिशय गंभीर समस्या झाली आहे. गेल्या चार वर्षांत आम्ही दोनदा तिची शाळा बदलली. तिथे परिस्थिती सुधारेल, अशी आशा आम्हाला वाटत होती. परंतु तसे घडले नाही.”

आई म्हणाली “हो ना. माझी तर झोपच उडाली आहे यामुळे !’’ मग मी केतकीशी बोलायचे ठरविले. मी एकटीच तिच्यासोबत भरपूर वेळ गप्पा करत होते. पण केतकी स्वतःच्याच विश्वात मग्न होती. दिसायला ती अतिशय टापटीप, मॅचिंग कानातले, बांगड्या अशा वेशात आली होती. बऱ्याच वेळानंतर ती म्हणाली, “मला शाळेत जायला आवडत नाही. कंटाळा येतो,
करमत नाही.’’

“असे म्हणून कसे चालेल केतकी? तुझ्या वयातील सर्व मुले शाळेत जातात. मग तुलाही जायला हवे ना?’’ मी म्हटले. पण केतकीने काही उत्तर दिले नाही. तिच्या समस्येभोवतीची परिस्थिती समजून घेण्यासाठी मी आणखीही समुपदेशनाचे सेशन्स घेतले. पण समस्या जैसे थे. त्यामुळे केतकीच्या आई-वडिलांची चलबिचल मात्र वाढत होती. मग आम्ही मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेतली. एकूण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मानसोपचार तज्ञांनी या समस्येला ‘डे ड्रीमिंग’ अर्थात स्वप्नावस्था अशा संज्ञेने संबोधले. अशा स्वप्नावस्थेत मूल हे भोवतालच्या वास्तवाचे भान विसरून स्वतःच्या तयार केलेल्या काल्पनिक विश्वात रममाण होते. त्यामागील कारणे आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा केतकी भोवती नैराश्याची झालर दिसली. चार वर्षांपूर्वी केतकीच्या आजीचे निधन झाले होते. तिला आजीचा खूप लळा होता. तिच्या बाल्यावस्थेत तिच्या आजीने तिला अतिशय मायेने सांभाळले होते. त्यामुळे आजीच्या अचानक जाण्याने केतकीच्या जीवनात पोकळी निर्माण झाली होती. आम्ही तिच्या पालकांना याबाबत विश्वासात घेऊन सांगितले की, जन्म-मृत्यूबद्दल तिच्या वयानुसार तुम्ही तिला समजावणे जरूरीचे आहे. त्यामुळे तिचे उदासिनतेचे मळभ दूर होऊ शकेल आणि तिला वास्तवाची जाणीव होईल. मानसोपचार तज्ज्ञांनी केतकीची सद्य परिस्थिती सुधारण्यासाठी काही मार्ग सुचविले. त्यातला पहिला टप्पा म्हणजे योग्य प्रकारच्या व्यायामाला सुरुवात. जसे की पोहणे, टेनिस क्लास इत्यादी. केतकीचे समाजात मिसळणे तितकेच आवश्यक होते. त्यामुळे तिच्या सोसायटीतील साधारण तिच्या वयोगटातील मित्र-मैत्रिणींशी तिला खेळण्यास उद्युक्त करणे जरुरीचे होते.

मानसोपचार तज्ज्ञांनी सायकोथेरपीच्या मदतीने, कॉग्निटीव्ह बिहेव्हियरल थेरपीच्या साहाय्याने अशा मुलांना डे ड्रीमिंगमधून बाहेर काढले आहे. प्रत्येक पालकांची इच्छा असते की, आपल्या पाल्याने सुरक्षित, आनंदी जीवन जगावे. मग त्यासाठी प्रयत्न करणे पालकांची जबाबदारी आहे. या झालेल्या समस्यांमध्ये जर पालक व पाल्य यांचे नाते सुदृढ असते किंवा मुलांनी वेळीच पालकांशी संवाद साधला असता तर समस्या इतक्या जटील नसत्या. त्यामुळे हे नाते निर्मळ, नितळ, पारदर्शक व जवळकीचे ठेवणे हे पालकांचे काम आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -