Tuesday, December 3, 2024
Homeकोकणसिंधुदुर्गकुर्ली - घोणसरी धरणग्रस्तांना मिळणार जास्तीत जास्त मोबदला

कुर्ली – घोणसरी धरणग्रस्तांना मिळणार जास्तीत जास्त मोबदला

आ. नितेश राणे यांची कालव्याच्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकाऱ्यांसमवेत झाली बैठक

कणकवली (प्रतिनिधी) : कुर्ली-घोणसरी धरणाच्या कालव्याचे प्रश्न आणि फोंडाघाट, घोणसरी,लोरे, वाघेरी पियाळी या गावातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत संबधित अधिकारी, शेतकरी यांची बैठक घेऊन चर्चा केली. भूसंपादनाचा मोबदला यापूर्वी जमीन मालकांना खूपच कमी दिला असून तो जास्तीत जास्त देण्याविषयी सकारात्मक चर्चा झाली. कालवा कॅनॉल पद्धतीने बनवावा, तो बंदिस्त पाइपलाइन पद्धतीचा नको यावर चर्चा झाली, तर २०१६ साली भूसंपादन न करताच शेतकऱ्यांच्या जमिनीतून कॅनॉल खोदण्यात आला, त्याचा मोबदला अद्यापही दिलेला नाही. तो योग्य मोबदलासुद्धा त्वरित द्यावा, यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान जास्तीत जास्त मोबदला देण्याविषयीचा प्रस्ताव तयार करून त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे यावेळी ठरवण्यात आले.

सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या दालनात भाजपचे कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कुर्ली-घोणसरी धरणाच्या डाव्या तीर कालव्याची बैठक झाली. या बैठकीला पुनर्वसन अधिकारी श्रीमती सिंगाडे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हर्षद यादव, कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी, माजी सभापती तुळशीदास रावराणे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके, भाजपचे जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, भाजप तालुका अध्यक्ष संतोष कानडे,आबू पटेल, सुनील लाड, पांचाळ, श्रीपादकर आदींसह फोंडा पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.

कुर्ली, घोणसरी धरणाच्या कालव्यात शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. भूसंपादन योग्य पद्धतीने केले नाही. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. काही वर्षांपूर्वी भूसंपादन न करताच कालव्याची खोदाई करण्यात आली. त्याचाही मोबदला दिलेला नाही. पाईपलाईन पद्धतीने कालवा केला जाण्याची शक्यता असून त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. ओपन कॅनॉल तयार करून कालवा काढला जावा, असे यावेळी चर्चात सांगण्यात आले. अशा अनेक मुद्द्यांवर जिल्हाधिकाऱ्यांसमवेत चर्चा झाल्यानंतर या संदर्भात तातडीने निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -