Tuesday, December 3, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीदेव हा अनुभवण्याचा विषय

देव हा अनुभवण्याचा विषय

  • जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै

सर्व ठिकाणी देव भरलेला आहे, हे बरोबर आहे. पण, सर्व ठिकाणी जीवन आहे. सर्व ठिकाणी जंतू आहेत. खरे सांगायचे तर, या जगांत किती जंतू आहेत? अब्जावधीपेक्षा कितीतरी जास्त जंतू या जगांत आहेत. जगात किती जंतू आहेत याची कल्पना केली तरी सगळे जगच जंतूनी भरलेले आहे. सर्व ठिकाणी जीव आहे व हा जीव ब्रम्ह आहे.
“जीवो एवं ब्रम्ह इति वेदांत डिंडिंम मा”। जीव ब्रम्ह आहे, जीव देव आहे, जीव आत्मा आहे, जीव परमात्माआहे. सगळे काही जीवच आहे.

“ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा”। इथे लक्षात घ्या, देव अत्यंत उपलब्ध आहे म्हणजे तो सर्व ठिकाणी आहे. तो अत्यंत उपयुक्त आहे व तो अत्यंत सूक्ष्म आहे. हवा आपल्याला दिसत नाही, आका आपल्याला दिसत नाही, तिथे देव कसा दिसणार?आपले मन आपल्याला दिसत नाही तिथे देव कसा दिसणार? हे लोक विचारच करत नाहीत. लोकांना ते माहीत नाही. देव हा अत्यंत सूक्ष्म आहे आणि तो डोळ्यांना दिसण्याचा विषयच नाही. हवा डोळ्यांना दिसत नाही, तिला स्पर्श करता येत नाही, पाचही ज्ञानेंद्रियांना तिचा अनुभव येऊ शकत नाही, तरी हवा आहे. हवाआहे हा साक्षात्कार केव्हा होईल? नाक दाबून तोंडात बोळा घालाल, तेव्हा तो म्हणेल हवा आहे. पाण्यांत बुडणारा माणूस हवा मिळत नाही म्हणून कासावीस होतो. गुरुत्वाकर्षण शक्ती आहे की नाही? हे डोळ्यांना दिसते का? नाही. कानांना ऐकू येते का? नाही. ज्ञानेंद्रियांना आकळता येते का? नाही. तरी ती आहे म्हणून हे जग चाललेले आहे. “चाले हे शरीर कुणाचिये सत्ते”. गुरुत्वाकर्षण शक्ती जर नसेल, तर हे जग चालणार नाही, हवा जर नसेल, तर हे जग चालणार नाही, प्रकाश जर नसेल, तर हे जग चालणार नाही, पाणी जर नसेल, तर हे जग चालणार नाही, पृथ्वी जर नसेल, तर हे जग चालणार नाही. हे सगळे पाहिजे. ही पंचमहाभूते सगळीच पाहिजे. तुम्हाला एक लक्षात येईल की, हे सर्व दिव्यआहे. देव हा शब्द सुद्धा दिव्य या शब्दापासून आलेला आहे. जगात सर्व जे आहे ते दिव्यआहे. हे जे दिव्यतत्व आहे, त्या ठिकाणी दिव्यशक्ती आहे, दिव्यआनंद आहे, दिव्य ज्ञान आहे, दिव्य जाणीव आहे, दिव्य प्रतिभा ज्ञान आहे. त्याला पाहता येत नाही, तो दिसणार नाही, तो पाहण्याचा विषयच नाही, कितीही डोके आपटले तरी तो दिसणार नाही. काही लोक सांगतात, आम्ही देव पाहिला, तेव्हा ते थापा मारतात, खोटे बोलतात. देव हा अनुभवण्याचा विषय आहे, तो पाहाण्याचा विषय नाही. मी याआधीही उदाहरण दिले आहे की, त्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा अनुभव घ्यायचा असेल, तर चार मजल्यावरून उडी मार. एवढे लांब की, एखादी वस्तू खाली टाका, ती खाली पडते, कारण गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध न्यूटनने असा लावला. पूर्वीही ती होतीच म्हणून त्याला इन्व्हेन्शन म्हणत नाहीत, तर डिस्कव्हरी म्हणतात. पूर्वी ती होतीच, पण नंतर कळली. मी नेहमी सांगतो की, गुरुत्वाकर्षण शक्ती is next to God. किती महत्वाची आहे, तर ती आहे म्हणून जग चाललेलेआहे. गुरुत्वाकर्षण शक्ती कुणाची सत्ता? देवाची सत्ता. “चाले हे शरीर कुणाचिये सत्ते” किंवा “तुझिया सत्तेने सूर्यासी चालणे” म्हणजेच देवाची सत्ता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -