Friday, December 13, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीज्ञानेश्वरी: कोमल कविमनाचा उद्गार

ज्ञानेश्वरी: कोमल कविमनाचा उद्गार

  • ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेवरील भाष्य होय. म्हणून यात ठायी ठायी भगवद्गीतेचा महिमा येतो. अठराव्या अध्यायाच्या समारोपप्रसंगी तर गीतेची ही महती ज्ञानदेव अतिशय उत्कटतेने, समर्थपणे रेखाटतात. त्यावेळच्या काही सुंदर ओव्या आहेत. या ओव्यांमध्ये अप्रतिम दृष्टान्त आले आहेत.

भगवद्गीतेचे एकूण सातशे श्लोक आहेत. ते एकाहून एक सरस आहेत. तर या श्लोकांत लहान व मोठा असा वेगळेपणा कसा करता येईल? हा विचार सांगताना माऊली म्हणतात, कामधेनूकडे बघितले म्हणजे जशी ती दुभती (दूध देणारी) व आटलेली या गोष्टी करूच नयेत (ती दुभतीच असणार) दिव्यांमध्ये अगोदरचा व मागचा कोणता व सूर्याकडे पाहिले म्हणजे धाकटा किंवा मोठा हे समजत नाही. अमृत समुद्र खोल किंवा उथळ आहे असे म्हणता येईल का? तसेच गीतेच्या सातशे श्लोकांत पहिला व शेवटचा हे म्हणता येत नाही. पाहा की, सुवर्णपारिजातकाच्या पुष्पांत ताजी व शिळी असा भेद करता येईल का?

तान्ही आणि पारठी । इया कामधेनूतें दिठी।
सूनि, जैसिया गोठी। कीजती ना। ओवी १६७८
आपण ‘तान्ह बाळ’ म्हणतो. माऊलींनी ‘तान्ही गाय’ म्हणून किती कोमलता आणली आहे.
दीपा आगिलु मागिलु | सूर्य धाकुटा वडीलु ।
अमृतसिंधु खोलु । उथळु कायसा? ॥ ओवी क्र. १६७९

आगिलु म्हणजे पुढचा तर मागिलु म्हणजे मागचा होय. इथे ‘लु’च्या पुनरावृत्तीने किती नादमय ओवी झाली आहे. पुन्हा ‘आगिलु मागिलु, धाकुटा वडीलु, खोलु उथळु’ अशा परस्परविरोधी जोड्यांत केवढा अर्थ व सुंदरता आहे!

तैसे पहिले सरते। श्लोक न म्हणावे गीते।
जुनीं, नवीं पारिजातें। आहाती काई ? || ओवी क्र. १६८०

सरते म्हणजे शेवटचा होय. अतिशय यथार्थ, सरस असे हे दृष्टान्त आहेत. ज्ञानदेवांचे दृष्टान्त हे व्यापक, विराट रूपाचं दर्शन देणारे असतात, तसेच हेही दृष्टान्त आहेत, जसे सर्व विश्वाला व्यापणारा सूर्य किंवा समुद्र होय. त्याचबरोबर ते स्वर्गीय असतात, जसे कामधेनू (सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय), अमृताचा सागर किंवा पारिजातक होय. पारिजातक हे स्वर्गीय झाड मानले जाते. ते पृथ्वीवर आणले गेले अशी कविकल्पना आहे. मनमोहक सुगंध व सुंदर रूप हे त्याचे विशेष होत; परंतु त्या पारिजातकाच्या ठिकाणी शिळेपणा येतो, ती फुले कोमेजतात. तेव्हा ज्ञानदेव गीतेच्या श्लोकांना सुवर्णपारिजातकाचा दाखला देतात. सुवर्णाचे असल्याने ते पारिजातकाचे फूल नेहमी आहे तसेच राहणार, ताजे राहणार. भगवद्गीता ही देखील अशीच आहे, त्यातील श्लोकांमध्ये अपार सौंदर्य आहे. हे सौंदर्य विचारांचं, कल्पनेचं आणि शब्दांचं आहे.

ते कधीच नाहीसे होणार नाही. पुन्हा सुवर्ण हे मौल्यवान, त्याप्रमाणे भगवद्गीताही मौल्यवान, खरं तर अनमोल आहे हेही यातून ज्ञानदेव सूचित करतात.

पारिजातकाचा दाखला का द्यावा? यातही खूप अर्थ आहे. पारिजातक हे फूल खूप कोमल, नाजूक, पांढरंशुभ्र आणि केशरी देठ असं असतं. त्याच्या सुगंधाने संपूर्ण परिसर दरवळून जातो. भगवद्गीतेतील श्लोक आकाराने लहान आहेत. त्यात विचारांची शुभ्रता आहे, संन्याशाप्रमाणे विरक्तीचा विचार आहे. (केशरी रंग हा विरक्तीचे प्रतीक) या श्लोकांच्या या सर्व सामर्थ्यामुळे मानवी जीवन उजळून निघतं, सुगंधित होतं. हे सगळं ज्ञानदेव या दृष्टान्तांतून सुचवू पाहतात. एका अर्थी असे दृष्टान्त म्हणजे ज्ञानदेवांच्या असीम सौंदर्यदृष्टीचे उद्गारच आहेत!

([email protected])

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -