कोची वॉटर मेट्रो, रेल्वे प्रकल्प आणि डिजिटल सायन्स पार्कचा समावेश
तिरुवनंतपुरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळ मधील तिरुवनंतपुरम येथील मध्यवर्ती क्रीडांगणात ३,२०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये कोची वॉटर मेट्रोचे लोकार्पण, विविध रेल्वे प्रकल्प आणि तिरुवनंतपुरम येथील डिजिटल सायन्स पार्कची पायाभरणी यांचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी सुमारे २०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून या संपूर्ण प्रकल्पाच्या उभारणी साठी अंदाजे १५१५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. याआधी सकाळी, पंतप्रधानांनी तिरुवनंतपुरम आणि कासारगोड दरम्यानच्या केरळच्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला झेंडा दाखवून रवाना केले.
पंतप्रधानांनी रेल्वेच्या दिंडीगुल-पलानी-पलक्कड विभागाच्या विद्युतीकरण प्रकल्पाचे देखील लोकार्पण केले. याच कार्यक्रमात, पंतप्रधानांनी थिरूवनंतपुरम, कोझिकोडे आणि वारकला शिवगिरी रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, नेमन आणि कोचुवेली सह संपूर्ण थिरूवनंतपुरम भागाचा व्यापक विकास तसेच थिरूवनंतपुरम-शोरानुर या टप्प्यातील रेल्वे मार्गाच्या गतीत वाढ करण्यासह विविध रेल्वे प्रकल्पांची कोनशीला रचली.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. केरळच्या विकास आणि संपर्क यंत्रणेशी संबंधित विविध प्रकल्पांचे आज अनावरण करण्यात आले आहे, ज्यामध्ये राज्याची पहिली वंदे भारत एक्सप्रेस, कोचीची पहिली वॉटर मेट्रो आणि अनेक रेल्वे विकास कार्यांचा समावेश आहे, असे आजच्या प्रकल्पांचा उल्लेख करून पंतप्रधानांनी या सर्व विकास प्रकल्पांबद्दल केरळच्या जनतेचे अभिनंदन केले.
कोची वॉटर मेट्रो हा मेड इन इंडिया प्रकल्प असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि त्यासाठी बंदरांचा विकास केल्याबद्दल कोची शिपयार्डचे अभिनंदन केले. कोची वॉटर मेट्रो देशातील इतर राज्यांसाठी आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा अत्यंत वैशिष्टयपूर्ण प्रकल्प बॅटरीवर संचालित विद्युत मिश्र प्रकारच्या बोटींचा वापर करून कोच्ची परिसरातील १० बेटांना कोच्ची शहराशी सुलभतेने जोडतो. तर तिरुवनंतपुरममधील डिजिटल विज्ञान पार्कसारख्या प्रकल्पांमुळे डिजिटल इंडियाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
या रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा शंभरावा भाग सादर होणार आहे आणि हा भाग देशाच्या विकासामध्ये योगदान देणाऱ्या सर्व नागरिकांना तसेच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला समर्पित केलेला आहे अशी माहिती त्यांनी दिली. विकसित भारताच्या उभारणीसाठी देशातील प्रत्येकाला देशाप्रती समर्पित व्हावे लागेल असे सांगून पंतप्रधानांनी त्यांचे भाषण संपविले.
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन, थिरूवनंतपुरम येथील संसद सदस्य डॉ. शशी थरूर आणि केरळ राज्य सरकारमधील मंत्र्यांसह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
केरळच्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिरुअनंतपुरम आणि कासरगोड दरम्यानच्या केरळमधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला तिरुअनंतपुरम सेंट्रल स्टेशनवरुन हिरवा झेंडा दाखवला. कार्यक्रमस्थळी आल्यानंतर पंतप्रधानांनी तिरुअनंतपुरम-कासरगोड वंदे भारत एक्स्प्रेसची पाहणी केली. त्यांनी गाडीतून प्रवास करणाऱ्या मुलांशी तसेच ट्रेनच्या कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. ही गाडी तिरुअनंतपुरम, कोल्लम, कोट्टायम, एर्नाकुलम, त्रिशूर, पलक्कड, पठानमथिट्टा, मलप्पुरम, कोझिकोड,कन्नूर आणि कासरगोड या ११ जिल्ह्यांतून प्रवास करेल. यावेळी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते.