उत्तराखंड : केदारनाथ येथे गेल्या ७२ तासांपासून बर्फवृष्टी सुरु आहे. बाबांच्या दर्शनासाठी मंदिरात जाणार्या हजारो भाविकांना या खराब वातावरणामुळे रोखण्यात आले होते. मात्र केदारनाथ धामचे दरवाजे मंदिराचे मुख्य पुजारी जगद्गुरू रावल भीम शंकर लिंग शिवाचार्य यांनी सकाळी ६:२० वाजता उघडले. मंदिराला २० क्विंटल फुलांनी सजवण्यात आले आहे. प्रशासनाने रोखल्यानंतरही मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले. सूत्रांनुसार, ८ हजारांहून अधिक लोक बाबांच्या दर्शनासाठी जाणार आहेत.
तापमान उणे ६ अंशांच्या आसपास असूनही पहाटे ४ वाजल्यापासूनच दर्शनासाठी भक्तांच्या मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरवाजे उघडण्याची प्रक्रिया पहाटे ५ वाजल्यापासून सुरु करण्यात आली. धार्मिक परंपरा पार पाडण्यात आली. भाविकांनी केलेल्या जयघोषासोबत बाबा केदार यांची पंचमुखी भोग मूर्ती पालखीतून रावल निवास येथून मंदिर परिसरात नेण्यात आली. ही पालखी सोमवारी दुपारी केदारनाथ धाममध्ये पोहोचली.
शनिवारी अक्षय्य तृतीयेपासून चारधाम यात्रेला सुरुवात झाली. पुढील ५ दिवसांत हिंदू यात्रेकरू बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्रीला भेट देतील. २२ एप्रिल रोजी गंगोत्री आणि यमुनोत्रीचे कपाट उघडण्यात आले. बद्रीनाथ धामचे दरवाजे २७ एप्रिलला उघडणार आहेत.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार केदारनाथमध्ये पुढील एक आठवडा अतिवृष्टी आणि खराब हवामानाची शक्यता आहे. उत्तराखंड सरकारने केदारनाथमध्ये सुरु असलेली अतिबर्फवृष्टी आणि हवामान खात्याने दिलेला इशारा लक्षात घेऊन ३० एप्रिलपर्यंत चारधाम यात्रेसाठी यात्रेकरुंची नोंदणी थांबवली आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनही आवश्यक कार्यवाही करत आहे. राज्य सरकारने यात्रेकरुंना सुरक्षिततेसाठी योग्य ती काळजी घेण्याची सूचना दिली आहे.