मुख्यमंत्री बदलेल पण सरकार बदलणार नाही
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार १५ दिवसात कोसळणार असे बेताल वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. राऊतांना शकुनी मामा, वेडा झालेला प्राणी, कीडा अशा उपमा देत शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांनी डिवचले. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही मुख्यमंत्री बदलेल पण सरकार बदलणार नाही, असे म्हणत संजय राऊतांची खिल्ली उडवल्याने राजकारण अधिकच तापले आहे.
“सुप्रीम कोर्टाचा निकाल आता तरी सरकार त्यांचेच राहील. कदाचित मुख्यमंत्री पदी असलेली व्यक्ती बदलू शकते. पण सरकार बदलणार नाही.” असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकार १५ दिवसात कोसळेल असे वक्तव्य राऊतांनी केले होते.
राज्यातील राजकारणावर अनेक दावे केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भुजबळ म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आगामी राजकीय गणितं अवलंबून आहेत. १६ आमदारांची सुप्रीम कोर्टात केस सुरु आहे. त्यांच्याविरुद्ध निकाल जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यात आहेत. ते मुख्यमंत्री पदावरून गेले तर दुसरा मुख्यमंत्री येईल. पण जर तरच्या गोष्टी आहेत. त्यांच्याविरोधात निकाल जाईलच याची काय खात्री आहे? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला.
याच मुद्दयांवर बोलताना ते पुढे म्हणाले की, न्यायालयाचा निकाल आलाच तर मुख्यमंत्रीपद गेले तरी या सरकारला १६५ आमदारांचा पाठिंबा आहे. १६ गेले तरी १४९ आमदार शिल्लक राहतात. सरकार त्यांचेच राहील. मुख्यमंत्री पदी असलेली व्यक्ती बदलू शकते. पण सरकार बदलणार नाही.
गेल्या काही दिवसापासून राज्यात अजित पवार राज्याचे मुखमंत्री होणार अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी स्वत: अजित पवार यांनीही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे वक्तव्य केले होते. त्यावर देखील भुजबळ यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, “अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी एक तर मुख्यमंत्री पद खाली पाहिजे. नंतर संबंधित आमदारांचा सपोर्ट लागतो. ते अनेक वर्षात राजकारणात आहेत. त्यामुळे त्यांनाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे सांगितले तर काही चूक नाही.”