इंडियन्सच्या फलंदाजीला रोखण्याचे किंग्सचे लक्ष्य
-
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता
-
ठिकाण : वानखेडे स्टेडियम, मुंबई
मुंबई (वृत्तसंस्था) : सलग तीन सामने जिंकत यंदाच्या हंगामात विजयाची हॅटट्रिक करणाऱ्या मुंबई इंडियन्सचा विजयरथ रोखण्याचे मोठे आव्हान पंजाब किंग्ससमोर आहे. मुंबईचे आघाडीचे फलंदाज आता लयीत आले असून विजय मिळविण्यासाठी पंजाबला त्यांना स्वस्तात रोखावे लागेल. मुंबईची फलंदाजी विरुद्ध पंजाबची वेगवान गोलंदाजी असा थेट सामना होणार असल्याचे बोलले जाते.
यंदाच्या हंगामाची सुरुवात निराशाजनक करूनही तिसऱ्या सामन्यापासून मुंबईने लय पकडली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने पाचपैकी तीन सामन्यांत बाजी मारली आहे. रोहित शर्मा, इशान किशन, कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा या आघाडीच्या फळीला धावा जमविता आल्या, तर मुंबईला विजयाच्या आशा अधिक हे सूत्र झाले आहे. त्यात टी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवला येत असलेले अपयश मुंबईसाठी दुखणे आहे. मात्र ही उणीव भरून काढण्यात शेवटच्या तीन सामन्यांत तरी टीम मुंबईला यश आले आहे. जेसन बेहरेनडॉर्फ, रिले मॅरेडिथ, कॅमेरॉन ग्रीन या परदेशी गोलंदाजांच्या तिकडीचा विजयात बऱ्यापैकी वाटा आहे. धावा रोखण्यात तितके यश येत नसले तरी विकेट मिळविण्यात पियुष चावला सरस आहे. विशेष म्हणजे गत सामन्यात अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमधील पहिला बळी मिळवला. शिवाय निर्णायक षटकात दबाव झुगारून जबाबदारीने गोलंदाजी करत त्याने मुंबईला विजय मिळवून दिला. ब्लॉक होलमध्ये चेंडू फेकण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्यामुळे मुंबईसाठी हा युवा खेळाडू फायदेशीर ठरू शकतो. रोहितचा हा प्रयोग फलदायी ठरला आहे. त्यामुळे मुंबईच्या विजयाची मालिका खंडीत करणे पंजाबसाठी जड असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
महागडा खेळाडू सॅम करन, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, कगिसो रबाडा ही गोलंदाजांची मोट पंजाबची ताकद आहे. हे तिन्ही गोलंदाज सध्याचे चलनी नाणे आहे. अष्टपैलू हरप्रीत ब्ररही त्यांच्या जोडीला आहे. त्यामुळे पंजाबच्या गोलंदाजीला बळ आले आहे. असे असले तरी त्याचा फायदा संघाला आतापर्यंत तरी उठवता आलेला नाही. गोलंदाजांच्या कामगिरीवरच पंजाबचे मुंबईविरुद्धच्या सामन्याचे भवितव्य अवलंबून असेल. मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावण्यात हे गोलंदाज यशस्वी ठरले तर मुंबईची मात्र अडचण होईल. हंगामातील ६ सामन्यांपैकी पंजाबने तीन सामने जिंकले आहेत. त्यांचा सॅम करन फलंदाजीतही उपयोगी पडू शकतो. धावा जमवण्यात पंजाबची खरी कसरत आहे. त्यात नियमित कर्णधार शिखर धवनही दुखापतीमुळे बाहेर आहे. त्यामुळे प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, लिअम लिव्हींगस्टोन, हरप्रीत सिंग, जितेश शर्मा यांची जबाबदारी वाढली आहे. त्यात ते यशस्वी ठरतात का? यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. परंतु सध्या तरी मुंबईची फलंदाजी विरुद्ध पंजाबची गोलंदाजी असा थेट सामना होण्याची शक्यताच अधिक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.