पुणे: ९ मे नंतर न्यायालय उन्हाळी सुट्टीवर जाणार आहे, त्यामुळे ९ मे पुर्वी न्यायालयाने निकाल दिला तरच ऑक्टोबरमध्ये निवडणुक होण्याची शक्यता आहे. असं विधान नुकतेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यातच पुण्यात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची महाबैठकही पार पडली ज्यात बावनकुळे यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, स्वतः देवेंद्र फडणवीस पुण्यात जातीने लक्ष घालणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. त्यासाठी पक्षाची संघटनात्मक ताकद कशी वाढेल यावर प्रत्येक कार्यकर्त्याने लक्ष देण्याच्या सूचनादेखील त्यांनी केल्या आहेत. तसेच त्यांनी १०० पेक्षा अधिक नगरसेवक निवडणून आणण्याच्या तयारीला लागा असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.