
बीएमसी मुख्यालयातील अधिका-यांच्या केबिनमधून भांडी चोरीला
मुंबई : मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील उपहारगृहातून गेल्या वर्षभरात जेवणाची ताटे, चमचे, ग्लास अशी शेकडो भांडी गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पालिकेतील काही कर्मचारी आणि अधिकारी जेवण, नाश्ता आपल्या कार्यालयातच मागवतात. जेवण झाल्यानंतर भांडी कार्यालयात तशीच ठेवली जातात, ती परत केली जात नाहीत. अधिकारी घरी गेल्यावर ताटं आणि चमचे चोरीला जातात. त्यामुळे वर्षभरात हजारो भांडी कमी झाली असून कंत्राटदाराचे हजारोंचे नुकसान झाले आहे. यावर उपाय म्हणून, भांडी आणि चमचे घरी घेऊन जाऊ नका, असा फलकच कंत्राटदाराने पालिका मुख्यालयात लावला आहे.
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील जे मुख्य कॅन्टीन आहे. त्यामध्ये ५० पेक्षा जास्त लोक बसू शकतात. मात्र याच महापालिकेमध्ये ५० पेक्षा अधिक विविध विभागाची कार्यालये आहेत. त्यामध्ये जे कर्मचारी आणि अधिकारी आहेत. ते थेट कॅन्टीनमधील जेवण आणि भांडी घेऊन आपल्या कार्यालयात जातात. मात्र ही भांडी पुन्हा कॅन्टीनमध्ये परत येत नाहीत.
दरम्यान वर्षभरात आतापर्यंत त्याचा हिशोब काढला तर ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ६ ते ७ हजार चमचे, १५० ते २०० ताट, ३०० ते ४०० नाश्ता प्लेट, १०० ते १५० ग्लास ही भांडी गायब झाली आहेत. त्यामुळे थेट उपहार गृहाच्या समोरच्या बाजूस भांडी घेऊन जाऊ नका! अशी सूचना लिहीली आहे.
