Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीअखेर न्याय झाला! उमेश पाल हत्याप्रकरणातील दोघांचे पोलिसांनी केले एनकाऊंटर

अखेर न्याय झाला! उमेश पाल हत्याप्रकरणातील दोघांचे पोलिसांनी केले एनकाऊंटर

लखनऊ: उत्तर प्रदेशमधील उमेश पाल हत्याप्रकरणात प्रमुख आरोपी असलेल्या अतिक अहमद याचा मुलगा असद आणि शार्पशुटर गुलाम यांनी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी झालेल्या चकमकीत ठार मारले. गेल्या काही दिवसांपासून या दोघांचा पोलीस कसून शोध घेत होते. तसेच असद आणि गुलाम यांना पकडण्यासाठी ५ लाखांचे इनामही जाहीर करण्यात आले होते. अखेर गुरुवारी सकाळी हे दोघेजण झाशीत असल्याचे पोलिसांनी कळाले. त्यानुसार उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, या दोघांकडूनही परदेशी बनावटीची पिस्तुलं जप्त करण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांकडून सध्या असदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर असदचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सोपवला जाईल.

गेल्याच महिन्यात २००७ च्या उमेश पाल अपहरण प्रकरणात अतिक अहमद आणि आणखी दोघांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. २००५ मध्ये उत्तर प्रदेशातील बसपा आमदार राजू पाल यांची हत्या झाली होती. याप्रकरणात उमेश पाल हे प्रमुख साक्षीदार होते. आज अतिक अहमद याला न्यायालयीन सुनावणीसाठी प्रयागराजला आणण्यात आले. यावेळी अतिकला आपला मुलगा पोलिसांसोबतच्या चकमकीत ठार झाल्याचे कळाले. ही बातमी कानावर पडताच अतिकला कोर्टातच रडू कोसळले. आज न्यायालयीन सुनावणीसाठी अतिकला गुजरातच्या साबरमती कारागृहातून प्रयागराजला आणण्यात आले आहे.

दरम्यान, भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून उत्तर प्रदेश पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक करण्यात आले आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आणि सामान्य लोकांना सुरक्षित वाटावे, यादृष्टीने ही कारवाई आवश्यक असल्याचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटले. तर उमेश पाल यांची पत्नी जया पाल यांनीही या कारवाईनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. पोलिसांनी खूप चांगले काम केले आहे. आता न्याय झाला आहे, पोलिसांचे आभार, अशी प्रतिक्रिया जया पाल यांनी व्यक्त केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -