Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिककोलाजमुलांची काळजी करा... पण अपंग नका करू!

मुलांची काळजी करा… पण अपंग नका करू!

  • प्रासंगिक: पुरुषोत्तम आवारे-पाटील

पालक म्हणून कधीही घराबाहेर न पडलेल्या मुलांबाबत काळजी वाटणे स्वाभाविक आहे, मात्र एक लक्षात घ्या, तुमच्या मुलांना कधी तरी एकटे बाहेर पडावेच लागणार!

मुलांच्या परीक्षा संपल्या आहेत. त्यामुळे मुलांना मामाच्या, इतर नातेवाइकांच्या घरी किंवा खेड्यावर जाण्याची ओढ लागली असेल. अनेक मुले कदाचित घराच्या बाहेरही पडली असतील. सतत नजरेसमोर असणारी मुले जगातल्या कोणत्याही आई-वडिलांना प्रिय असतात. त्यांनी सतत आपल्या मार्गदर्शनात पुढे जावे, असे त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. मुलांचे संगोपन, त्याची काळजी, करिअर उत्तम घडावे म्हणून अनेक कुटुंबात आई-वडील मुलांच्या विश्वात एवढे गुंतून जातात की, पुढे मुलांच्या व्यक्तिगत आयुष्यातसुद्धा अनावश्यक हस्तक्षेप करायला लागतात. बालपणी ‘तुमच्याशिवाय ज्याचे पानही हलू शकत नव्हते, असा तुमचा बबड्या आता टिनेजर झालाय. त्यामुळे तुमच्या अतिप्रेम किंवा काळजीने त्याचा जीव गुदमरायला लागला आहे. याची जाणीव ठेवून त्याच्याशी वागायला लागा, असे सांगण्याची वेळ अलीकडे बहुतांश पालकांनी आणली आहे. घरोघर या वयातील मुलांच्या चर्चा आणि काहीशा तक्रारी यातून हे सत्य बाहेर पडत आहे.

मुले कितीही मोठी झाली, तरी आईसाठी ती लहानच असतात, हे सत्य असले तरी वास्तव स्वीकारून आता मुलांकडे पालकांनी बघायला हवे आणि तसे वागायला सुद्धा हवे. उगाच सिनेमा किंवा कथा, कादंबऱ्यांतील सुभाषितांचा वापर करून नात्यात कटुता निर्माण करण्यात काही अर्थ नाही. आजच्या काळात आणि पूर्वीसुद्धा कुटुंबात पित्याच्या तुलनेत माताच मुलांमध्ये अधिक भावनिक गुंतवणूक करून असतात, असे लक्षात आले आहे. पप्पा, बाबा किंवा पिताजी हा घराचा आर्थिक आधार असल्याने त्याला दिवसभर घराबाहेर राहावे लागते. त्यामुळे स्वाभाविकच मुलांशी अधिक संपर्क आईचा येतो. मुलांनी न सांगता आईला त्यांच्या समस्या कळतात. आई त्यांचे मुड्स सहज ओळखू शकत असते. दुःख, आनंद, तणाव, भीती आणि नवल अशा सगळ्या भावना त्याच्या चेहऱ्याकडे बघून आईला ओळखता येतात. वडील त्या बाबतीत तेवढे तयार झालेले नसतात. अर्थात याला अपवाद असू शकतात.

मुलांच्या काळजीपोटी अनेकदा पालक त्यांना एवढे बांधून ठेवत असतात की, मुलांना हे सगळे नकोसे वाटते. पूर्वीच्या मुलांच्या तुलनेत या काळातली पिढी सभोवताली असणाऱ्या सुविधा आणि वातावरणामुळे अधिक हुशार आणि चाणाक्ष झालेली असतात. परिणामी अकरा, बारा वर्षांची झालेली असताना मुलांना सगळे सामान्य आणि सामाजिक ज्ञान अवगत झालेले असते. अनेकदा तर पालकांना जे माहीत नाही, त्यात ही मुले बरीच पुढे गेलेली असतात. शाळेत दिवसभर असंख्य प्रकारच्या मित्र, शिक्षक, नागरिक आणि माध्यमे यातून ग्रहण केलेल्या ज्ञानाने मुले समृद्ध झालेली असतात. जगातल्या सगळ्या पालकांना मात्र आपली मुले साधी- भोळी आणि सरळ वाटत असतात. आपला मुलगा, मुलगी खूपच साधी आहे. तिला, त्याला बाहेरच्या जगात कुणीही सहज फसवू शकते, असे सतत वाटणाऱ्या पालकांची संख्या बरीच वाढली आहे. मुलेही घरात गोगलगाय बनून असतात, कदाचित हा त्याचाही परिणाम असावा.

बंधने, मर्यादा किंवा तुरुंग कुणालाही आवडत नसतो. मुलांना तर मोकळे आणि स्वैर जगण्याची अधिक इच्छा असते. पालक म्हणून आपण नेमके याच्या उलट मुलांशी वागत असतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेर कुठे चार दिवस गेलेल्या मुलांना काळजीपोटी आई-बाबा दर दोन तासांनी फोन करून एवढे भंडावून सोडतात की, ‘उगीचच मोबाइल सोबत आणला’ अशी त्यांची भावना तयार होते. सकाळी किती वाजता उठलास? चहा, नाश्ता केलास का? जेवलास का? काय होते जेवणात? उन्हात बाहेर फिरताना कानाला काही बांधलेस की नाही? पाण्याची बॉटल सोबत घेतली की नाही? जास्त पैसे सोबत नको ठेवू, लागतील तेवढेच ने, मामीने पोळ्यांना तेल लावले होते की कोरड्याच ठेवल्या होत्या? मावशी, काका काय म्हणाले? माझी आठवण काढली की नाही? असे प्रश्न पालक विचारून त्यांच्या आनंदात विरजण टाकत असतात.

पालक म्हणून कधीही घराबाहेर न पडलेल्या मुलांबाबत काळजी वाटणे स्वाभाविक आहे, मात्र एक लक्षात घ्या, तुमच्या मुलांना कधी तरी एकटे घराबाहेर पडावेच लागणार आहे. मित्रासह कुठेतरी पर्यटन, सहलीला जावे लागणार आहे. त्याच्यासोबत तुम्ही नेहमीसाठी असणार नाही म्हणून त्याला त्याचे अगदी लहान-सहान निर्णय घेऊ द्या, चुकू द्या, काही चुकांतून मुले शिकत जात असतात. त्यांची काळजी घ्या; परंतु त्यांना तुमच्यावर निर्भर ठेवून अपंग नका बनवू. दिवसातून एखादा फोन करून आवश्यक त्या सूचना द्या; परंतु प्रत्येक घटनेकडे तुमच्या चष्म्यातून नका बघू. दोन पिढ्यांतील पुलाखालून खूप पाणी वाहून गेलेले आहे, याची जाणीव ठेवा. आताची मुले म्हटले की, तलवार समजतात. ती खूप शार्प आहेत. उगाच अनुभवाचे डोज पाजू नका.

प्रत्येक गोष्टीत पालकांवर अवलंबून असणारी मुले निर्णय घेण्यात कमकुवत ठरतात. टीनएजर मुले एकट्याने जग पादाक्रांत करण्याच्या काळात आपण गावातील बस स्टॅण्डवरसुद्धा मुलांना एकटे जाऊ द्यायला तयार नसू, तर ही पिढी स्वयंनिर्भर म्हणून कशी तयार होणार?

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -