Sunday, January 19, 2025
Homeसाप्ताहिककोलाजफसलेला ‘फास’

फसलेला ‘फास’

  • क्राइम: अ‍ॅड. रिया करंजकर

नयानाला आई-वडिलांच्या बंधनापेक्षा सुमेधचेच बंधन जास्त वाटू लागले. ज्यांनी जन्म दिला आहे, ते आपल्याशी असं वागत नाहीत. ही जाणीव नयनाला होऊ  लागली.

सकाळी सकाळी सर्व मित्रांचे मोबाइल खणखणू लागले, ते एकाच बातमीमुळे की सुमेध याने आत्महत्या केली. मित्रांचाही एकमेकांवर विश्वास बसेना. सुमेध याच्या मित्राने तत्काळ हॉस्पिटलकडे धाव घेतली. सुमेधचं अचानक जाणं कोणाच्या मनाला पटत नव्हतं. त्याने हा टोकाचा निर्णय का घेतला. हा सर्वांनाच पडलेला प्रश्न होता.

सुमेध हा आई-वडिलांचे तिसरे अपत्य. शेंडेफळ असल्यामुळे अतिशय वाढवलेला असा. जे मागेल ती गोष्ट त्याच्या पुढ्यात आई-वडील हजर करायचे. एवढेच नाही तर काही गोष्टी मागायच्या अगोदर त्याला मिळायच्या. त्यामुळे त्याचा स्वभाव हट्टी असा झालेला होता. पाहिजे म्हणजे पाहिजे. मोठे दोन्ही भाऊ, लहान भाऊ आहे म्हणून सगळ्या गोष्टी पुरवत होते. सुमेधला सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या झालेल्या हव्या असायच्या. समाजात वावरताना मीतभाषीय असा होता. नेमकेच मित्र असणारा पण, जीवापाड मैत्री जपणारा. या सुमेधची आणि नयनाची लहानपणापासूनची मैत्री होती. कारण दोघेही एकाच ठिकाणी लहानाचे मोठे झालेले होते.

नयना पुढील शिक्षण करून शासकीय नोकरीत रुजू झालेली होती. पण सुमेध मात्र कोणतेही काम करत नव्हता. सुमेधला नयना आवडू लागली होती. त्याने आपल्या घरातही तसं सांगितलं होतं. नयनाच्या घरची लोकं तयार नव्हती. कारण नयना सुशिक्षित व सरकारी नोकरी असलेली मुलगी होती, तर सुमेध हा जास्त शिकलेला नसून कोणतेही काम नसलेला मुलगा होता. त्याच्यामुळे साहजिकच नयनाच्या घराचा त्यांच्या नात्याला विरोध होता. सुमेधने आई-वडिलांकडे हट्ट करून बाईक घेतलेली होती. तो नयनाला कामावर सोडायला आणि नयनाला कामावरून आणायला जाऊ लागला. सुमेध नयनाला आणायला येतो, ते नयनाला विचित्र वाटू लागले. कारण, कामाच्या ठिकाणी सुमेध येत होता, हे तिला पटत नव्हतं. कामावरून सुटल्यावर गेटवर येईपर्यंत पाच मिनिटं जरी उशीर झाला तरी सुमेध तिला नको नको ते शब्द बोलत होता. आपलं प्रेम आहे म्हणून ती निमूटपणे ऐकून घेत होती. एवढंच नाही तर नयनाने कोणते कपडे घालावे, कोणते घालू नये याच्याबद्दलही तो सतत काहीना काही सूचना देऊ लागला. नयनाला या सर्व गोष्टी कुठे तरी खटकत होत्या. घरात कोणी नसताना जबरदस्तीने नयनाला तो घरी येण्याचा आग्रह करू लागला. तिने नकार दिला, तर तिला कुठली ना कुठली धमकी तो देऊ लागला. तिच्यावर जबरदस्तीने आपल्याबरोबर इकडे फिरायला ये, तिकडे फिरायला ये, असं तो तिच्यासोबत करू लागला. नयनाच्या आयुष्यामध्ये नयनाला स्पेस मिळत नव्हता. तिला कोणत्याही गोष्टीचा स्वतःसाठी विचार न करायला देता स्वतः त्या गोष्टीचा सुमेध निर्णय घेऊ लागला. नयानाला आपल्या आई-वडिलांच्या बंधनापेक्षा सुमेधचेच बंधन जास्त वाटू लागले. ज्यांनी आपल्याला जन्म दिला आहे, तेही आपल्याशी असं वागत नाहीत. ही जाणीव नयनाला होऊ लागली. हळूहळू नयनाला सुमेधचा हट्टी स्वभाव व एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे कशी करून घ्यायची, त्यासाठी वाटेल ते करायचे, याची जाणीव होऊ लागली. तिला याही गोष्टीची माहिती मिळाली. सुमेध याने त्याला पाहिजे तशी गोष्ट मिळण्यासाठी दोन वेळा आत्महत्याही करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि तो प्रयत्न आपल्या आई-वडिलांना धमकवण्यासाठी केलेला होता.

सुमेधच्या अशा वागणुकीमुळे नयना अस्वस्थ झालेली होती. एक दिवस सुमेध याने स्वतःच लग्नाची तारीख ठरवली आणि स्वतःच कपड्यांची खरेदी केली. फक्त नयनाला सांगण्याचं काम त्याने केलं. नयनाला ही गोष्ट मनाला पटली नाही. सुमेध तिला कामाच्या ठिकाणी न्यायाला यायचा. त्याच्यामुळे तिचे सहकारी तिला कधी कधी चिडवत होते. त्या दिवशी सुमेध नेहमीप्रमाणे तिला घेऊन जाण्यासाठी आला होता. नयनाला कामामुळे पाच मिनिटे उशीर झाला. म्हणून सुमेध याने भर रस्त्यात आजूबाजूला तिचे सहकारी असताना तिच्या दोन-तीन कानाखाली लावून दिले. एवढेच नाही तर तिला घाण घाण शिव्याही घातल्या. आपल्या सहकार्यांसमोर आपल्याला मारहाण झाली. या गोष्टीची खंत नयनाला वाटू लागली. तिने ही गोष्ट आपल्या घरी सांगितली. तिच्या आई-वडिलांनी त्याच्याशी लग्न करू नकोस, लग्नाच्या अगोदर ही परिस्थिती आहे, तर लग्नानंतर काय? हा प्रश्न तिच्या आई-वडिलांनी तिच्यासमोर मांडला. नयनाला ही गोष्ट पटली व तिने सुमेध आणि त्याच्या परिवाराला आपण लग्नास तयार नाही हे कळलं. सुमित जसा आई-वडिलांना धमकी देत होता, तशीच त्याने नयनालाही धमकी दिली. जर लग्न नाही केलं, तर मी आत्महत्या करेन. नयनालाही माहीत होतं; हा फक्त धमक्या देतो, बाकी काही करत नाही. नयनाने लग्नासाठी तयार व्हावे म्हणून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण सुमेधने त्या दिवशी लावलेला फास हा गळफास ठरला.

त्या दिवशी त्याने फास लावला, पण घरातल्या लोकांचं लक्ष गेलं नसल्यामुळे सुमेधच्या गळ्याभोवती फास आवळला गेला. नयनाला धमकी देण्याच्या नादात सुमेध स्वतःचा जीव गमावून बसला. सुमेध याचा हट्टी स्वभाव स्वतःला पाहिजे तेच करणं आणि त्याच्यासाठी कुठलीही पातळी गाठणं हे कारणीभूत ठरलं. सुमेधच्या अशा विचित्र वागण्याला त्याचे आई-वडील जबाबदार होते. कारण त्याच्या अशा स्वभावाला खतपाणी घालण्याचं काम हे लहानपणापासून केलं गेलेलं होतं. त्यामुळे स्वतःचा जीव घेईपर्यंत मजल या सुमेधची गेलेली होती. पण सुमित याचे आई-वडील मात्र नयना हिला दोष देत होते.

(सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -