- स्वयंसिद्धा: प्रियानी पाटील
सही हवी म्हणून पाठपुरावा केला खरा, पण सही मिळण्याची आशा मावळत चाललेली, कारण ऑफिसची वेळ संपत आलेली. आत गेलेला शिपाई सही घेऊन येईल ना..?
सरकारी काम आणि चार महिने थांब…. असं अनेकदा म्हटलं जातं, ते काही खोटं नाही. एक सरकारी दाखला मिळवताना अनेकांच्या नाकी नऊ येऊन जातात. गरजेला एखादं सरकारी कागदपत्र हवं असेल आणि जर ते वेळीच मिळालं नाही, तर आयुष्याचं फार मोठं नुकसान होऊन जातं. अगदीच काही नाही तरी एखादं सर्टिफिकेट तरी तुम्हाला कोणत्याही अॅडमिशनच्या वेळी तरी लागतंच लागतं. त्यासाठी अनेक हेलपाटे घालावे लागतात. पण ते ठरल्यावेळी मिळेल तर शपथ!
आज काय सरकारी सुट्टी, उद्या काय तहसीलदार मिटिंगमध्ये, परवा काय सर्टिफिकेटवर सह्याच नाही झाल्या, नंतर काय ते पुढच्या ऑफिसला पाठवलंय. पुन्हा ते आलं का हे जाऊन पाहावं, तर पंधरा दिवसांनी या. यामध्ये महिना- दीड महिना संपून जातो. खरं तर ज्यांचे आई-वडील गरीब आणि कमी शिकलेले असतात त्यांच्या मुलांनी तर मोठं होण्याची स्वप्न पाहण्यात शहाणपणच नसते. कारण समाज तुम्हाला सुखाने जगू देत नाही. ओळखी लागतात त्या तुमच्याकडे नसतात, पैशांचा अभाव असतो. आई-वडिलांच्या पैशावर जग मुलांना मान आणि स्थान देतं. इथे हुशारीचा अभाव असला तरी अनेकदा अॅडमिशनच्या वेळी चटकन अॅडमिशन होताना दिसतात. पण एका सर्टिफिकेटसाठी थांबणाऱ्या मुलांचं भवितव्य अडखळताना दिसतं.
एका अॅडमिशनच्या वेळी एक सर्टिफिकेट वेळेवर मिळालं नाही म्हणून आयुष्याचं स्वप्न वाऱ्यावर सोडून आपण करिअरसाठी दुसरा मार्ग निवडला, अशी बरीच उदाहरणं दिसून येतील. पण सरकारी कागदपत्रांसाठी ओळखी असतील तर काम जरा लवकर होतं म्हणतात, पण वेळकाढूपणाचं धोरण नसलं तर अनेकदा नुकसानही टळू शकतं हेही नक्की आहे.
आपलं नुकसान झालं म्हणून आपल्या भावंडाचं नुकसान होऊ नये म्हणून अशाच एका सर्टिफिकेटसाठी ऐनवेळी तहसील ऑफिस गाठल्याचं आजही आठवतंय. सगळी कागदपत्र जमा करून मुळातच पंधरा दिवस होऊनही अॅडमिशनसाठी लागणारं सर्टिफिकेट उद्या तत्काळ पाहिजे म्हणूनही मिळालं नव्हतं. चौकशी केली तर ‘सर्टिफिकेट आज मिळू शकणार नाही. कारण तहसीलदारांची महत्त्वाची मिटिंग सुरू आहे. नाही मिळणार आज, उद्याच या.’ असं उत्तर मिळालेलं. ‘शक्य नाही उद्या. सर्टिफिकेट आजच पाहिजे. कारण मुळातच पंधरा दिवस होऊन गेलेत.’ म्हणून हट्ट धरलेला. ‘हो. पण सही झाली तरी तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळायला पुन्हा चार दिवस लागणार आहेत. कारण पुन्हा हे सर्टिफिकेट आमचा शिपाई प्रांतकडे घेऊन जाईल आणि मग त्यावर प्रांतची सही होईल. त्यानंतर तुम्हाला ते चार-आठ दिवसांनी मिळणार.’ तिकडून उत्तर मिळालेलं.
‘पण सर्टिफिकेट उद्या हवंच आहे. भावाचं अॅडमिशन खोळंबलंय. ते नाही झालं तर कोर्सचं वर्ष वाया जाईल.’ म्हणून तहसीलदारांची मिटिंग संपेपर्यंत वाट पाहिली. त्यांची मिटिंग जशी संपली तशी सर्टिफिकेटवर लगेच सही पाहिजे म्हणून जीव कासावीस. तोवर शिपाई सगळी फाईल घेऊन आत गेलेला. तातडीने सही होणं आवश्यक होतं, पण वेळच लागला सही होण्यासाठी. आणि बऱ्याच वेळाने सह्या झाल्यावर शिपाई पुन्हा बाहेर आला. पुन्हा काऊंटरवर उभं राहिले. म्हणाले, ‘ते सर्टिफिकेट तेवढं माझ्या हातात द्या’ आग्रहच धरला. पण, ते अपूर्णच. कारण फक्त तहसीलदारांची सही होऊन पुरेसं नाही, तर कणकवलीला प्रांत ऑफिसकडून सही हवी यावर तेव्हाच ते परिपूर्ण मिळणार.
पण, ते मिळणार केव्हा? तर चार-आठ दिवसांनी. कारण शिपाई तिथवर सगळी सर्टिफिकेट घेऊन जाणार तेव्हा ते काम होणार. एवढं थांबणं शक्य नाही. ‘त्यापेक्षा मीच जाऊ का, हे सर्टिफिकेट घेऊन?’ असं विचारल्यावर, शक्य होतं, पण चार-पाच तासांचा प्रवास करून या सर्टिफिकेटवर प्रांतची सही घेणं तितकंसं सोपं नव्हतं. कारण घड्याळात दुपारचे पावणेएक झाले होते. कणकवली गाठेपर्यंत पाच वाजणार होते. मग ऑफिस बंद. डोळ्यांत पाणी साठलं, पण जराही विलंब न करता, एसटीने कणकवली गाठायची ठरवली. तोवर शिपाई म्हणाला, ‘थांबा, मी सगळीच सर्टिफिकेट घेऊन येतो तुमच्यासोबत. अनेकांची कामे होतील’ म्हणून तो सगळी फाईल घेऊनच निघाला.
प्रांत ऑफिसला पोहोचल्यावर काहीही करा पण सही आजच हवी म्हणून पाठपुरावा केलेला. तशी सही मिळण्याची आशा मावळत चाललेली, कारण ऑफिसची वेळ संपत आलेली. घाईघाईत आत गेलेला शिपाई सही घेऊन बाहेर येईल ना? ही साशंकता मनात असतानाच काही वेळाने तो बाहेर आला आणि हसतमुखपणे त्याने प्रांतची सही असलेले सर्टिफिकेट माझ्या हाती दिलं. इतकंच नाही तर तो सगळ्या सर्टिफिकेट्सवरही सह्या घेऊन आला. ज्या सर्टिफिकेटसाठी चार-आठ दिवसांचा वेळ जाणार होता तेच सर्टिफिकेट असं अगदी वेळेवर आपल्या हाती आल्यामुळे खूप मोठं काम यावेळी झाल्यासारखं वाटलं. कारण, या सर्टिफिकेटमुळे भावाचं अॅडमिशनही झालं आणि आयुष्याचं होणारं नुकसानही टळलं. यावेळी फक्त माझ्या हातातील सर्टिफिकेटवरीलच सही मोलाची होती असे नाही, तर फाईलमधील अशी अनेक सर्टिफिकेट्स सह्यांच्या प्रतीक्षेत होती, ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य अधोरखित होणार होते. शिपाईही मग दिमाखात फाईलसह पुढे सरसावला. एक सरकारी काम हातावेगळं केल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावरून तरळलं होतं.