ऋतुराज-कॉनवेच्या खेळीमुळे लखनऊवर रोमहर्षक विजय
चेन्नई (वृत्तसंस्था) : ऋतुराज गायकवाड आणि देवॉन कॉनवे या सलामीवीरांनी केलेली तडाखेबंद फलंदाजी, त्याला मिळालेली मोईन अलीच्या भेदक गोलंदाजीची साथ या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने लखनऊ सुपर जायंट्सवर १२ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. यंदाच्या हंगामातील चेन्नईचा हा पहिला विजय ठरला.
प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या लखनऊलाही दमदार सुरुवात करण्यात यश आले. कायले मायर्सने कर्णधार लोकेश राहुलच्या साथीने ७९ धावांची सलामी दिली. २० धावा करत लोकेशने मायर्सची साथ सोडली. कायले मायर्सने ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २२ चेंडूंत ५३ धावांची तुफानी फलंदाजी केली. निकोलस पुरन, मार्कस स्टॉयनीस यांनी अनुक्रमे ३२, २१ धावा करत सामन्यातील झुंज कायम ठेवली. तळात आयुष बदानीने २३ धावांचे योगदान देत लखनऊला विजयासमीप आणले होते. परंतु विजय मात्र त्यांच्यापासून दूरच राहिला. लखनऊने २० षटकात ७ फलंदाजांच्या बदल्यात २०५ धावा केल्या.
ऋतुराज गायकवाड आणि देवॉन कॉनवे या सलामी जोडीने चेन्नई सुपर किंग्जला धडाकेबाज सुरुवात करून दिली. ऋतुराज गायकवाडने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने ३१ चेंडूंत ५७ धावांची खेळी केली. यादरम्यान गायकवाडने ३ चौकार आणि ४ षटकार मारले. देवॉन कॉनवेने २९ चेंडूंत ४७ धावा जमवल्या. या खेळीत त्याने पाच चौकार आणि दोन षटकार मारले. गायकवाड आणि कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी ९.१ षटकांत ११० धावांची भागीदारी केली.
सुरुवात चांगली मिळाल्याने चेन्नईने निर्धारित २० षटकांत ७ फलंदाजांच्या बदल्यात २१७ धावांचा डोंगर उभारला. त्यात शिवम दुबेने २७ धावांची भर घातली. अंबाती रायडूने नाबाद २७ धावा तडकावल्या. धोनीने ३ चेंडूंत २ षटकार लगावत झटपट १२ धावा जमवल्या. लखनऊच्या रवी बिश्नोईने प्रभावी गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत २८ धावा देत ३ बळी मिळवले. तर मार्क वुडनेही ३ विकेट मिळवल्या. मात्र धावा रोखण्यात त्याला यश आले नाही. त्याने ४ षटकांत ४९ धावा दिल्या.