Tuesday, April 22, 2025
Homeमहत्वाची बातमीसावरकर होण्याची तुमची औकातच नाही

सावरकर होण्याची तुमची औकातच नाही

देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना खडसावले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राहुल गांधी तुम्ही म्हणता, मी सावरकर नाही. तुम्ही सावरकर नाहीत आणि तुम्ही गांधीही नाहीत. सावरकर होण्याची तुमची औकात नाही. संसदेत बंगालच्या खासदाराने जेव्हा वीर सावरकरांच्या गौरवाचा ठराव मांडला, तेव्हा त्याचे समर्थन करणारे तुमचे आजोबा होते, फिरोज गांधी… अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या स्वा. सावरकर यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेतला.

मुंबईतील कांदिवली येथे आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. प्रवीण दरेकर, आनंदराव अडसूळ, योगेश सागर, मनिषा चौधरी, सुनील राणे, अमित साटम आदी उपस्थित होते.

इंग्लंडच्या राणीची मर्जी होईल, तेव्हा स्वातंत्र्य मिळेल, अशी त्यांची धारणा नव्हती. स्वातंत्र्य आम्हाला भिकेत नको होते. त्यामुळे सशस्त्र क्रांती झाली. वीर सावरकर यांनी १८५७च्या स्वातंत्र्यसमरावर पुस्तक लिहिले. त्याने लाखो क्रांतिकारकांना प्रेरणा दिली. एकाच व्यक्तीला दोन जन्मठेप झाल्या, असे वीर सावरकर एकमात्र आहेत. त्या शिक्षा झाल्या, तेव्हा इतके वर्षे तुमचे सरकार तरी चालणार आहे का?, असे इंग्रजांना विचारण्याचीही हिंमत वीर सावरकरांनी दाखविली होती, असे ते म्हणाले.

सगळे स्वातंत्र्यसेनानी महान आहेत. पण, वीर सावरकरांनी ज्या यातना भोगल्या, त्या कुणाच्या वाट्याला आल्या नाहीत. वीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या दोन व्यक्तींना कायमच काँग्रेसने विरोध केला. अंधश्रद्धेच्या विरोधात, अस्पृश्यतेच्या विरोधात वीर सावरकरांनी लढा दिला. हिंदुत्वाचा विज्ञाननिष्ठ विचार मांडणारे वीर सावरकर होते. मराठी भाषेला शेकडो शब्द देणारे वीर सावरकर होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर आरती लिहिणारेसुद्धा वीर सावरकरच होते, असे फडणवीस यांनी सांगितले.

वीर सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे लोक आहेत, हे मात्र दुर्दैवी आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जसे मणिशंकर अय्यरच्या फोटोला जोडे मारले, तसेच तुम्हीही राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारण्याची हिंमत दाखविली असती तर मानले असते. तुमचे हिंदुत्व बेगडी आहे. तुम्हाला ज्यांच्यासोबत जायचे असेल त्यांच्यासोबत जा. पण, आम्ही हिंदुत्व सोडणार नाही. तुम्ही जेव्हा-जेव्हा वीर सावरकरांचा अपमान कराल, तेव्हा तेव्हा अशीच जनता रस्त्यावर उतरेल आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल, असेही त्यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांचे नाव न घेता बजावले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -