कर्णधार म्हणून सर्वात कमी स्ट्राइक रेटमध्ये टॉप-३ स्थानावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वात कमी स्ट्राइक रेटमध्ये रोहित टॉप-३ स्थानावर आहे.
आयपीएलच्या इतिहासात यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माकडे पाहिले जाते. त्याने मुंबई इंडियन्सला पाच विजेतेपद पटकावून दिले आहेत. आतापर्यंत रोहितने एकूण २२८ आयपीएल सामने खेळले असून ३०.१५ च्या सरासरीने एकूण ५८८० धावा केल्या आहेत.
रविवारी आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात यंदाच्या हंगामातील पहिला सामना झाला. या सामन्यात आरसीबीने मुंबईचा धुव्वा उडवला. या सामन्यात तिलक वर्मा वगळता मुंबईचे फलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले. अपयशी फलंदाजांच्या पंक्तीत रोहित शर्माचाही नंबर होता. या सामन्यात रोहितने १०च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. १० चेंडूंत अवघी एक धाव काढून रोहित माघारी परतला. यापूर्वी २०२२ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रोहितने १३ चेंडूंत १५.३८ च्या स्ट्राइक रेटने दोन धावा केल्या होत्या. २०२२ मध्येच रोहितने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध २५च्या स्ट्राइक रेटने १२ चेंडूंत तीन धावा केल्या होत्या.