- संवाद: गुरुनाथ तेंडुलकर
आज सकाळी मी एक इंग्रजी सुवचन वाचलं. Lighten Your Tomorrow with Today. तुमचा उद्याचा दिवस आजच्या सहाय्यानं उजळा. हे वचन माझ्या वाचनात आलं आणि मला चाळीस वर्षांपूर्वीची एक घटना आठवली.
१९८३ साली कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषक म्हणजेच वल्ड कप जिंकून आणला. त्या काळी घरोघरी टीव्ही सेट नव्हते. चाळीत एखाद दुसऱ्या कुटुंबाकडे टीव्ही असायचा. मी राहात असलेल्या चाळीतील एका कुटुंबाने आपला टीव्ही गॅलरीत आणून सर्वांना सामना पाहायची सोय केली होती. टीव्हीसमोर सर्व चाळकरी आबालवृद्धांची ही गर्दी उसळली होती. अत्यंत उत्कंठावर्धक असा सामना जिंकल्यानंतर सर्वांनी जो जल्लोष केला तो मला अजूनही आठवतोय. पण या गर्दीत मात्र शरद नावाचा मुलगा कुठंच दिसत नव्हता.
दुसरे दिवशी मी त्याला विचारलं, ‘काय रे शऱ्या, काल कुठे होतास? मॅच बघितलीस की नाही.’ ‘नाही रे. परीक्षा जवळ आलीये. बारावीचं वर्ष आहे. लायब्ररीत वाचत बसलो होतो.’
‘वेडाच आहेस. लायब्ररी काय रोजचीच आहे. मॅच दररोज होत नसते.’ मी शरदची कीव करीत म्हणालो. त्यावर काहीही उत्तर न देता तो केवळ हसला…
वर्ष उलटली… त्यानंतर अनेक वर्ल्ड कप आले आणि गेले. आता क्रिकेट तर दररोजचा प्रकार झालाय. पाच दिवसांच्या कसोटी सामन्याच्या जोडीनं एक दिवसाचे सामने, वीस-वीस ओव्हरचे सामने आणि आयपीएल… अमका कप आणि तमका कप… क्रिकेटचा अगदी ओव्हरडोस झालाय. केवळ क्रिकेटच नव्हे तर सगळ्याच करमणुकींचा आपल्यावर आज ओव्हरडोस झालाय. पण त्यावेळी मात्र वर्ल्ड कपची फायनल मॅच पाहणं ही खूप मोठी गोष्ट होती. पण शरदने ती जाणीवपूर्वक टाळली. टाळली आणि लायब्ररीत बसून अभ्यास केला.
त्यावेळी वर्ल्ड कप फायनल मॅच न बघता कॉलेजच्या लायब्ररीमध्ये बसून, अभ्यास करून शरदनं काय मिळवलं ते आज मला जाणवतंय. त्यावेळी बारावीत असणारा शरद पुढे बारावीची परीक्षा मेरिटमध्ये पास झाला. मेडिकलला गेला, एम.बी.बी.एस. झाला. पुढे गायनॅकॉलॉजीमध्ये एम.डी. केलं आणि त्यानंतर दीड-दोन वर्षं परदेशी जाऊन शिकून भारतात परतला. आज कोकणात सावंतवाडीजवळ शरदचं स्वतःच्या मालकीचं मोठं हॉस्पिटल आहे. त्यावेळी शरदनं टी.व्ही.वरचा आमच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा क्रिकेटचा विश्वचषक सामना चुकवला आणि आयुष्याचा सामना जिंकला.
त्यावेळी आणि त्यानंतरही अनेक क्रिकेटचे सामने बघून स्वतःची घटकाभर करमणूक करणारे आम्ही आज मध्यमवर्गीय पांढरपेशा माणसाचं सामान्य आयुष्य जगतोय. अजूनही टीव्हीवरचे सामने बघण्यात स्वतःला धन्य समजतोय. आज सकाळी Lighten Your Tomorrow with Today हे वाक्य वाचलं आणि एकदम शरद आठवला. थोडा अंतर्मुख होऊन विचार करू लागलो.
आपला कालचा दिवस आपण कोणत्या प्रकारे घालवला यावर आपला आजचा दिवस अवलंबून असतो आणि आपला आज आपण काय करतो त्यावर आपला उद्याचा येणारा दिवस अवलंबून असतो. काल शेतात जे पेरलं, त्याचं पीक उद्या येतं. हा निसर्गाचा नियम आहे.
काल, आज आणि उद्या… भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ तिन्ही काळ वेगवेगळे नसतातच. या तिघांचा एक अदृष्य गोफ विणलेला असतो आणि या तीन पेड्यांच्या गोफालाच आपण आयुष्य असं नाव देतो. भूतकाळाचे पडसाद वर्तमानकाळाला छेद देऊन भविष्यकाळात उमटतात. भूतकाळात केलेल्या चांगल्या गोष्टींची फळं भविष्यकाळात चाखायला मिळतात तसंच भूतकाळातील चुकासुद्धा भविष्यकाळात भोगाव्या लागतात. पण इथंच तर खरी गोम आहे. चुका करताना आपण चुकीचं वागतोय याची जाणीव त्यावेळी नसते, त्यावेळी ते वागणं आपल्याला योग्य वाटत असतं. त्यावेळी आपण उद्याचा विचार न करता केवळ आजचा विचार करून आनंद उपभोगतो. मजा करतो. पण, त्या मजेपायी आयुष्यातला केवढा महत्त्वाचा वेळ आपण वाया घालवतोय याचं आपल्याला भान राहत नाही.
आज मजा करताना त्या मजेची काय किंमत आपल्याला उद्या मोजावी लागणार आहे, याची त्यावेळी जाणीव नसते. दुसऱ्या कुणी तशी जाणीव करून दिली तर त्या माणसाचं ऐकून घेण्याची आपली मन:स्थितीही नसते. त्यावेळी आपल्या डोक्यात एक वेगळा उन्माद असतो. परिणामी, वेळेचा सदुपयोग करणारा शरद डॉक्टर होतो आणि अभ्यास न करता क्रिकेट बघणारे, टाईमपास करणारे विद्यार्थी पुढे आयुष्यभर सामान्य पातळीवरच राहतात. क्रिकेटची मॅच काय किंवा टीव्हीवरच्या न संपणाऱ्या चटकदार मालिका काय पाहताना बरं वाटतं. चांगला टाईमपास होतो. पण त्या टाईमपासचा पुढच्या आयुष्यात प्रगतीच्या दृष्टीनं नेमका किती उपयोग होतो? तुम्ही म्हणाल की, थोडा वेळ टीव्हीवरचे कार्यक्रम पाहिले नाही, तर एखादा क्रिकेटचा सामना पाहिला तर काय मोठसं बिघडणार का?
होय. नक्कीच बिघडतं. कारण हे करमणुकीचे चटकदार कार्यक्रम म्हणजे व्हेफरच्या पाकिटासारखे असतात. तुम्ही व्हेफरचं पाकीट उघडून एक व्हेफर तोंडात टाकलात की, ते पाकीट पूर्ण संपेपर्यंत तुमचे हात आणि तोंड दोघेही बुद्धीशी फारकत घेऊन व्यस्त राहतात. तोच प्रकार या टीव्ही कार्यक्रमांचा असतो. कलाकार मंडळी भरपूर पैसे कमावतात. प्रायोजक मंडळी दर दोन-दोन मिनिटांनी त्यांच्या मालाच्या जाहिराती आपल्या मेंदूवर आदळतात आणि आपण सामान्य प्रेक्षक मात्र आपल्या कामाचा अमूल्य वेळ वाया घालवतो आणि सामान्य जीवनाकडून अति सामान्याकडे म्हणजे उलट्या दिशेनं प्रवास करतो. यालाच अधोगती असं म्हणतात.
रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेली एक रूपक कथा आठवली म्हणून सांगतो. एक भिकारी रस्यानं भीक मागत फिरत होता. हा भिकारी बाजारातून भीक मागत चालला असता अचानक दवंडी पिटली गेली. ‘दूर व्हा. दूर व्हा. महाराजांची स्वारी येतेय. भिकारी मोठ्या आशेनं पुढं धावला. राजाच्या सेवकांनी त्या भिकाऱ्याला दूर करेपर्यंत महाराज सुवर्णरथात बसून तिथवर येऊन पोहोचले होते. भिकाऱ्यानं झोळी पुढं करून याचना केली त्याला उत्तर म्हणून महाराजांनी आपलीच ओंजळ पुढे करून भिकाऱ्याला ‘आज तू मला काहीतरी दे.’ असं सांगितलं.
भिकारी गडबडला. पार गोंधळूनच गेला. त्यानं झोळीत हात घातला. झोळीत भरपूर धान्य होतं. पण आजवर कुणाला देण्यची सवय नसल्यामुळे द्यायला हात पुढं जाईना. अखेर नाईलाजानं त्याने एक दाणा त्या महाराजांच्या ओंजळीत टाकला. महाराजांनी तो एकच दाणा स्वीकारला. मस्तकी धारण केला आणि भिकाऱ्याला काहीही न देता सुवर्णरथात बसून वेगानं निघून गेले. भिकाऱ्याला आश्चर्य वाटलं. त्याचबरोबर कारण नसताना एक दाणा महाराजांना दिल्याबद्दल वाईटही वाटलं. संध्याकाळी तो त्याची भरलेली झोळी घेऊन घरी परतला. मिळालेलं धान्य निवडण्यासाठी त्याने आतले दाणे जमिनीवर ओतले आणि पाहिलं.
त्या धान्यातला एक दाणा सोन्याचा झाला होता. फक्त एकच दाणा. त्यानं महाराजांच्या ओंजळीत टाकलेल्या दाण्याच्याच आकाराचा भिकाऱ्याला रडू फुटलं. जर त्यावेळी महाराजांच्या ओंजळीत पसाभर दाणे टाकले असते तर… रविंद्रनाथ टागोरांची ही रूपक कथा. आपण सर्वसामान्य माणसं देखील त्या भिकाऱ्यासारखीच नाही का वागत? सुखाची अपेक्षा धरतो पण ते सुख मिळविण्यासाठी जो त्याग करावा लागतो त्याची मात्र तयारी नसते. या रूपककथेत आयुष्यातील यशाचं फार मोठं रहस्य दडलं आहे.
अगदी शालेय जीवनात देखील आपल्याहून अधिक मार्क मिळविणान्या विद्यार्थ्याचा हेवा वाटतो. तशा प्रकारचे गुण आपल्याला मिळावेत, आपण उत्तम मार्क मिळून पास व्हावं, परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करावं, असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असतं. पण विशेष प्राविण्य मिळविण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या मात्र करण्याची तयारी नसते. मुख्य म्हणजे ऐहिक सूखं सोडून केवळ अभ्यासाचीच कास धरावी लागते. दूरचित्रवाणीवरचे कार्यक्रम कितीही चटकदार असले तरी त्यांचा मोह टाळावा लागतो. चमचमीत खाद्य पदार्थ वर्ज करावे लागतात. इतर अनेक मोहांकडे डोळेझाक करून केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागतं. असं केलं तरच अपेक्षित यश पदरी पडतं. जेवढा अभ्यास केला तेवढेच मार्क मिळतात.
केवळ अभ्यासातच नव्हे तर अगदी पुढेदेखील आयुष्यात आपल्याला हाच अनुभव येत असतो. नोकरीच्या ठिकाणी नेमून दिलेलं काम त्यात आपण ओतलेला जीव आणि आपलं करीअर यांचं प्रमाण नेहमीच सम असतं. आपल्यापेक्षा अधिक धन आणि मान मिळवणारे आपले वरिष्ठ हे आपल्यापेक्षा कुठं ना कुठं आपल्याहून सरस असतात हे मान्य करायलाच हवं.