हिंडेनबर्गच्या ट्विटने शेअर बाजारात खळबळ, ट्रेडरही धास्तावले!
मुंबई : अदानी समूहाच्या अहवालानंतर हिंडेनबर्गने नवा अहवाल आणण्याचे संकेत दिले आहेत. हिंडेनबर्ग या शॉर्ट सेलिंग फर्मने ट्विट करत ही माहिती दिली आहे की लवकरच दुसरा अहवाल येणार असून त्यात मोठा खुलासा केला जाईल. अमेरिकेत फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात वाढ केल्यानंतर जगभरातील बाजारांवर दबाव आहे. त्यातच हिंडेनबर्गच्या या ट्विटने भारतीय बाजारपेठेत खळबळ उडली असून ट्रेडरही धास्तावले आहेत.
New report soon—another big one.
— Hindenburg Research (@HindenburgRes) March 22, 2023
याआधी हिंडेनबर्गने २४ जानेवारी रोजी अदानी समूहाबाबत एक अहवाल सादर केला होता, ज्यामध्ये अनेक आरोप करण्यात आले होते. या अहवालानंतर गौतम अदानी यांची संपत्ती १५० बिलियन डॉलर वरून ५३ बिलियन डॉलर पर्यंत खाली आली होती. फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत ते तिसऱ्या क्रमांकावरून चक्क ३५व्या क्रमांकावर गेले आहेत. त्याचवेळी गौतम अदानी यांच्या समूहाला १२० अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले.
दरम्यान, हिंडेनबर्गचा अदानी समूह हा काही पहिला टार्गेट नाही. तर यापूर्वी, अमेरिका, कॅनडा आणि चीनच्या सुमारे १८ कंपन्यांचे स्वतंत्र अहवाल प्रकाशित केले आहेत. त्यानंतरही बराच गोंधळ झाला होता. बहुतेक कंपन्या अमेरिकेतील होत्या, ज्यांना वेगवेगळ्या आरोपांचा सामना करावा लागला.
हिंडनबर्गचा सर्वाधिक चर्चेचा अहवाल निकोला या अमेरिकेतील ऑटो क्षेत्रातील मोठ्या कंपनीबद्दल होता. या अहवालानंतर निकोलाचे शेअर्स ८० टक्क्यांनी घसरले. निकोलावरील अहवालाने व्हिसलब्लोअर्स आणि माजी कर्मचाऱ्यांच्या मदतीने कथित फसवणूक उघड केली होती. निकोलाचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष ट्रेवर मिल्टन यांनी तात्काळ कंपनीचा राजीनामा दिला. अहवालानंतर कंपनीची चौकशी सुरू आहे.