अमेरिकेत १८६ बँका डबघाईच्या उंबरठ्यावर!
बर्न (स्वित्झर्लंड) : अमेरिकेतील दोन बँकांना टाळे लागल्यावर स्वित्झर्लंडची क्रेडिट सुइस बँक देखील संकटात सापडली आहे. क्रेडिट सुइस ही स्वित्झर्लंडमधील दुसरी सर्वात मोठी बँक असून जगातील ३० महत्त्वाच्या बँकांमध्ये क्रेडिट सुइसचा समावेश आहे. या यादीत सर्वाधिक ९ बँका अमेरिकेतील आहेत. तर युरोपमधील १३ आणि आशियातील ७ बँकांचाही समावेश आहे.
अमेरिकेत अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीत दोन बँका बुडाल्या. स्टार्टअप कंपन्यांना कर्ज देणारी सिलिकॉन व्हॅली बँक सर्वप्रथम बुडाली, जी देशातील १६वी सर्वात मोठी बँक होती. त्यानंतर काही दिवसांनी क्रिप्टो कंपन्यांना कर्ज देणा-या सिग्नेचर बँकेलाही कुलूप लागले. त्यानंतर आणखी एक बँक, फर्स्ट रिपब्लिक बँकेनेही आपला गाशा गुंडाळला. एका अहवालानुसार फक्त अमेरिकेत १८६ बँका डबघाईच्या उंबरठ्यावर आहेत. अमेरिकेतील झळ युरोपमधील दिग्गज बँक, क्रेडिट सुईसपर्यंत पोहोचल्याचे वृत्त येताच जगभरात हाहाकार माजला आहे. अशा स्थितीत क्रेडिट सुइस बँक बुडाली तर जगात त्सुनामी येईल. जगावर मंदीचे संकट येईल.
फायनान्शिअल स्टेबिलिटी बोर्ड दरवर्षी अशा ३० बँकांची यादी प्रसिद्ध करते. या यादीतील एकाही बँकेला कुलूप लागल्यास जगाची अर्थव्यवस्था कोलमडून जाईल आणि मोठे आर्थिक संकट येईल. म्हणूनच स्विस सरकार क्रेडिट सुइस या बँकेला वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
जगभरातील ३० प्रभावी बँकांच्या यादीत युरोपमधील १३, उत्तर अमेरिकेतील १० तर आशियातील ७ बँकांचा समावेश आहे. उत्तर अमेरिकेबद्दल बोलायचे झाले तर १० पैकी ९ बँका अमेरिकेतील आहेत असून एक बँक कॅनडाची आहे. अमेरिकेतील बँकांमध्ये जेपी मॉर्गन, बँक ऑफ अमेरिका, सिटीग्रुप, एचएसबीसी, गोल्डमन सॅक्स, बँक ऑफ न्यूयॉर्क, मॉर्गन स्टॅनले, स्टेट स्ट्रीट आणि वेल्स फार्गो यांचा समावेश आहे. त्याचवेळी आशियामधील चार बँका चीनच्या आणि ३ जपानच्या आहेत. चीनमधील बँकांमध्ये इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना, कृषी बँक ऑफ चायना, चायना कन्स्ट्रक्शन बँक आणि बँक ऑफ चायना यांचा समावेश असून विशेष म्हणजे या यादीत एकही भारतीय बँक नाही.
देशाची केंद्रीय बँक, भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ही देशाच्या बँकिंग प्रणालीवर लक्ष ठेवून असते. रिझर्व्ह बँकेच्या कठोर धोरणांमुळे अजूनही भारतीय बँकांवर जागतिक संकटाचा कोणताही परिणाम झालेला नाही. आरबीआयने भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक या तीन बँकांना प्रणालीगत महत्त्वाचे मानले आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी या बँक महत्त्वाच्या आहेत. म्हणजेच आरबीआय या बँकांना कधीही बुडू देणार नाही.