देशाची लोकसंख्या भरमसाट वाढली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात रस्ते रुंद करणे अपेक्षितच आहे. शिवाय लोकांचे दळणवळणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दळणवळणाची साधनेही वाढल्यामुळे लोक अधिक प्रवास करू लागले आहेत. रस्त्यांमुळे जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा विकास होतो, असे म्हटले जाते. त्यामुळे रस्ते बांधकामांवर सध्या अधिक भर दिला जात आहे. रस्ते बांधणीसाठी विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रसिद्ध आहेत. सुदैवाने हे खातेही त्यांच्याकडेच असल्यामुळे सध्या कधी नव्हे इतक्या प्रमाणात रस्त्यांचा विकास होत आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात त्यांच्या अखत्यारित आणि मार्गदर्शनाखाली रस्ते उभारणीचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठा निधीही खर्च होत आहे. जिल्ह्या-जिल्ह्यांत अरुंद रस्ते रुंद करण्याचे काम सध्या सुरू आहे. मार्गांचे महामार्गात रूपांतर होत असल्यामुळे प्रवासाची गतीही वाढली आहे. पण या महामार्गावरील धावण्याची गती किती असावी, याबाबत कुणीही विचार करीत नाही, असे दिसून येते. अरुंद रस्त्यांमुळे अपघात होतात, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यात शिवसेनेचे सरकार सत्तेत आल्यास मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी दोन तासात जाता येईल, असा मार्ग तयार करू, अशी घोषणा केली होती. याबाबत त्यांनी विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चाही केली. प्रत्यक्षात १९९५-९६ मध्ये सेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आले. या सरकारमध्ये बांधकाम खाते गडकरी यांच्याकडे होते. त्यांनी मुंबई-पुणे हा एक्स्प्रेस हायवे तयार केला. आता या महामार्गावरून सुसाटपणे दोन तासांत पुण्याला पोहोचता येते. याच धर्तीवर मुंबई-नागपूर हा जवळपास ८५० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग तयार झाला. ४५ हजार कोटींपेक्षा अधिक खर्चाचा हा राज्य सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. दहा जिल्ह्यांतून जाणाऱ्या या महामार्गास ‘बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ असे नाव देण्यात आले. यासाठी २४,२५५ एकर जमीन संपादित करण्यात आली. गेल्या ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. लवकरच मुंबईपर्यंतचा हा महामार्ग प्रवासासाठी खुला होणार आहे. या महामार्गामुळे मुंबईहून नागपूरला अवघ्या १२ तासांत पोहोचता येईल. आता शिर्डी ते नागपूर हा कोणताही अडथळा न येऊ देता सहा पदरी असलेला हा महामार्ग खुला झाला असल्यामुळे या मार्गावरून लोक सुसाट पळू लागले आहेत.
या महामार्गावरून कमी वेळेत पोहोचता येते, वेळ वाचतो, लवकर कामे होतील, हे जरी खरे असले तरी किती गतीने या मार्गावरून धावायचे, हे आपल्या हातात आहे. रस्ता चांगला आहे, गाडी सुसाट पळविता येते म्हणून काय ती पळवायची? मागचा पुढचा काहीच विचार करायचा नाही, असेच जणू सध्या दिसून येत आहे. या महामार्गाला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. पण या शंभर दिवसांत या महामार्गावर तब्बल ९०० अपघात झाले. त्यात ३१ जणांचा बळी गेला. म्हणजेच दिवसाला ९ लहान-मोठे अपघात या महामार्गावर होतात. धक्कादायक बाब म्हणजे ४६ टक्के अपघात हे मेकॅनिक ब्रेक डाऊन झाल्यामुळे झाल्याचे समोर आले आहे. १५ टक्के अपघात टायर पंक्चरमुळे, तर १२ टक्के अपघात टायर फुटल्यामुळे झाले आहेत. काही अपघातांमध्ये तर वन्य प्राण्यांनाही दुखापत झाली आहे. बहुतांश वन्य प्राण्यांचा वाहनाची धडक लागल्याने जीवही गेला. इंधन संपल्यानंतर वाहने रस्त्याच्या कडेवर उभी राहिल्याने किंवा इंधन संपल्यानंतर गाडी बंद झाल्यानेही अपघात झाल्याचे परिवहन विभागाच्या तपासणीत समोर आले आहे.
हा महामार्ग आहे की, अपघाताचा-मृत्यूचा महामार्ग? असा सवाल आता निर्माण झाला आहे. या रस्त्यामुळे आपण लवकर पोहोचू, हे खरे आहे. पण गाडीचे इंजिन, स्टिअरिंग आपल्या हातात आहे, त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवणे हेही आपल्याच हातात आहे; परंतु याचा कोणी विचार करीत नाही. परिणामी अपघात होतात, गाडीचे नुकसान होते, लोकांचे जीव जातात, जखमी होऊन कायमचे अपंगत्व येऊ शकते, याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. पण त्याबाबतही कोणी विचार करीत नाही, हेही लक्षात येते. मानवी चुकांमुळेच अधिक अपघात होतात, हेच कोणी ध्यानात घेत नाही. अपघात न होण्यासाठी यावर तज्ज्ञांकडून काही उपाय सुचवण्यात आले, या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यात वेगाचे उल्लंघन करणाऱ्या, लेनची शिस्त न पाळणाऱ्या, टायरबाबत माहितीसाठी वाहनचालकांसाठी समुपदेशन केंद्र सुरू करणे, रस्ता सुरक्षेबाबत माहिती देणारे फलक अधिक प्रमाणात लावणे, सर्व टोल नाक्यावर पीए सिस्टीम सुरू करणे, ट्रकचालकांची विश्रांतीची पार्किंगची व्यवस्था निर्माण करणे आदी. या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले, तर अपघात होणारच नाहीत असे नाही. पण त्याचे प्रमाण कमी होऊ शकेल. परिणामी कोणाचे जीव जाणार नाहीत आणि आपला प्रवासही सुरक्षित, सुखकारक होऊन जीवनात समृद्धी आल्याशिवाय राहणार नाही, याचाच या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी विचार करावा.