सर्व लाभार्थ्यांची यादी आता संकेतस्थळावर मिळणार
मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मुंबई महानगरपालिका, म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत तयार करण्यात येणाऱ्या झोपडपट्टीधारकांच्या पात्रतेच्या परिशिष्ट-२ यादीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी गृहनिर्माण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आजवर राबविण्यात आलेल्या आणि राबविण्यात येणाऱ्या एसआरए योजनांचे मूळ आणि सुधारीत परिशिष्ट-२ झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका, म्हाडाने १५ दिवसांच्या आत योजनांचे परिशिष्ट-२ एसआरए कार्यालयाला उपलब्ध करून देण्याचे निर्देश गृहनिर्माण विभागाने दिले आहेत.
मुंबई शहर व उपनगरातील सर्व धारणाधिकार व मालकी हक्काच्या जमिनी, केंद्र शासनाच्या जमिनीवरील झोपडपट्टी क्षेत्रातील झोपडीधारकांची पात्र अपात्रता निश्चिती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सक्षम प्राधिकारी या अधिकाऱ्यांकडून करण्यात येते. याआधी ते उपजिल्हाधिकारी कार्यालयामधून होत असे. तर मुंबई महानगरपालिकेच्या जागेवरील झोपडीधारकांची पात्रता संबंधीत वॉर्डचे संबंधित सहायक आयुक्त आणि म्हाडाच्या जागेवरील झोपडपट्ट्यांबाबतचे मुंबई मंडळाचे सक्षम प्राधिकारी यांच्यामार्फत पात्रता निश्चित करण्यात येते. या कार्यालयांकडून तयार करण्यात येणारे परिशिष्ट-२ संबंधित झोपडपट्टी क्षेत्रात फलकावर जाहीररीत्या प्रसिद्ध करण्यात येतात. असा नियम असला तरी काही सोसायटीचे पदाधिकारी केवळ दाखवण्यासाठी फोटो काढून नंतर ते त्वरीत गायब केले जात असे. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने गृहनिर्माण विभागाने यामध्ये पारदर्शकता आणण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार एसआरए योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेले परिशिष्ट-२ सार्वजनिक रूपाने प्रसिद्ध करण्याचे निर्देश गृहनिर्माण विभागाने दिले आहेत. याबाबतचा शासन निर्णय गृहनिर्माण विभागाने जारी केला आहे. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत तयार करण्यात आलेले परिशिष्ट-२ एसआरए कार्यालयाकडे १५ दिवसांच्या आत उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही गृहनिर्माण विभागाने दिले आहेत.
तसेच यापुढे तयार करण्यात येणारे मूळ व सुधारीत परिशिष्ट-२ झोपडपट्टी परिसरात जाहिररित्या फलकावर प्रसिद्ध केल्यापासून ७ दिवसांच्या आत ते संकेतस्थळावर देखिल प्रसिद्ध करून देण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणास उपलब्ध करून देण्याची सूचनाही गृहनिर्माण विभागाने केली आहे.
तसेच यापुढे नव्याने तयार करण्यात येणाऱ्या मूळ व सुधारित परिशिष्ट-२ मध्ये झोपडीधारकाने सादर केलेल्या विविध वास्तव्याच्या पुराव्यांपैकी विद्युत देयक, निवडणूक ओळखपत्र, आधारकार्ड इत्यादी वास्तव्याच्या पुराव्यांचा उल्लेख करताना या पुराव्यांचा सविस्तर तपशिल प्रसिद्ध करण्यात येऊ नयेत, अशीही सूचना केली आहे.
तसेच अपात्र झोपडीधारकांच्या अपात्रतेचे कारण परिशिष्ट-२ मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात यावे, असेही या शासन निर्णयात म्हटले आहे. त्याचप्रमाणे आजवर राबविण्यात आलेल्या योजनांचे परिशिष्ट-२ झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासाठी गृहनिर्माण विभागाने एसआरएला दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे.