चित्रपटासारखी कोणतीही कलाकृती असो, जेव्हा तिच्यावर ‘ऑस्कर पुरस्काराची’ मोहोर उमटते तेव्हा जगभर या चित्रपटाचा डंका आपोआप पिटला जातो. त्या चित्रपटातील कलावंत, निर्माते, दिग्दर्शक आणि अन्य बाजू सांभाळणारे असे सर्वच जण एका रात्रीत स्टार होऊन जातात. त्यांचे नशीब फळफळते. त्यानंतर आणखी ऑफर्स त्यांच्याकडे चालून येतात. ते सर्वजण इतके बिझी होऊन जातात की, त्यांच्याकडे स्वत:साठी वेळच उरत नाही. त्यामुळेच या क्षेत्रातील प्रत्येकाची मनीषा ही ‘ऑस्कर’सारखा एखादा मोठा पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हीच असते. ऑस्कर पुरस्कारांची सुरुवात १९२९ मध्ये करण्यात आली. मात्र भारतीय चित्रपटांना या पुरस्कारांमध्ये म्हणावे तसे यश अद्यापपर्यंत मिळालेले नव्हते. विविध भारतीय कलाकारांनी ऑस्करवर आपले नाव मात्र कोरले आहे. भानू अथय्या या सुप्रसिद्ध कॉस्ट्युम डिझायनरना १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ या सिनेमाच्या कॉस्ट्युम डिझाइनसाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला. त्यानिमित्ताने भारतात पहिले ऑस्कर आले. यंदा लॉस एंजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये नुकताच ९५वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. ‘ऑस्कर’ हा कलाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार आयुष्यात एकदा तरी आपल्या नावे व्हावा, अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. त्यासाठी यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतासाठी खूप खास ठरला. ऑस्कर २०२३ मध्ये भारताला एकूण चार नामांकने देण्यात आली होती. त्यातील दोन चित्रपटांनी पुरस्कार पटकावल्याने भारतीयांचा ऊर अभिमानाने उंचावला.
भारताच्या तीन चित्रपटांना यंदा वेगवेगळ्या विभागांमध्ये ऑस्करमध्ये नामांकने मिळाली होती. त्यापैकी भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने बेस्ट डाक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. कार्तिकी गोन्साल्विस आणि गुनीत मोंगा यांनी मंचावर हा पुरस्कार स्वीकारला. दोन भारतीय महिलांनी हे करून दाखवले. अचित जैन, गुनीत मोंगा निर्मित आणि कार्तिकी गोन्साल्विस दिग्दर्शित या लघुपटात तामिळनाडूच्या मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील एका कुटुंबाची कथा अधोरेखित करण्यात आली आहे. दोन अनाथ हत्तींना हे कुटुंब दत्तक घेते. विशेष म्हणजे कार्तिकी यांचा दिग्दर्शिक म्हणून हा पहिलाच लघुपट आहे. हा लघुपट केवळ ४१ मिनिटांचा आहे. एक छोटा हत्ती आणि त्याला सांभाळणारे दाम्पत्य यांच्या आयुष्यावर आधारलेला हा लघुपट आपले मन जिंकतो. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ म्हणजे हत्तीशी केलेली कुजबूज किंवा हत्तींनी केलेली कुजबूज. पण चित्रपटात या शब्दाचा फार मोठा अर्थ सांगण्यात आला आहे. मनुष्य आपले बाळ मोठ्या काळजीपूर्वकतेने आणि मेहनतीने मोठे करतो. अशा प्रकारे एक जोडपे खास मेहनतीने हत्तीची दोन पिल्ले वाढवते. आपल्या पोटच्या पोरांसारखी ते त्यांची काळजी घेतात. माणसाच्या बाळाला वाढविणे वेगळे आणि प्राण्यांना वाढवणे वेगळे. त्यांची भाषा, त्यांचे आजारपण, खाणे-पिणे सगळेच निराळे असल्याने त्यासाठी खास मेहनत करावी लागते. ते करायलाही समोर संवेदनशील व्यक्ती असणे गरजेचे असते. बोम्मन आणि बेली हे संवेदनशील जोडपे ‘रघू’ आणि ‘अम्मू’ अशी नावे ठेवलेली हत्तीची दोन पिल्ले सांभाळतात आणि त्यांची जबाबदारी घेतात.
एका अजस्त्र प्राण्याच्या पिल्लांचे संगोपन करणे व हे सर्व करताना त्यांना करावी लागलेली मेहनत, अपार कष्ट फारच सुंदर प्रकारे चित्रित करण्यात आले आहे. प्राणी आणि मनुष्य यांच्यातील एक नातेसंबंधांची गुंफण येथे दाखविण्यात आलेली आहे. बोम्मन आणि बेली दोघेही जंगलात राहणारे. बोम्मन वन खात्यात काम करत असताना त्याच्याकडे ‘रघू’ येतो. त्याची आई मृत पावलेली असते आणि सोबत असते ‘अम्मू’ (दुसरे पिल्लू). मग आपल्या पत्नीसोबत मिळून त्या दोघांची ते कशी काळजी घेतात, त्यांना या सगळ्यात किती अडचणी येतात हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. त्यांना दूध पाजणे, त्यांना खाण्यासाठी बांबू तोडून आणणे, शेकोटी करणे हे सगळे ते दोघे फक्त रघू आणि अम्मूसाठी करतात; परंतु त्यांच्या जीवाची झालेली घालमेल आणि अखेर वेगळे होण्याचा तो क्षण… त्यांचा हा भावनात्मक प्रवास प्रेक्षकांना माणूस म्हणून समृद्ध करून जातो.
कार्तिकी या पाच वर्षांपासून ‘रघू’ या हत्तीच्या कथेवर अभ्यास करत होते आणि जवळपास ४५० तासांचे फुटेज त्यांनी मेहनतीने मिळविले होते. ‘रघू’च्या अंघोळीचे, जेवतानाचे आणि खेळतानाचे अनेक तासांचे हे फुटेज होते. असे खास क्षणांचे चित्रीकरण मिळविण्यासाठी खूप कष्ट, मेहनत आणि कमालीचा संयम ठेवावा लागतो. तेव्हा कुठे लघुपटासाठी आवश्यक असणारे अप्रतिम असे सीन्स तुम्हाला मिळतात. विशेष म्हणजे एखाद्या भन्नाट कलाकृतीसाठी हवे असलेले हळवे असे जिव्हाळ्याचे क्षण हे नियोजन करून शूट करता येत नाहीत. त्यासाठी सतत जागरूक आणि संयमाने प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवणे व अचानक एखादा क्षण टिपण्यासाठी सतर्कता बाळगणे गरजेचे असते.
आमिर खानच्या ‘लगान’ या चित्रपटाला २००२ मध्ये ऑस्करचे नामांकन मिळाले होते. त्यानंतर आता ९५व्या अॅकॅडमी अॅवॉर्ड्समध्ये भारताच्या तीन चित्रपटांना वेगवेगळ्या विभागांमध्ये नामांकने मिळाली. ‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या विभागात नामांकन मिळाले. त्याशिवाय भारताकडून पाठवलेल्या ‘ऑल दॅट ब्रीद्स’ला ‘बेस्ट डॉक्युमेंट्री फीचर फिल्म’ विभागात आणि ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म विभागात नामांकन मिळाले होते. या वर्षी ऑस्करसाठी पाठविण्यात आलेल्या नामांकनांपैकी कुणीतरी ऑस्कर नक्की जिंकेल, अशी आशा प्रत्येक भारतीयाच्या मनात होती. अनेक प्रेक्षकांना ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याकडून बरीच अपेक्षा होती.
यापूर्वी गोल्डन ग्लोब अॅवॉर्ड सोहळ्यात ‘नाटू नाटू’ गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉन्ग म्हणून पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर प्रेक्षकांच्या या चित्रपटाकडून अपेक्षा खूप वाढल्या होत्या. नंतर ऑस्करसाठीही या गाण्याला नामांकन मिळाल्याने सगळ्यांच्या नजरा त्यावर लागल्या होत्या. ‘नाटू नाटू’ला पुरस्कार मिळावा यासाठी जणू चाहते प्रार्थना करत होते. अखेर त्यांची इच्छा पूर्ण झाली. ‘नाटू नाटू’ने पुरस्कार जिंकल्याने चाहत्यांना प्रचंड आनंद झाल्याचे दिसत आहे. ‘ऑस्कर’ म्हणजेच अकादमी पुरस्कार हे जगातील सर्वात मोठे चित्रपट पुरस्कार आहेत आणि या वर्षी या पुरस्कारांवर भारतीय मोहोर उमटली यासारखी मनाला उभारी देणारी आनंदाची बाब ती कुठली…