Sunday, June 22, 2025

पहिल्या वनडेत हार्दिककडे कर्णधारपद

पहिल्या वनडेत हार्दिककडे कर्णधारपद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका शुक्रवारपासून सुरू होत आहे. मेहुण्याच्या लग्नामुळे कर्णधार रोहित शर्मा पहिल्या सामन्याला मुकणार असून अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या खांद्यावर पहिल्या सामन्यात भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापासून रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे.


रोहित शर्माचा मेहुणा कुणाल सजदेह याच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. रोहित शर्मा आणि रितिका लग्नातील विधीसाठी पोहचले आहेत. कुणालच्या हळदीचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत.


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ मार्चपासून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दुसरा सामना १९ मार्चला विशाखापट्टणम येथे होईल. तिसरा सामना २२ मार्चला चेन्नईत खेळवला जाईल.


रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), युझवेंद्र चहल, इशान किशन, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, केएल राहुल, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव असा एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ आहे.

Comments
Add Comment