Friday, June 20, 2025

संपाचे तीव्र पडसाद! रुग्णांचे हाल, सरकारी विभागांचे कामकाज ठप्प

संपाचे तीव्र पडसाद! रुग्णांचे हाल, सरकारी विभागांचे कामकाज ठप्प

ऑपरेशन्स पुढे ढकलले, नगरपालिका, शाळा, महाविद्यालयांतील कामकाजही ठप्प


मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी राज्यातील सुमारे १८ लाख सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. या संपामुळे शासकीय रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, नगरपालिका, जिल्हा परिषदा, तहसीलदार कार्यालये, यासह अनेक सरकारी विभागांचे कामकाज ठप्प झाले आहे. परिचारिका, नर्सेस, वॉर्ड बॉयसह इतर आस्थापनातील शासकीय कर्मचा-यांनी आपापल्या कार्यालयाबाहेर येऊन जोरदार घोषणाबाजी केली. मुंबई, ठाणे, पुणे, संभाजीनगर, नागपूरसह राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.



रुग्णांचे प्रचंड हाल


जुनी पेन्शन योजना जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत कामावर येणार नाही, असा निर्णय कर्मचा-यांनी घेतला आहे. डॉक्टर, नर्सेस आणि परिचारिकाही या संपात सहभागी झाल्याने सायन हॉस्पिटलमध्ये सन्नाटा पसरलेला आहे. परिणामी, रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. अन्य रुग्णालयात हेच चित्र दिसत आहे. तर पुण्यातील ससून रुग्णालयातील नर्सेसही संपात सहभागी झाल्या आहेत. ससून रुग्णालय परिसरात परिचारिकांनी आंदोलन केले.


राज्यात आज प्रत्येक शासकीय विभागात आंदोलन करुन संप पुकारण्यात आला आहे. जोपर्यंत सरकार जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा निर्धार या आंदोलकांनी केला आहे. प्रत्येक शासकीय विभागात आज आंदोलन करुन संप पुकारण्यात आला आहे. जोपर्यंत सरकार जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा निर्धार या आंदोलकांनी केला आहे.



नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा संपात सहभागी न होता काळ्या फिती लावून कामकाज


नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी न होता काळ्या फिती लावून कामकाज सुरु ठेवले आहे. नागरिकांच्या सोयी सुविधांवर संपाचा परिणाम होणार नाही, याची काळजी प्रशासन घेत असल्याचे उपायुक्त मनोज घोडे पाटील यांनी सांगितले.



भिवंडीत शासकीय कर्मचाऱ्यांचा संपाला उत्स्फूर्त पाठिंबा



भिवंडी शहरातील तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालयामधील सर्व कर्मचारी एकत्र होत संप यशस्वी केला आहे. पंचायत समितीसह तहसीलदार कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली.



मुरूड तालुक्यात बेमुदत संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद



राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला मुरुड तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. विविध संघटनांचे सदस्य असणाऱ्या पदाधिकारी, सदस्य, कर्मचाऱ्यांनी शहरातून फलक हातात घेऊन घोषणा देत मोर्चा काढून तहसीलदार कार्यालयात तहसीलदार रोहन शिंदे यांना जुन्या पेंशन सहित विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी घोषणांनी परिसर दुमदूमला.



राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, निम सरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती (मुरुड)चे पदाधिकारी, मुरुड तालुका अध्यक्ष राजेंद्र नाईक, रिमा कदम, शरद सुरवसे, रा. का. पाटील, सुर्यकांत पाटील, सुशांत ठाकूर, चेतन मगर, राकेश पाटील, ओमकार कोरमवार, आर. जी. गायकवाड, प्रकाश आरेकर, जितेंद्र मकू, हर्षा नांदगांवकर संतोष मोरे, रेश्मा कदम यासह पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


दरम्यान तहसील कार्यालय प्रांगणात सरकारी कर्मचारी बेमुदत संपास बसले आहेत. सुमारे तीनशे कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.



कल्याणमध्ये शिक्षकांचे काळ्या फिती लावून आंदोलन



  • महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेने दिले तहसीलदार कार्यालयात निवेदन



जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु असून कल्याणमध्ये देखील याचे पडसाद उमटले. कल्याणमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम केले. तर महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गजानन पाटील, जिल्हा सचिव थॉमस शिनगारे यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार कार्यलयावर धडक देत निवेदन सादर केले.


विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी काळ्या फिती लावून निषेध करत असल्याची माहिती यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन पाटील यांनी दिली. यावेळी अमिता पाठक, रुपाली कुलकर्णी, उमा सिरगुरकर, मिलिंद बागुल, दिलीप पाटील, प्रशांत जावळे, राजेंद्र राठोड, रोहिणी बाठे, पूनम सिंह, बिन्सी बेल्सन आदी शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा