मुरबाड: मुरबाडमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने मुरबाडमधील आंबा उत्पादक शेतकरी, कडधान्य तसेच भाजीपाला उत्पादक शेतकरी यांचे मोठे नुकसान केले आहे. अवकाळी पावसाने वीटभट्टी व्यवसायिकांचेही नुकसान केले आहे. त्यामुळे या सर्व नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
मुरबाड तालुक्यातील ग्रामीण, आदिवासी पट्ट्यात आणि शरीर भागात गेली चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण होते. त्यानंतर आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास झालेला वादळी वारा तसेच अवकाळी पाऊस यामुळे मुरबाड तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंबा बागेचे फार मोठे नुकसान झाले आहे. तसेच यावेळी गारपीट झाल्याने आंब्याचा मोहर गळून पडल्याचे झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आंबा बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे.
या पावसामुळे तालुक्यातील वीटभट्टी तसेच भेंडी, काकडी, मिरची, इतर भाजीपाला तसेच वाळ, हरभरा या कडधान्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनाम करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन प्रा. प्रकाश पवार यांनी केली आहे.