ओझर (प्रतिनिधी) : येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीला विमाने बनविण्यापोटी अधिकचे काम मिळण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या मागणीला यश आले आहे. सदरची मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केली होती. देशालगतच्या सीमा सुरक्षित असाव्यात यापोटी वायूदलात भरती होणाऱ्या वैमानिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले एचटीटी ४० जातीचे विशेष ट्रेनर विमाने तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
खासदार गोडसे यांच्या प्रयत्नांमुळे एचटीटी ४० जातीचे सत्तर विमाने तयार करण्याचे काम ओझर येथील एचएएल कंपनीला मिळाले असून यासाठी सहा हजार आठशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे तिन हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना काम मिळणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे. खासदार गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे काम मिळाल्याने एचएएल कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विविध जातीचे विमाने तयार करण्याची एचएएल ही केंद्र शासनाची मोठी कंपनी असून ओझर एचएएल मध्ये आजपर्यंत अनेक जातींच्या विमानांची निर्मिती झाली आहे. येथील कारखान्यात सुमारे तिन हजार अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत.