Thursday, April 24, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणसिंधुदुर्ग पर्यटनातील तपस्वी डी. के. मामा सावंत यांचे निधन

सिंधुदुर्ग पर्यटनातील तपस्वी डी. के. मामा सावंत यांचे निधन

इच्छेप्रमाणे मुंबईतील रुग्णालयात देहदान

सावंतवाडी ( प्रतिनिधी ): सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला एका आगळीवेगळी ओळख निर्माण करून देणारे व ‘मामाचा गाव ‘ ही संकल्पना राबविणारे पर्यटन क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व ध्रुव कुमार तथा डी. के. सावंत (६९, रा. माजगांव, मूळ रा. डिंगणे, बांदा ) यांचे दीर्घ आजाराने मुंबई येथे निधन झाले. मुंबईतील खाजगी रुग्णालयात गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या इच्छेप्रमाणे मुंबई येथेच त्यांचा देहदान करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

डिंगणे बांदा येथील पटेकर सावंत कुटुंबीयात जन्मलेले डि. के. इतर युवकांप्रमाणेच शिक्षणानंतर चाकरमानी म्हणून मुंबईत गेले. तेथे सुरुवातीला एका बँकेत त्यांनी नोकरी केली. मात्र त्यानंतर तिथे जास्त काळ न राहता त्यांनी एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीला राहिले. काही काळ त्यांनी मंत्रालयात कॅन्टीनही चालवले होते. त्यांची पत्नी मंत्रालयात सेवेत होती. या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक तरुणांना तसेच गावकऱ्यांना मंत्रालयातील कामांमध्ये ते नेहमीच मदत करीत असत. काही वर्षांपूर्वी ते गावी परतले. मात्र आपल्या मूळ गावी न जाता त्यांनी माजगाव येथील मळगाव घाटीच्या ( मेटाच्या ) वरच्या भागात निर्जन स्थळी डी. के. टुरिझम हा अनोखा असा पर्यटन प्रकल्प साकारला. हा प्रकल्प साकारत असताना अनेकांनी त्यांना अक्षरशः वेड्यात काढले. मात्र, जिद्द चिकाटी परिश्रम व घेतलेल्या कामाचा ध्यास याच्या बळावर त्यांनी हा प्रकल्प यशस्वी करून दाखवला. त्यानंतर डिंगणे व दाभिळ येथे ‘मामाचा गाव ‘ ही संकल्पना राबवून देश-विदेशातील पर्यटकांना कोकणातील अस्सल पर्यटन घडवून आणले. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठा लढा लढला. सावंतवाडी स्थानकात आंदोलनही उभारले. या आंदोलनानंतर रेल्वे मंत्र्यांशी चर्चा घडवून आणत अनेक प्रश्नांना वाचा फोडली. सावंतवाडी स्थानकात लांब पल्ल्यांच्या गाड्यांना थांबा मिळवून देण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहीले.डी के यांच्या निधनामुळे सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे. पर्यटन क्षेत्रातील एक मोठा मार्गदर्शक हरपला अशा शब्दात अनेकांनी त्यांच्या प्रति आदरांजली वाहिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -